कळ्या फुलल्या उपवनी
गंध सुगंध दरवळला
बाल्यावरच्या त्या वळणावर
यौवन मोहर बहरला
एके दिवशी सायंकाळी
वळणाच्या त्या वाटेवरती
भिडल्या नजरेला नजरा
अन् भावनांना आली भरती
भेटला स्वप्नीचा राजकुवर
प्राचीवरचा अरूण जणू
झंकारल्या ह्रदयातील तारा
रूप देखणे किती वर्णू
गाली माझ्या गुलाब फुलले
आस लागली भेटीची
क्षणभर न पडे चैन मजसी
ओढ रेशमी स्पर्शाची
करात कर घेऊनी मी त्याचा
वाट चालले प्रेमाची
चालत असता वळण लागले
समीपता आली युगुलाची
सरिता सागर होते मीलन
सर्वस्व तियेचे करिते अर्पण
हाचि असे निसर्ग नियम
तसेच माझे सर्व समर्पण

– रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका
खूप भावपूर्ण रसपूर्ण काव्य…
अरुणाताईंनु सर्वांनाच यौवनाच्या वाटेवर नेलं…