रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने जाणून घेऊ या रक्षाबंधन सणाचे महत्व आणि त्याचे आजच्याही काळातील प्रयोजन. आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
आपली भारतीय संस्कृती थोर आहे कारण यात फक्त देव, धर्म, कर्मकांड यांच्या सणवार आणि रूढी, परंपरा, उत्सव यांनाच महत्व दिलेले नाही तर यात भावना आणि श्रद्धेचा विचार करून सामाजिक, धार्मिक, नैतिक मूल्यांनाही तेवढेच महत्वाचे स्थान दिले आहे आणि त्यानुसार सर्व उत्सव, सणवार साजरे केले जातात.
भारतीय सणांमध्ये पती- पत्नी, आई-मुलगा, भाऊ- बहिण अशा नात्यांना त्याच बरोबर पशुपक्षी, निसर्ग यांनाही खूप महत्व आहे. ‘ राखी पौर्णिमा’ म्हणजेच ‘रक्षाबंधन’ हा सुद्धा असाच एक भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सुंदर भावनिक उत्सवच आहे. याला दुहेरी महत्वसुद्धा आहे बर का ! आपला बराच भूभाग सागराच्या किनाऱ्यांवर देखील वसलेला आहे. त्यामुळे याच दिवशी तेथील कोळीबांधव हा सण ‘नारळी पौर्णिमा’ म्हणुन देखील साजरा करतात. यादिवशी ज्या सागराने आपल्याला अन्न, जीवन दिले त्याची जाणीव ठेवून त्याचे ऋण फेडण्यासाठी म्हणून त्याला नारळ, दिवे अर्पण करून नारळाचे गोडाचे पदार्थ बनवून खाऊन, नृत्य करुन गाणी गाऊन आनंदाने हा सण साजरा करतात. म्हणजेच मानव, देव यांच्या इतकेच निसर्गालाही या संस्कृतीत स्थान दिले आहे आणि ही खूपच सुंदर, अभिमानस्पद विशेष गोष्ट आहे. म्हणूनच आपली संस्कृती खूप वेगळी, सुंदर आणि महान आहे.
निसर्गाशी आपले नाते जपण्याच्या सोबतच या दिवसाला भावा बहिणीच्या एकमेकांवरील प्रेमाला विश्वासाचे कोंदण देण्याचा हा अलौकिक सण ! भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो. ही राखी म्हणजे केवळ एक रेशमी धागा नसतो, तर बहीण तिचे सुरक्षकवच भावाला बांधत असते. कोणतेही संकट यापुढे टिकाव धरू शकत नाही असे या धाग्याचे खास महत्व आहे. हा तंतु, राखी बांधून बहीण त्याला औक्षण करते, त्याचे सर्व मंगल व्हावे, दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करते, गोड बनवून खायला घालते तर भाऊसुद्धा तिच्यावर येणाऱ्या कोणत्याही कठीण प्रसंगात, संकटात आयुष्यभर तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे मनोमन आश्वासन देतो.
हा सण अगदी पुराण काळापासून सुरु असल्याचे दाखले आहेत. ‘चिंधी बांधते द्रौपदी हरिच्या बोटाला’ ही महाभारतातील कथा श्रीकृष्ण व द्रौपदीच्या भाऊ बहिणीच्या एकमेकांवरील असलेल्या प्रेम, विश्वास, श्रद्धा, आदर, त्याग यांचे दर्शन घडवते. प्रेमाने बांधलेल्या एका चिंधीसाठी हरी तिच्यावरील कित्येक अत्यंत कठीण प्रसंगात धावून येतो, रक्षण करतो. वस्त्रहरणाच्या कठीण प्रसंगात अगदी भीष्माचार्य, कुलगुरू, धृतराष्ट्रासारखा राजा सुद्धा काहीही करु शकला नाही तेंव्हा बहिणीच्या एका हाकेला तिने बांधलेल्या एका धाग्याची आठवण ठेवून तिचा भाऊ श्रीकृष्ण फक्त धाऊन आलाच नाही, तर एका धाग्याच्या बदल्यात कित्येक उंची वसने देऊन तिचे लज्जारक्षण केले. हे पाहून या धाग्यात किती ताकद असते याची प्रचिती येते. सख्खी बहिण सुभद्रा इतकी माया, प्रेम केवळ या धाग्यामुळेच द्रौपदीसारख्या एका मानलेल्या बहिणीला सुद्धा मिळते. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत वाटायचे तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानत असे, जो तिची रक्षा करील.
दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक धागा इंद्राच्या हातावर बांधला. त्या धाग्याच्या म्हणजेच राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात.
ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.
समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत.
रक्षाबंधन हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. हा राजस्थानचा प्रमुख सण आहे या पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लीत होते.

स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. आई आपल्या मुलाला ‘चंदामामा’ म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते. म्हणून तरी कित्येक सामाजिक कार्यकर्ते अनाथाश्रम, दिव्यांग भगिनींकडुन खास राख्या बांधून घेतात. त्यांना आधार देतात. प्रेमाने भेटवस्तू देतात.
आपल्या शासनाने म्हणूनच तर ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केली. त्यांना आयुष्यभर फुल ना फुलाची पाकळी मिळावी यासाठी चोळी बांगडीसाठी आर्थिक मदत सुरु केली. त्यामुळे त्यांना खूप मोठा दिलासा, आधार मिळाला. कित्येकजणी त्यामुळे आता स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहिल्या आहेत.
हा उत्सव लहानांपासुन ते वृद्धांपर्यंत सर्वच आनंदात साजरा करतात. छोट्याश्या बहिणीपासून ते सासरी गेलेल्या बहिणींपर्यंत, अगदी मानलेल्या बहिणीसुद्धा या दिवशी आवर्जून भावाला भेटतात. जुन्या, लहानपणी घडलेल्या दोघांमध्ये घडलेल्या गमतीच्या, प्रेमाने दोघांनी एकमेकांची घेतलेली काळजी, प्रेम, कधी लटकी केलेली भांडणे, रुसणे, मनवणे सारे काही त्यावेळी आठवून मजा येते.
भेटण्यामुळे प्रेम वाढते. प्रेमाने भावाने दिलेली भेट बहिणी जीवापाड जपतात. अभिमानाने मिरवतात. आईचे प्रतिबिंब म्हणजे तिची मुलगी असे मानले जाते. म्हणूनच आई आणि मुलाच्या नात्याइतकेच सुंदर आणि पवित्र, जवळचे नाते भाऊ बहिणीचे ! शाळेत, कॉलेजमध्ये हा भाऊ एखाद्या बॉडीगार्ड सारखा स्ट्रॉंग वाटतो, तर बहिणीची पाठवणी करताना तितकाच हळवा असतो. हे नाते काही विलक्षणच असते. या नात्यातील गंमत, ओढ, प्रेम,आदर, त्याग, काळजी या सर्व सुंदर गोष्टींचा संगम इतर कुठल्याच नात्यात नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे सुंदर, प्रेमाची नाती जोडण्यास ह्या सणामुळे आपल्याला संधी मिळते. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य, आदर, प्रेम, असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.
पूर्वी फोन, इंटरनेट, कुरिअर या सुविधा नव्हत्या तेंव्हा दूर, परगावच्या बहिणीना राखीपौर्णिमेला भावाला येऊन राखी बांधणे शक्य नसेल तेंव्हा पोस्टाने या राख्या पाठवायच्या. भाऊ देखील या पोस्टमनची अगदी आतुरतेने वाट पाहायचा. पोस्टमन म्हणजे अगदी देवदूतच होता आणि पोस्टमनदादा सुद्धा कितीही ताण असला तरी
भावाबहिणीच्या प्रेमाचा आदर ठेवून वेळेत ती पोहोचती करायचा.
हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.
द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छा पत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम ! आपल्या बरोबरंच आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांना भगिनी प्रेमाने राख्या बांधतात. आपल्या पाठीशी राहुन रक्षण करणाऱ्या देवांनासुद्धा महिला राख्या बांधतात.
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या सारख्या राज्यांमध्ये बहिणींना भावाकडे जाण्यासाठी सोय म्हणून या दिवशी सर्व महिलांना बससेवा मोफत असते. आता जाहिरातीचा जमाना असल्यामुळे या सणाच्या निमित्ताने ‘कुछ मिठा हो जाये’ सारख्या असंख्य सुंदर जाहिराती ठिकठिकाणी झळकत असतात. बँक, सरकारी ऑफिसेस यानिमित्ताने कित्येक सुंदर योजना राबवतात. कित्येक ज्वेलर्स सोन्याचांदीच्या आकर्षक राख्या बनवून त्यांच्या जाहिराती करतात. कित्येक इव्हेन्टस् साजरे होतात.
आता स्त्रीया खूप सक्षम, जागरूक झाल्या आहेत. स्वतःचे रक्षण, काळजी घेण्यास समर्थ झाल्या आहेत. असे असले तरी अजूनही हुंडाबळी, महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचे शोषण या गंभीर समस्या नष्ट झालेल्या नाहीत. बरेचदा दिखाव्यासाठी ‘रक्षाबंधन’ इव्हेन्टस् या एका दिवसापुरते साजरे केले जातात. हे तेवढ्यापुरते न करता मनापासून जबाबदारीने मानलेल्या भगिनींचे रक्षण केले जाईल, त्यांच्या समस्या सुटतील तेंव्हाच हा सण साजरा करण्याचा हेतू सफल झाला असे म्हणता येईल.

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800