कधी जेष्ठ कधी धाकटं …
मुलाचं लग्न आहे आमच्या
कांही कसर राहता कामा नये….
गेल्या पिढीपर्यंत याद्या करतांना विहिणबाईंचे समारोपाचे असे बोलणे असे !
नि एकुलत्या एक मुलीचे लग्न आहे
कांही कसर राहता कामा नये… आजकालच्या आईबापांचे एकमेकांना बजावणे !
लग्नापासून ही न दिसणारी कसर
चिकटते ती कायमची !
कौटुंबिक आयुष्याचा बळी देऊन
उरापोटी धावायचे
आणि कुटुंबासाठीच करतोय, कसर रहाता कामा नये म्हणायचे !
पार्ट्या सहली झोकांत.
पण घरगुती समारंभ वेळ नाही म्हणून टाळायचे ! वेळ सोडून सारे कांही मुलांना द्यायचे. कसर करायची नाही. दोघांनी ठरवायचे !
साठीनंतर एकदम उपरती… ‘स्वतःसाठी जगा’ चे रकानेच्या रकाने सोशल मिडियावर लावायचे. आरोग्य, खाणे व आयुर्वेद यांचे रतीब घालायचे. इतके की त्याचा उबग येईपर्यंत. अजिबात कसर नाही ठेवायची !
अखेरची काडी लावतांना झाले का सर्व..
कुणाचे तरी विचारणे.
नि शेवटपर्यंत कसर काय ते नाही समजले.
पण ठेवू नका बरं
सरणावर पुटपुटत असेल कां कुणी शंका मज सदैव सतावते !

– रचना : नीला बर्वे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800