मार्च 1995 ते सप्टेंबर 1998 अशी साडेतीन वर्षे कर्क रोगाशी झुंज देऊन 19 सप्टेंबर 1998 रोजी अनंताच्या अगम्य प्रवासाला निघून गेलेल्या, माझी पत्नी लीनाचं आज पंचविसावं पुण्यस्मरण !
तिचा जन्म 18 ऑक्टोबर 1951 रोजी झाला. असोरे, गुहागर, चिपळूण या ठिकाणी तिचे शिक्षण झाले. तिने संस्कृत विषय घेऊन 1973 मध्ये B. A. पदवी प्राप्त केली. आमदार डॉ. श्रीधर नातू आणि तिचे काका डॉ. वि. ग. निमकर यांच्या शिक्षण संस्थेच्या, ‘ माध्यमिक विद्यालय ‘, आबलोली ( ता. गुहागर ) येथे तिनं दोन वर्षे संस्कृत विषयाची अध्यापिका म्हणून नोकरी केली.
6 जुलै 1975 रोजी आमचा विवाह झाला.
मला मुंबई, पुणे अशी मोठी शहरे आवडत नसल्यामुळे मी त्यावेळेस नासिक येथे कायमचा स्थायिक होण्याच्या दृष्टीनं गेलो होतो. मात्र, तिला नासिकचं थंड हवामान मानवेना. बाराही महिने तिच्या शरीराला भेगा पडत; आणि थंडीच्या दिवसांत तर त्यातून रक्त येत असे. काही वर्षांनी तिथल्या हवामानाशी ती रुळेल असं वाटत होतं. पण तशी शक्यता नसल्याचं स्पष्ट झाल्यावर, 1982 साली मी मुंबईत आणि 1983 साली आम्ही डोंबिवलीत आलो.
दरम्यान 1981 साली तिनं नासिकच्या अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालयात प्रवेश घेऊन 1982 साली प्रथम वर्ग मिळवून (आणि तिच्या महाविद्यालयात प्रथम येऊन) B. Ed. ही पदवी प्राप्त केली.
डोंबिवलीत तिची धाकटी बहिण अंजली ( अल्पना बापट ) ज्या चाळीत रहात असे, त्यात राहणाऱ्या दीपाली काळे यांच्या पुढाकारानं तिला येथील ‘ राष्ट्रीय शिक्षण संस्थे ‘ च्या ‘ स्वामी विवेकानंद विद्यालय ‘ त संस्कृत आणि भूगोल शिक्षिका म्हणून 1984 च्या नोव्हेंबरमध्ये नोकरी मिळाली.

येथून तिचं स्वत:चं व्यक्तीमत्त्व सिद्ध होऊ लागलं !
शासकीय नियमानुसार, पहिली तीन वर्षे तिला दरवर्षी वर्षा अखेरीस राजीनामा देऊन परत नव्या वर्षी नव्यानं रुजू व्हावं लागत असे. पण प्रशासनावर पकड असणाऱ्या आणि तिच्या बद्दल जिव्हाळा असणाऱ्या मुख्याध्यापिका सुहासिनी कुलकर्णी यांनी नियमांचा अचूक फायदा घेत तिला लवकरच नियमित सेवेत रुजू करून घेतलं.
ती एक समर्पित वृत्तीनं काम करणारी शिक्षिका होती. तिचे वडील गो. शं. मुकादम हे ही प्राथमिक शिक्षक होते; आणि मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. आमच्याकडेही आम्हा सर्वांना शिकवण्याची हौस होती.
तिला नोव्हेंबर 1984 मध्ये या नवीन ठिकाणी रुजू व्हायचं होतं; हे आम्हाला साधारण तीन महिने अगोदरच कळलं होतं. 1975 पासून 8 वर्षे ती या व्यवसायात नव्हती. म्हणून आम्ही आठवी, नववी, दहावीची संस्कृत विषयाची पुस्तके विकत आणून तिनं त्या पुस्तकांचा कसून अभ्यास केला. लग्नापूर्वी 2 वर्षे तिनं तो विषय शिकवला होताच. म्हणून मुलाखातीच्या वेळेस तिला वर्गावर शिकवून दाखवायला सांगितल्यावर त्या वर्गाचा चालू धडा शिकवला.
लग्नापूर्वी तिचं वेतन रु. 350 /– च्या आसपास होतं. ती नव्यानं रुजू होताना तिला जवळ जवळ चार आकडी वेतन मिळणार हे कळल्यावर तिच्या अंगात उत्साह संचारला ! याची आठवण अजून सुहासिनी कुलकर्णी सांगतात !
तिला शिकवण्याची जन्मजात आवड होतीच. B. Ed. तिनं प्रथम श्रेणीत पूर्ण केलं होतंच. तिनं अत्यंत उत्साहानं शिकवायला सुरवात केली.
आम्ही रोज रात्रीचं भोजन कटाक्षानं एकत्र घेत असू, त्यावेळेस आम्ही विविध विषयांवर चर्चा करत असू. संस्कृत ही मृत भाषा म्हणून गणली जाते. पण मराठी आणि बहुतांश भारतीय भाषांत संस्कृत शब्द किती विपुलतेने आहेत; ती किती लवचिक आहे; व्याकरणाचे नियम नीट समजावून घेतले तर गणितासारखे या विषयातही 90 च्या वर गुण मिळवता येतात; रोजच्या व्यवहारात या भाषेचा कसा उपयोग होतो; या गोष्टी ती विद्यार्थ्यांना पटवून देणे, असे अनेक मुद्दे आम्ही चर्चेत घेत असू. त्यावेळेस 8 – 9 वर्षांची असलेली आमची मुलगी अदिती ही या चर्चा लक्ष देऊन ऐकत असे. ती एखादा प्रश्नही विचारात असे. त्याचाही फायदा तिला होत असे.
लीना तिच्या वागण्यानं कोणाचंही मन सहज जिंकूत घेत असे. संस्थेतील उच्च पदस्थांपासून सर्वात लहान स्तरावर असणाऱ्या कर्मचार्यांशीही तिची वागणूक आपुलकीची असे. तिला संसार, व्यवहारातील अनेक गोष्टींची माहिती असे. झाडं झुडपं, ग्रह तारे अशाही गोष्टींत तिला भरपूर माहिती असे. माझं वाचन आणि विविध क्षेत्रांतील नामवंतांशी असलेल्या ओळखी यांचाही तिला उपयोग होत असे. या मुळे ती लोकप्रिय होण्यास फार वेळ लागला नाही.
ज्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रश्न विचारण्याचा धीर होत नसे, असे विद्यार्थी शाळा सुटल्यावर, तिला भेटून शंकांचं निरसन करून घेत. या गोष्टीलाही तिनं कधी नापसंती दाखवली नाही. त्यामुळे रोज किमान अर्धा तास तरी ती शाळा सुटल्यावर शाळेत थांबत असे. शशिकांत भाटे यांच्यासारख्या जागरूक संस्था चालकानं या गोष्टीची नोंद घेतली नसेल तर नवलच ! नाबर, भाटे, कोल्हटकर अशा संस्था चालकांना तिच्या विषयी आदर असे.
शिवाय, मुख्याध्यापिका सुहासिनी कुलकर्णी, दीपाली काळे, शैलजा जोशी आणि तिचा एक घट्ट ग्रुप लवकरच जमला. त्यामुळे रोजच्या रात्रीच्या भोजनातील गप्पांत या ‘ तीन देवियां ‘ चा उल्लेख अपरिहार्य झाला !
सुहासिनी कुलकर्णी या बुद्धिमान तर आहेतच; शिवाय, त्या उपक्रमशीलही आहेत. नवनवीन शैक्षणिक कल्पना राबवण्यात त्यांना उत्साह वाटे. त्यात दीपाली काळे यांच्या बरोबर त्यांना लीना हक्काची आणि विश्वासू सहकारी वाटू लागली ! या चौघीही हाडाच्या शिक्षिका होत्या.त्यामुळे त्या काळात कुलकर्णी बाईंनी राबवलेल्या अनेकानेक उपक्रमांत हस्ते परहस्ते तिचा सहभाग असे. इतकेच काय; क्वचित मी ही त्यांच्या उपक्रमांना हातभार लावलेला आहे.
आमच्या चर्चांत विषय मनोरंजक पद्धतीनं गेला पाहिजे, यावर भर असे; आणि संस्कृत असो वा भूगोल; यांचा दैनंदिन आयुष्याशी कसा संबंध आहे, हेही विद्यार्थ्यांना पटलं पाहिजे यावर जोर असे. त्यामुळे माझ्या वाचनात आलेली माहिती, बातम्या या मी तिला सांगत असे. तीही या गोष्टींचा चातुर्यानं उपयोग करत असे.
ती गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असे. गरज पडल्यास ती पैसे न घेता जादा शिकवणी उपलब्ध करून देत असे. क्वचित, तिनं गरजू आणि लायक मुलांची फीही भरलेली आहे. वा जादा तासाचं संस्थेकडून मिळणारं मानधनही स्वीकारलं नाही.
त्यामुळे साहजिकच, ती विद्यार्थी वर्गात अत्यंत लोकप्रिय झाली. मुलं तिच्यासाठी जीव टाकू लागली. आज तिच्या निधनाला 25 वर्षे झाली तरी तिच्या जुन्या सहकारी शिक्षिका वा आम्हाला अपरिचित असलेला विद्यार्थी भेटला तर तो तिच्याविषयी किती भरभरून बोलतो हे बघितलं की अदिती आणि मी थक्क होतो !
तिच्याकडे शाळेतील फलक लेखन आलं. त्यात दररोज शेवटी एखादा विनोद टाकत जा, असं मी तिला सुचवलं. ‘ महानगर ‘ या सायंदैनिकात दररोज 5 / 6 विनोद येत असत. ते मी आदितीसाठी सर्व कापून आणि चिकटवून ठेवले होते. त्यांचा तिनं या लेखनात उपयोग केला.
त्यांच्या शाळेच्या वाचनालयासाठी दरवर्षी काही हजारांची पुस्तके खरेदी करात असत. दादरच्या ‘ आयडियल बुक संस्थे ‘ चे मालक कान्ताशेट नेरुरकर यांच्याकडे मी वामन देशपांडे याच्यामुळे नियमित जात असे. त्यांनी आम्हाला 20 % अशी भरघोस सवलत देऊ केली; शिवाय, त्यांच्या दुकानात दिवसभर थांबून आणि प्रत्येक पुस्तक चाळून विकत घेण्याचीही परवानगी दिली.
मग काय !
सुहासिनी कुलकर्णी, दीपाली काळे, अदिती आणि माझा एखाद्या रविवारी दिवसभर ‘ आयडियल ‘ वर मुक्काम असे ! असंख्य पुस्तके चाळून शाळेसाठी आम्ही उत्तम, माहितीपूर्ण, मनोरंजक पुस्तके खरेदी करत असू. दर दोन तासांनी कान्ताशेट आम्हाला चहा पाजत असत; क्वचित दुपारचं भोजन देत असत.
शिवाय, तेथे दिवसभरात येणाऱ्या प्रा. शंकर / सरोजिनी वैद्य, श्रीनिवास पंडित, वामन देशपांडे, डॉ. रवीन थत्ते, अशोक जैन अशा नामवंतांशी आमच्या भेटी होत आणि चहाबरोबर गप्पाही होत.
हा तर आम्हाला बोनसच असे !
मात्र, मार्च 1995 मध्ये तिला कर्करोगाची बाधा झाली. डॉ. वि. ना. श्रीखंडे, माझा ज्येष्ठ आणि निष्णात भाऊ डॉ. अविनाश चान्दे यांच्यासारख्या मार्गदर्शनाखालीही तिचा कर्क रोग आटोक्यात न येता पसरतच गेला; आणि साडेतीन वर्षांनंतर, 19 सप्टेंबर 1998 रोजी तिचं निधन झालं !
या दिवसाचं हे पंचविसावं स्मरण !
जाता जाता …..
ती B. Ed. ला तिच्या महाविद्यालयात प्रथम आली होती. 16 वर्षांनंतर अदितीही तिच्या महाविद्यालयात B. A. ला राज्यशास्त्र विषय घेऊन प्रथम आली होती !
नामवंत संस्कृत शिक्षक, प्रौढ शिक्षण अभियानाचा ज्येष्ठ संचालक, चित्रपट गीतकार आणि माझा घनिष्ट मित्र डॉ. मुरलीधर गोडे हा मुलांना संस्कृत विषय शिकवताना या विषयात नापास होणं किती कठीण आहे, हे मनोरंजक पद्धतीनं पटवून देत असे.
याचाच आधार घेऊन, ‘ नापास होणं जर इतकं कठीण असेल तर 90 च्यावर गुण मिळवणं किती सोपं असेल ‘, असं प्रतिपादन करून तू मांडणी करत जा, असं मी लीनाला सुचवलं. ही तिची मांडणी खूपच लोकप्रिय झाली होती !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800