वर्ष सरतांना….मनात अनेक कडू गोड आठवणींचा कल्लोळ निर्माण होतो. नकळत आपले मन आढावा घेऊ लागते. यातूनच स्फुरलेल्या या काही कविता ..
१. इशारा व स्वागत
भविष्याच्या अनाकलनीय
वागण्याने डिसेंबर झडतो आहे;
मरणाच्या वाटेवर प्रत्येक,
दिवस निर्माल्यागत पडतो आहे l
पण जगण्याचा मोह सुटत नाही,
आपण काही नवं करीतच राहातो;
भविष्य तसं अथांग आहे म्हणून,
दुसरा दिवस आपल्याला पाहातो l
मात्र हे कुठेतरी थांबणारच ना,
आपण फक्त दाराशी उभं राहायचं;
आणि आलंच नव वर्ष तर मग,
डोळे भरून निवांत पाहायचं !
आगामी २०२३ चं सुस्वागत अन् शुभेच्छा.

– रचना : श्रीकृष्ण बेडेकर. इंदूर
२. वर्ष सरतांना…
वर्ष सरतांना मागं वळून पाहावं
मागचा वेध घेऊन पुढं चालावं
कडू आठवणी बाजूस सारावं
सुखद क्षणांना सतत स्मरावं
वर्ष सरतांना तुझं माझंपणा दूर व्हावं
आपुलकी एकीनं जगायचं ते शिकावं
तरच हे विश्व अवघं जगावं
खोलवर पाळंमुळं रूजणं व्हावं
आहे ते सर्व आपलं म्हणावं
प्रेम करत करत वाहून जाणं नसावं
नीतीमूल्य संस्कार पिढीवर घडवावं
माणुसकीच्या दुनियेत नव्याने पाऊल पडावं
जणू नववधूने उंब-यावरचं माप ओलांडावं
वर्ष सरतांना हेवे दावे सोडावं
का मागचं जुनेरं कवटाळून बसावं
जगा नि जगू द्यावं
हसा नि हसवत राहावं
सामाजिक योगदानात पुढं यावं
ममता माणुसकीच्या शोधात निघालेली काव्यवेल नित्य गगनी बहरावं फुलावं हेच ध्यास मनी बिंबवावं

– रचना : कविता बिरारी. नाशिक
३. वर्षाखेर
वर्षाची अखेर
चूक चूक लावून जाते…
निरंतर माळेतून
एक मोती गळतो आहे
तारखांच्या जिन्यातून
डिसेंबर पळतो आहे
काही चेहरे वजा अन
बर्याच आठवणी जमा
वयाचा पक्षी
आभाळी दूर उडतो आहे
हलकी हलकी उन्हे
अन् आक्रसलेल्या रात्री
गेलेल्या क्षणांवर
पडदा हळूहळू पडतो आहे
मातीचा देह
मातीत मिळण्यापूर्वी
हर मुद्द्यावर
इतका का आडतो आहे
अनुभवण्या पूर्वीच
सुटून जात आहे आयुष्य
एक एक क्षण जणु
ढग बनून उडतो आहे
तारखांच्या जिन्यातून
डिसेंबर पळतो आहे
माणसं भेटत गेली, मला आवडली
आणि मी ती जोडत गेलो
चला….
या वर्षाचा हा अखेरचा आठवडा
तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल
खुप सारे धन्यवाद
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या
नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या
आपली मैत्री कायम ठेवूया
आपली मैत्री कायम ठेवूया…

– रचना : खिल्लव सतीश
४. वर्षानुवर्ष
येती वर्षे जाती वर्षे,
सरुनी जाती बारा महिने ॥
उगा म्हणती नवी किरणे,
रवी अस्तात विरति स्वप्ने ॥
तीच धरती तेच तरु,
तेच अवकाश तेच तारे,
तीच अमावास्या तीच पौर्णिमा,
नित्य घडते पृथ्वीवर सारे ॥
वादळे येती पर्जन्य कोसळती,
भू फाटती ज्वालारस उफाळती,
झरे वाहती सागर उधाणती,
कालचक्र नित्ये असेच घडती॥
वेड्या मानवा, तू विसरूनी,
नव्या वर्षाच्या नव्या संकल्पना ॥
मनाच्या कप्प्यात रचतो जपूनी,
अधांतरी विसर चंचल भावना ॥
रात्र शेवटची होते जल्लोषात,
अश्याच हर्षात आयुष्याचे क्षण ॥
उगवत्या सूर्या तुला नमस्कार,
स्वप्ने पाहिली, ने पूर्णत्वात ॥
वर्ष सरते, मास उलटतात,
दिन उगवून रात्र संपते ॥
तास मिनिटे सेकंद गेले,
आयु मात्र अस्तास धावते ॥
सत्याचा मार्ग, कष्टाची कास,
सोनेरी दिवस नव्या उमेदीत ॥
डोंगरा मागील लाल गोळा,
उद्याचा सूर्योदय नव्या किरणात ॥

– रचना : सौ.वर्षा भाबल.
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सरत्या वर्षाला सलाम,येणाऱ्या इंग्रजी वर्षाचे स्वागत करूया,सर्व लेखक ,लेखिका,कवी,कवयित्री यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, असेच लिखाण तुमच्या हातून घडावे अशी मनापासुन इच्छा. 🌹🌹🌹🍫🍫🍫
धन्यवाद मनःपूर्वक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ह्रदयस्थ सर्व बंधू भगिनी लोकशाही न्यूज स्टोरी टुडे