नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात….सदरात आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
सध्या महाराष्ट्रात भोंदू बाबांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. आपल्याला जर अशा काही भोंदू बाबांचे काही “अनुभव” आले असतील तर ते आम्हाला अवश्य कळवा. या बद्दलचे आपले विचार असतील तर ते ही अवश्य लिहा. या निमित्ताने “भोंदूगिरीमुक्त महाराष्ट्र” घडविण्यासाठी आपला ही हातभार लागु शकेल.
“झेप” या सदरात प्रा डॉ मनिषा नितीन चाळसे यांची प्रेरणादायी जीवन कथा वाचून खूप वाचकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि वाचकांचे आभार.
आपल्या पोर्टल वर सुरू झालेल्या “माझी जीवन नौका” या सौ वेदवती कुलकर्णी यांच्या लेखमालेने पहिल्या भागापासूनच वाचकांची चांगलीच पकड घेतली असून, प्रत्येक भागाबरोबर वाचकांची उत्सुकता वाढत आहे, या बद्दल वेदवतीताईंचे अभिनंदन आणि सर्व वाचकांचे आभार.
तसेच “रेडिओ नगर” वर माझी जी मुलाखत प्रसारीत झाली होती, तिचे शब्दांकन माझे मित्र, जेष्ठ पत्रकार श्री शेषराव वानखेडे यांनी खूपच सुंदर, समर्पकपणे केले होते. त्यामुळे त्या शब्दांकनास वाचकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. रेडिओ नगर, श्री शेषराव आणि सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
आता पाहू या, गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ (संपादक)
झेप : 18
प्रा डॉ मनिषा नितीन चाळसे यांच्यावर मी (देवेंद्र भुजबळ) लिहिलेल्या यशकथेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत…
1
डॉ.मनिषा चाळसे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायक वाटतो. या मॅडमचा WhatsApp No. असेल तर पाठवणे. पुण्यात गेल्यावर मी त्यांना भेटेन.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ.ह. मु. लंडन.
2
Absolutely mind blowing!
— Dr.Sonali Pandit, Mumbai.
3
झेप : 18 वाचले.
मॅडम, खूप छान वाटले.
अभिमानास्पद व प्रेरणादायी !!
भुजबळ सरांनी छान लेखन केले आहे. सगळ्यांचे फोटो मनाला भावून गेले. आपल्या परिवाराची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व यशाची नव नवीन शिखरे सर करत राहावी हीच मनोभावे प्रार्थना !! 🌹🌹
— डॉ संजीवनी भालसिंग. नगर
4
खूप छान कौतुकास्पद अशी कामगिरी मनिषा, तुझ्या या उत्तुंग भरारी ला मानाचा मुजरा .यापुढेही तुझी ही विजयी घौडदौड अशी चालू राहो! आणि अशीच नवनवीन यशाची शिखरे तुझ्या कडून पादाक्रांत होवोत ही सदिच्छा.
परत एकदा तुझे मन:पुर्वक अभिनंदन आणि भविष्यातील पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👌🏻👍🏻🙏🏻🌹💐
— गणेश जोशी. छ. संभाजीनगर
5
वा वा क्या बात है,
फुरसतीत ऐकतो छान !
नितीनच्या मनीची मनीषा चांगली आहे म्हणून या मनीषाला घवघवीत यश मिळालं आणि मिळत आहे. दोघांचेही मुलांसोबत अभिनंदन 🎉🎉
— प्रशांत दिवेकर. पुणे
6
Manisha used to sit next to me in the school and was such a shy humble girl! Really happy and proud to see her reaching such heights ❤️
— Dr. Sonali Padhye.
7
मनःपूर्वक अभिनंदन मनीषा.
जानेवारी मध्ये पीएचडी झाल्याबद्दल तुझे अभिनंदन केले होते परंतु इतक्या अडचणींवर मात करून, जीवावरच्या दुखण्यातून उठल्यानंतर तू ते केले आहेस याची कल्पना नव्हती. तुझ्या जागी दुसरे कुणी असते तर त्याने नक्कीच पीएचडीसारखे अवघड काम सोडून दिले असते. पण तू ते नेटाने पूर्ण केलेस. त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन 👏👏💐🏆.
— सौ अस्मिता जोशी पाठक. छ. संभाजीनगर
8
वाचला लेख. उत्तम झालाय. तुमच्या फॅमिलीचे फोटो पाहायला मिळाले.
— सौ मृणाल दामले.
9
मनिषावर लिहिलेला वाचला. लेख खूप छान लिहिला. त्यांचे आणि आमचे खूप घरोब्याचे संबंध. चाळसे आत्या आणि मामा घरचेच वाटायचे. आत्याने तर माझ्यावर खूप माया केली. नगरची आठवण यायची, जायला मिळायचे नाही, आत्याकडे जाऊन आलं की मला खूप बरं वाटायचं. मुलांबरोबर छान वेळ जायचा. नितिन, मंजू, वैशू आम्ही खूप मजा केली आहे. पुण्यात एकदा गेलो होतो त्यांच्या कडे आत्याला भेटायला. इतका आनंद झाला होता त्यांना की बस….
— सौ संगीता किशोर विभुते. ह. मु.अहमदाबाद.
वेदवती कुलकर्णी यांच्या माझी जीवन नौका : भाग 3 वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…..
1
वेदवती,
“माझी जीवन नौका” या तुझ्या प्रांजळ आत्मचरित्र लेखनाचा भाग आज संध्याकाळी वाचला. या लेखनास प्रतिक्रिया काय पेक्षा कशी द्यावी या विचारात असतानाच येथील जी एस बी ग्रूप ने पाठविलेला कन्नड मधील विचार वाचला, “पित्रार्जित संपत्ती म्हणून तुम्हाला सोन्याचे पेन मिळाले तरी त्या पेनने काय लिहावयाचे याचे ज्ञान तुमचे स्वतःचेच असावे लागते.”
काय योगायोग आहे पहा.तुझे बाबा आणखी आम्हा विद्यार्थ्यांचे डी एस सर यांचेकडून, तसेच आईकडून आलेला *प्रज्ञा वारसा* निर्विवाद आहे.
या आत्मचरित्र लेखनाने तू हा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे चालवत आली आहेस🪷
— श्रीकांत जोग. मंगलोर
2
खूप सुंदर लेखन.
आपल्या आणि आपल्या आईच्या चेहऱ्यात खूप साम्य आहे. आपल्या जीवन नौके बरोबर आम्ही पण सांगलीला पोहोचलो.
🌹👌🌷
— ज्योती तळपदे. अमेरिका
3
वा !!!! खूपच सुंदर .अशीच लिहित रहा.मला खूप आवडले.वास्तवता काय असते याची थोडी थोडी कल्पना येते.
— सौ. सुरेखा म.कुलकर्णी. पुणे
(श्री म.अ. कुलकर्णी सर उर्फ स्वामी प्रज्ञानंद यांच्या पत्नी हे दोघे लेखिका वेदवती कुलकर्णी यांना आई-बाबांच्या ठिकाणी आहेत.🌷🙏)
4
वेदवती-प्रज्ञा,
तुझ्या जीवन नौकेचा पहिला भाग मला दिसला नाही. पण दुसरा आणि तिसरा आलेला आहे. वाचून झाल्यावर तुला कळवते.
बाळा,
किती म्हणून तुझ्यात कला असाव्यात. मी थक्क होते. तुझ्या शब्दांना अर्थ आहे, वजन आहे, माधुरी आहे आणि सच्चेपणा आहे.
आता माझे थकायचे दिवस चालू झालेत. वाचून झाल्यानंतर नक्की अभिप्राय कळविन.
काही दिवसापूर्वी प्रसन्नाची भेट झाली. बाबांच्या आठवणींनी हळवा झाला होता. मी म्हटलं लिहून काढ . पण तू चांगलं लिहिशील असं रेवतीचं मत पडलं…
लिहित रहा. चांगली माणसं समाजापुढे आलीच पाहिजेत.
— सुलभा रघुनाथ कुलकर्णी.
(वय 90 ला आलेलं. उत्तम लेखिका, कवयित्री, ड्रॉइंग पेंटिंग कलावंत,
म गांधींच्या तत्त्वज्ञानाने भारून वर्ध्यात पतीबरोबर भरपूर सामाजिक कार्य केलं. स्वातंत्र्य लढ्यात भाग.)
5
मॅडम, नेहमीप्रमाणेच खूप छान !
तुमचे लेख फेसबुक वर तर वाचतच असते, मात्र आता तुमचा लेख न्यूज स्टोरी टुडे वरही वाचायला मिळाला ह्याचा आनंद झाला !
🥲👏😊👏
— प्रा. मधुरा वालावलकर हळदणकर.
(लेखिका वेदवती कुलकर्णी यांच्या विद्यार्थिनी)
6
वेदवती,
किती छान सगळं डोळ्यापुढे उभं केलंस !
तुझ्या माहेरची ओळख नव्हती. पण सासर कडची सगळी नावं परिचित. जास्त डीटेल्स समजल्या. खरोखर समृद्ध, कृतार्थ आहेस तू! छान वाटलं सगळा भाग वाचून.
— डॉ मीना लागू. अमेरिका
7
माझी जीवन नौका याचे दोनही भाग वाचले. वेदवतीची भाषा ओघवती तर आहेच पण साधी आणि सरळ आहे. ज्या काळात आजच्या सारखी संपर्काची साधने उपलब्ध नव्हती त्या काळात जहाजावर काम करणाऱ्या इंजिनिअर बरोबर संसार करणे हे तसं धाडसाचं म्हणावं लागेल. तरीसुध्दा तू ते केलंस. अनेक रोमांचक आणि रोमहर्षक प्रसंगातून तुला जावं लागलं असणार हे तुझ्या लिखाणातून दिसतच आहे. प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरे जात असताना तुझी मानसिक स्थिती काय असेल याची आम्ही फक्त कल्पनाच करू शकतो. आता त्या गोष्टींना उजाळा देताना तुला काय वाटत असेल हेही तू विदित करावेस. एखाद्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीला सामोरे जातानाची भावावस्था आणि आत्ताची भावना यांचा जरुर मागोवा घ्यावा. आम्ही वाचक या घटना वाचतो आणि त्याना आमच्या पद्धतीने प्रतिसाद देतो पण मी म्हणालो तसं तुझा प्रतिसाद मला महत्त्वाचा वाटतो.
— डॉ मोहन दिवेकर. कोल्हापूर
“परिस्थितीपेक्षा मनस्थिती महत्वाची” या शब्दांकनावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…
1
प्रिय देवेंद्र काका, “परिस्थितीपेक्षा मनस्थिती महत्वाची” हा आपला जीवनप्रवास, विशेषतः आपल्या जीवन संघर्षातून यशस्वी करियर निवडून, आपली सध्याची परिस्थिती किती बिकट आहे ह्यावर लक्ष केंद्रित न करता त्यातून प्रगती चे मार्ग कसे निर्माण करून आपले ध्येय साध्य करता येईल, शेषराव वानखेडे लिखित लेख वाचला.
अतिशय सुंदर आणि आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त नोकरीला आपल्या करिअर मध्ये स्थान न ठेवता विविध क्षेत्र आपल्या सार्वत्रिक प्रगतीच्या अनुषंगाने इतर संधी देखील किती महत्वाचे भूमिका निभाऊ शकतात ह्याबद्दल महत्वाचे टिपण दिले आहे. आजची पिढी तुमच्या पिढी इतकी मेहनती किंवा परिस्थितीशी दोन हात करणारी नाही कारण त्यांच्याकडे ते धैर्य नाही जे तुमच्या पिढी ने दाखवले. परंतु तुम्ही छान शब्दात आजच्या पिढीला यशस्वी होण्यासाठी खरोखर काय करण्याची आवश्यकता आहे हे नमूद करून चांगले मार्गदर्शन केलेत.
आपले पुन्हा एकदा धन्यवाद…
— प्रतीक रा. जाधव. उलवे, नवी मुंबई
2
माननीय देवेंद्रजी, ह्या मुलाखतीमधून तुमचे बहुमोल कार्य आणि तुमचे सकारात्मक विचार समाजासमोर आले, तुमचा विस्तृत परिचय झाला, ह्यासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन आणि मुलाखतकारांचे व संयोजकांचे मनःपूर्वक आभार. मुलाखत शब्दांकित करून आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल माननीय वानखेडे सरांना खूप खूप धन्यवाद. देवेंद्र सर, तुमच्या पुढच्या सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपूर
3.
नमस्कार सर,
रेडिओ नगरच्या ‘नगर डायरी ‘ या कार्यक्रमांतर्गत आर.जे.नी घेतलेल्या आपल्या सर्वंकष मुलाखतीचे तपशीलवार वर्णन श्री. शेषराव वानखेडे यांनी फार सुंदर केले आहे. विक्रेत्यापासून सुरु झालेला आपला जीवनप्रवास पत्रकारिता, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यात संचालक पदावर येऊन ठेपल्यावर ‘वेब पोर्टल ‘ निर्मिती, अकरा पुस्तकांचे लेखन अशी भरारी घेत अजुनही सुरुच आहे.
विविध क्षेत्रांतील आपली मुशाफिरी यशस्वीरित्या चालू आहे. हे सारे वाचताना खूप छान वाटत होते. ‘परिस्थितीपेक्षा मनस्थिती महत्त्वाची!’ हे आपले तत्त्व शंभर टक्के सत्य आहे.मीही त्याचा अनुभव घेतलाय! आपल्या उत्तुंग कर्तृत्वाला माझे त्रिवार वंदन !
मेहबूब कासार यांचा ‘आजीबाईंची शाळा’ हा लेख खूप छान, प्रेरणा देणारा आहे.
लिमका बुकात नोंद झालेली आजीबाईंची शाळा काढून श्री. योगेंद्र बांगर सर थांबलेले नाहीत तर, ‘भाकरीची शाळा’, ‘आईची शाळा ‘ असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. अतिशय स्फुर्तीदायी आहे. माहितीपूर्ण लेख.
— श्रद्धा जोशी, डोंबिवली.
4
आपली मुलाखत आवडली.. अगदी योग्य शब्दात संदेश दिला आहे…मनस्थिती ही परिस्थितीपेक्षा केव्हाही श्रेष्ठच..
— स्वाती वर्तक, मुंबई.
अन्य प्रतिक्रिया…
1
आपला लेख वाचून आशाताई भोसले यांच्यावर आयुष्यात ओढवलेल्या संकटाची माला समजली. किती धीरोदात्तपणे त्यांनी हे सोसले. एक एक अवयव निकामी झाल्याने निधन झाले असले तरी, त्यांचा स्वर्गीय स्वर मात्र नक्कीच आपल्या बरोबर राहील. 🙏🏻
— प्रा डॉ सतीश शिरसाट. लंडन
2
आशा भोसले यांच्या वरील श्री देवेंद्र भुजबळ आणि प्रा डॉ पांढरीपांडेजींचा, हे दोन्ही लेख भावपूर्ण दोघांनीही भावपूर्ण लिहिले आहे. मित्रमंडळीत वाद होत असत. श्रेष्ठ कोण ..खरे आहे ..पण हे मात्र तेवढेच खरे, आयुष्यात सोसलेल्या चटक्यांनी त्यांचे मन इतरांविषयी कनवाळू, मायाळू प्रेमळ झाले होते त्याचे असंख्य किस्से मी प्रत्यक्षदर्शी ऐकले, बघितले आहेत. पंचम दा यांचा फ्लॅट अगदी आमच्या घरासमोरच्या इमारतीत असल्याने काही गोष्टी जवळून कळत.
वसुंधराताईंनी मांडलेली दुसरी बाजू उत्तम ..
अशी दृष्टी प्रत्येकीने तयार करायला हवी ..
बघता यायला पाहिजे …
समजून घेता यायला पाहिजे .
नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात!
फेसबुक फ्रेंड ..
कविता अगदी आजच्या काळाला छान साजेशी आहे. आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई.
3
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या कार्याची सविस्तर माहिती देणारा लेख अतिशय उत्तम आहे. त्यांना शतशत वंदन आणि माननीय देवेंद्र भुजबळ सरांचे हार्दिक अभिनंदन. सर्वच रचना, लेख खूप छान आहेत. सुंदर विशेषांक .
— मृदुला राजे. जमशेदपुर.
4
आशाताईंच्या जीवनावरील लेख खूपच मन हेलावून टाकणारा आहे. सर्व माहिती असले तरी वाचताना प्रत्यक्ष त्यांनी हे सगळे आयुष्यात कित्ती ,कसे सोसले असेल आणि त्यातून सुद्धा त्या कायम हसतमुखच डोळ्यांसमोर असत. 🙏
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
5
विजय होकर्णे यांनी थोडक्यांत पण अचूक शब्दांत शरदरावांचं गुणवर्णन केलंयं, त्याबद्दल शरदरावांबरोबरचं होकर्णेचंही कौतुक करायला हवं.
गोड बोलून आपली, शासनाची मतं पटवून देण्याची कला या दोन्ही लहानथोर भावंडांनी जोपासली, वाढवली आणि त्याचाच हा सन्मान आहे, या होकर्णेच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे आणि या विषयाला देवेंद्रजी आपण पुष्टी दिलीत,त्याबद्दल तुमचेही आभार.👍💐💐👍
— वीणा गावडे. मुंबई.
6
जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेल्या श्री. शरद चौधरी सरांचा खूप सुंदर जीवन परिचय करून दिला आहे. खूप छान लेख वाचून त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला. चौधरी सरांचे हार्दिक अभिनंदन आणि ८० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व सप्रेम नमस्कार. जीवेत् शरदः शतम्! 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपुर.
7
मोर्चे पक्षांचे, हाल सामान्यांचे !..
1
Wnderful piece. Whatever you have expressed was on the tip of my tongue. 👍
— Dr Rajan Harshe. ex VC
2
आपण केलेले विश्लेषण मला नेहमीप्रमाणेच खूप आवडले. आपण स्पष्ट बोलता व वस्तुस्थिती परखडपणे सामोरे आणता. एखाद्या घटनेचा आपण चहुंअंगी विचार करता त्यामुळे वाचकांना तो विषय मनातील गैरसमज दूर करून समजण्यास सोपा जातो. कोणत्याही पक्षाला झुकते न देता आपण जे निवेदन करता ते इतर पत्रकारांपेक्षा वेगळे असते.
3
आपण वेळोवेळी मला आपले लेख पाठवता त्याबद्दल धन्यवाद
— डॉ गीता काटे.
सर्व सामान्य माणसाचा आवाज डॉ पांढरीपांडेजींनी मोकळा केला आहे.
4
युवर ऑनर ….आता तरी जागे व्हा ….. धन्यवाद प्राध्यापक पांढरीपांडेजीं.
अतिशय प्रेरणादायी कल्पना.. खरेच का असे चित्र दिसते, पुस्तकांचे गठ्ठे घेऊन बसलेले लोक….किती आशादायी ..उत्तम … नीलाताई
वेदवती ताईंची..ग्रंथ महिमा …कविता आवडली.
— स्वाती वर्तक, मुंबई.
श्री गजाभाऊ लोखंडे यांच्या “तसे दिवस, असे दिवस” या कवितेवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
1
कवीवर्य गजाभाऊ लोखंडे,
खूप छान आणि सुंदर …
शब्द खूप छान जमले आणि वाक्य रचना ही खूप सुंदर जमली आहे.
— विवेक घोसाळकर. निवृत्त अधिकारी, वरळी पोस्ट ऑफिस.
2
मस्त लिहिली आहे कविता, थोडक्या शब्दात छान मांडणी. पूर्ण निवृत्ती डोळ्यासमोर आली.👍🏻👏🏻.
— रोहन शांताराम लोखंडे. घणसोली
3
व्वा, सुंदर, परखड सत्य मांडले आहे, बढिया, दिल हुवा 👌🌹
— कवी संजय उपासनी. नाशिक
4
“वा ! छान केलीये कविता” 💐😊
— अभिनेत्री सीमा फडके. कल्याण
5
‘तसे दिवस, असे दिवस’
ही कविता काळाच्या ओघात बदललेल्या मानवी स्वभावावर आणि सामाजिक मूल्यांवर भाष्य करते. जुन्या काळातील निरागसता आणि आजच्या काळातील कृत्रिमता यातील फरक त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.
त्याच भावनेला अनुसरून, बदलत्या काळाचा वेध घेणारी ही एक समांतर कविता :
॥खेळ मांडला काळाने॥
तसे दिवस होते वेगळे,
ओठांत हसू आणि मनात माया,
साध्या सुध्या झोपडीतही,
मिळायची मायेची गार सावली अन काया.
एक घास असला तरी,
तो वाटून खाण्यात गोडी होती,
माणुसकीच्या नात्यांची तेव्हा,
भक्कम अन रेशमी जोडी होती.
असे दिवस आले आता,
महाल बांधले पण मनं आक्रसली,
हातात हात आहेत पण,
हृदयातील ओढ कुठेतरी विसरली.
मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आता,
सारे विश्व सामावून गेले,
शेजारचा माणूस रडतोय पण,
सांत्वनाचे शब्द मात्र हरवून गेले.
तसे दिवस होते साधे,
सत्य बोलण्याची नव्हती भीती,
कष्टाच्या भाकरीवर सुद्धा,
मिळायची समाधानाची प्रचिती.
कपाळावरचा घाम तेव्हा,
मोत्यांसारखा चमकत असे,
माणूस माणसाला भेटताना,
खरोखर मनापासून हसत असे.
असे दिवस आले आता,
स्वार्थाचा चष्मा डोळ्यावर चढला,
प्रगतीच्या या शर्यतीत पहा,
माणूस स्वतःलाच पार विसरला.
गजाभाऊ म्हणतात त्याप्रमाणे,
काळ बदलला, रीत बदलली,
कधीकाळी फुललेली माणुसकी,
आज काट्यांच्या कुंपणात अडकली.
कविता खूप आवडली. आभार
— अशोक धामणकर. चार्टर्ड अकौंटंट
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
