Saturday, January 31, 2026
Homeलेखविमान चालन संचालनालयाची कार्यपद्धती !

विमान चालन संचालनालयाची कार्यपद्धती !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍यांचा आज विमान अपघातात मृत्यू झाला. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या विमान चालन संचालनालचे प्रदीर्घ काळ संचालक राहिलेले आणि आपल्या पोर्टलचे नियमित कवी, लेखक श्री राजाराम जाधव यांनी सांगितलेली विमान चालन संचालनालयाची कार्य पद्धती आणि व्यक्त केलेले मनोगत. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— संपादक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍यांचे आज एका खासगी विमानाचे बारामती विमानतळावर अपघातात निधन झाल्याची बातमी प्रसार माध्यमातून संपूर्ण देशभर वा-यासारखी पसरली. अशी दुःखद घटना घडेल अशी पुसटशी कल्पनाही नव्हती.आज सकाळी बारामती विमानतळावर घडलेली घटना ही अतिशय दुःखदायक आहे. ही घटना कशी घडली याची सखोल चौकशी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमार्फत होऊन खरे सत्य यथावकाश बाहेर येईल. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बुलंद आवाज, खडतर – फटकळ स्वभावाचा नेता आता काळाच्या पडद्याआड गेला, यावर विश्वासच बसत नाही.

मला डिसेंबर १९९३ ते फेब्रुवारी २००६ पर्यंत शासनाच्या विमानचालन संचालनालयात वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळाली. या कालावधीत मला मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री व इतर मान्यवरांची शासकीय विमान व हेलीकॉप्टरने सुरक्षित हवाई प्रवासाची व्यवस्था करण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे महत्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासापूर्वी शासकीय विमान व हेलीकॉप्टर तांत्रिकदृष्ट्या सक्षम कसे राहील याची कटाक्षाने सर्व पुर्तता करण्यासाठी आवश्यक सूचना आमचे मुख्य वैमानिक, सहवैमानिक, सर्व मुख्य इंजिनिअर व त्यांचे सहकारी तांत्रिक स्टाफ आणि विमानाची देखभाल दुरुस्ती करणा-या कंपनीचे मालक – संचालकांना कटाक्षाने तंदुरुस्त राहतील असे निर्देश देण्यात यायचे.

याठिकाणी नमूद करावेसे वाटते की, राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचे राज्यात अचानक घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तातडीने जावे लागते. कधी कधी या महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याचे तपशील रात्री उशिरापर्यंत कधीही प्राप्त झाले तरी त्या दौऱ्याचे नियोजन करताना शासनाचे मुख्य वैमानिक, सहवैमानिक, इंजिनिअर, विमानतळ कंट्रोल रूम, विमानतळ सुरक्षा यंत्रणा, ज्या जिल्ह्यात दौरा असेल त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच अग्निशमन दल आदी सर्व यंत्रणांसोबत वेळेच्या आत समन्वयाने काम करावे लागायचे.

कधी कधी अशा अचानक ठरलेल्या ठिकाणी जाताना महत्वाच्या व्यक्तींना विमान वा हेलिकॉप्टरने प्रवास करण्यात काही मर्यादा असतात, त्या म्हणजे वातावरण पावसाळी – ढगाळ असेल तर विमान – हेलिकॉप्टर उड्डाणासाठी विमानतळ कंट्रोल रूमकडून परवानगी देण्यात येत नाही किंवा वातावरण निवळल्यानंतर परवानगी दिली जाते. तसेच ज्या विमानतळावर Night Landing – Take Off ची सुविधा उपलब्ध नसेल तर संध्याकाळी अंधार झाला तर हेलिकॉप्टर – विमान उड्डाण करण्यासाठी मुख्य वैमानिक – सहवैमानिकांची अडचण होते. त्यामुळे महत्वाच्या व्यक्तींकडून जर उड्डाणासाठी आग्रह केला गेला तर मुख्य वैमानिकांनी नकार दिला तर ते समजून घ्यायचे असते.

मात्र, एक दोन वेळा केवळ महत्वाच्या व्यक्तींच्या आग्रह वजा हट्टामुळे रात्री अंधार पडल्यावर विमानतळ धावपट्टीच्या दोन्ही बाजूला गॅसबत्ती अर्थात पेट्रोमॅक्सच्या उजेडात विमानाचे उड्डाण करावे लागले होते. परंतु असे उड्डाण करण्यासाठी आम्हाला किंवा विमानतळ प्राधिकरणाला अवगत करण्यात आले होते किंवा कसे याबद्दल माहिती मला नाही.

एखाद्या विमानतळावर Night Landing – Take Off ची सुविधा उपलब्ध नसेल किंवा महत्वाच्या व्यक्तींच्या आग्रहाला अशावेळी वैमानिकांनी स्पष्टपणे नकार देणे गरजेचे असते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह दोन वैमानिक व इतर सहप्रवाश्यांचा करूण अंत झाला, त्याबद्दल दादांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिवारावर दुःखाचा जो डोंगर कोसळला, त्या दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती मिळो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो.

राजाराम जाधव

— लेखन : राजाराम जाधव. निवृत्त सहसचिव
महाराष्ट्र शासन, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. That’s very true, while performing the duty we need to take care alot, or else this kind of incidence happened.

    Definitely this accident happened because of bad weather.

    Very sad to know about Ajit (Dada) Pawar.

    भावपूर्ण श्रद्धांजली to him 💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9