Friday, February 27, 2026
Homeसाहित्यशब्दफुले

शब्दफुले

शारदेच्या अंगणात शब्दफुलांची बाग बहरली. अक्षरवेलींवर ठाई ठाई लगडली शब्दफुले. रसगंधानी भरलेली, मोहक रंगानी रंगलेली, नाजूक टपोरी शब्दफुले.

या शब्दफुलांना अर्थ, काम, मोक्ष नसतो. पण ती शस्त्र , मंत्र व तंत्र म्हणुन वापरता येतात. सरस्वतीच्या प्रांगणात नवे नवे सारस्वत ही फुले गोळा करतात. एकेक गुंफतात, जोडतात. काना मात्रा वेलांटीने सजवतात. त्यातुनच काव्य, लेखन गद्य तयार होतं.यांना भावना असतात. पाझर फूटतो. मत्सर क्रोध, हळवेपणा सारे सारे जाणवते.शब्दांना जी भावना असते ती त्या लेखणीतून कागदावर, तोंडातून ऊमटते‌

कधी शब्दफुलांचे मोती होतात. त्यांची माळ गुंफता येते. ह्या अशा काव्यमाळा व त्यांच्यावर झालेले संस्कार यांनी मन मोहुन जाते. सहाजिकच आहे कारण शब्द, स्वर, यांना देवी सरस्वतीचाच स्पर्श आहे. शब्दब्रम्हाचाच तो अविष्कार. तिथे कर आपोआपच जुळतात.

शब्द शब्द निरखावा… वेचावा… ओंजळीत भरावा.. हलकाच एखादा झेलावा,… आणि अलगद् हळूवार जपावा.वापरायचा मोह होतो. पण… पारखुन वापरावा. एका गद्याला आकार , विचारांची झालर, सौंदर्य, रूप भावनेचा रंग. अहो !
काय नाही ह्या शब्दात. ?
काव्याच्या अर्थपूर्ण मौक्तिक माळा, रसभरित गद्य साकार करणारे हे शब्द साहित्याचे सारथीच आहेत.

कधी याला लवचिक शृंगाराचा जरतारी स्पर्श होतो आणि लावणी, शृंगारिक गीते आकार घेतात. कधी हेच शब्द शौर्यात नहातात व शाहीर पोवाडे मोठ्या वीरश्रीने साकारतात. हळूवार मायेची अंगाई, पाळणे, डोहाळगीते, करूणाष्टके काय काय आकार घेतं समजतच नाही पण मन मोहुन मात्र टाकते.
सारस्वत शब्दांशी खेळ मांडूनच बसतात, भावाने तो खेळ सजवतात, साहित्यात तो भाव सांडतात व साहित्य म्हणजे कूठे ठेऊ आणि कूठे नको अशीसुवर्णाच्या कोंदणात बसवतात.
मनाच्या तनाच्या जखमा बर्या करायचे सामर्थ्य सुद्धा या शब्द फुलात, शब्दमोत्यात आहे.

संतांच्या बरोबरीने आली शब्दफूले. भक्तीरसात न्हाऊन गेले वारकरी. अभंग ओवी भारूड किर्तनातुन प्रबोधन गाजले.जनाई, बहिणाई, मुक्ताई या शब्दांबरोबर खेळत दु:ख विसरल्या आणि त्यांचेच अलंकार सजवत राहिल्या. या शब्द सामर्थ्यावरच पांडूरंग त्या संतमहंतांचा बंधूसखा बनला. इतके संतसाहित्य भक्तीभावाने भारलेले होते.

ही शब्द फुले एखादी नववधू पत्रातुन माहेरी पाठवते. खुशाली कळवते. एखादी प्रिया आपल्या प्रियकराला संदेश देते, तर गुरू शिष्यांना सामर्थ्य देतात.काही शब्द मोगरा होत सुगंध ऊधळतात, काही गुलाब होऊन प्रीतरंगात नहातात, काही शब्द स्वत:च ज्ञानेश्वर बनतात व शारदेच्या शिरपेंचात मानाचे तूरे खोचतात.

खरं तर शब्द शब्द जपूनच ठेवावेत. अंत:करणाच्या गाभार्यात लपवून ठेवावेत. त्या गंधभरल्या मनाचा दरवळ जिवनाची खुमारी वाढवेल. संवाद, सोबत, सहवास हवा असेल तर शब्द ही एक हृदयस्पर्शी गुंतवणूक आहे. शब्दफुलांचे स्मृतीगंध मनात रूजायला मात्र हवेत.
किती बोलावे कौतुके ?

एकेक टपोर शब्दमोती गुंफला माळेत,
अर्पियला तिच्या सुंदर गळ्यात.
संत साहित्यात
भक्तीफुलांचा सडा सांडला,
गुंफूनी हार
पांडूरंगाला घातला.
शब्दफुलांच्या गालिच्यावर साहित्य बाळ खेळले,
स्वर गंगेच्या काठावर
गीत नवे ऊमटले.
मनमोर विभोर मयुरांचे
नाचले थवे,
हरपले भान
चमकले ज्ञानपीठाचे दिवे.
पखरण जादूची
शब्दांची ही असे,
सरस्वतीला सजवायाला कधी अपूरी नसे.

— लेखन : अनुराधा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती’: सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments