महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या ‘साहित्यकट्टा’ च्या ‘बोलका कट्टा’ या उपक्रमांतर्गत नुकतेच आयोजित केलेले कवी संमेलन जल्लोषात पार पडले. जागतिक मराठी अकादमीचे संस्थापक व ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि कार्यकारिणी सदस्य राजीव मंत्री, गौरव फुटाणे या मान्यवरांच्या उपस्थितीत व महाराष्ट्रातील विविध भागातील कवींनी संमेलनास खास रंगत आणली.
महाराष्ट्र मंडळ शिकागो ‘साहित्यकट्टा’ व जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने असे कवी संमेलन अमेरिकेत प्रथमच झाले.
माधव गोगावले यांनी सर्वांचे स्वागत करून महाराष्ट्र मंडळ शिकागो यांच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. गेली पाच-सहा वर्षे भारत व इतर देशातून खास साहित्यिक आणि कलाकार मंडळाच्या साहित्यकट्टा व बोलका कट्ट्यावर कार्यक्रम सादर करत आहेत. कोविड काळामध्ये २०२१ साली महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यक्षा उल्का नगरकर आणि त्यांच्या कार्यकारिणीने अनेक उपक्रम सुरू केले. आपल्या भारतीय संस्कृतीची व मराठी धर्माची जोपासना करण्यासाठी हे उपक्रम विशेषतः दर आठवड्याला होणारे अध्यात्म पीठ, साहित्यकट्टा, इतिहास मंच यासारखे अनेक कट्टे अजूनही आपल्या संस्कृतीची पुढील पिढीसाठी जोपासना व प्रबोधन करण्यासाठी जोमात चालू आहेत. या वर्षाच्या मंडळाच्या अध्यक्षा दिपाली सावंत यांच्या सकारात्मक पाठिंब्याने असे कार्यक्रम यशस्वीरित्या चालू आहेत.
भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकते. ‘साहित्यकट्टा’ मागचे उद्दिष्ट प्रामुख्याने अमेरिकेत मराठी भाषेची जोपासना करणे आणि वाचन-लेखनाद्वारे ती वृद्धिंगत करणे, सभासदांच्या मनात मराठी साहित्याविषयी गोडी निर्माण करणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या साहित्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देणे, ज्यांच्यात साहित्यिक दडला आहे त्याला जागृत करणे आणि अर्थातच उत्तम कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांचे मनोरंजन करणे हे आहेत.
संमेलनाचे सहआयोजक जागतिक मराठी अकादमीचे मान्यवर श्री. गौरव फुटाणे यांनी त्यांच्या संस्थेविषयी माहिती सांगितली. गेली अनेक वर्ष ही संस्था ‘शोध मराठी मनाचा’ हे संमेलन आयोजित करत आहेत. तरुणांना रोजगार मिळवून देणे, जगातील अनेक देशातील मराठी भाषिकांना एकत्र आणून विविध प्रेरणादायी आणि खास विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम करत आहेत.
श्रद्धा भट, अश्विनी खुंटे व मंजुषा पांडे यांनी कवींचा आणि माधव गोगावले यांनी जागतिक मराठी अकादमी कार्यकारिणीच्या मान्यवरांचा परिचय करून दिल्यानंतर कवितांची रिमझिम सुरू झाली.

श्रद्धा भट यांनी संमेलनाचे सुंदर निवेदन केले. श्रोत्यांना उत्तमोत्तम कविता ऐकण्याची एक पर्वणीच होती. कवी संमेलना बाबत त्या म्हणाल्या – “कला, साहित्य, काव्य नुसतंच मनाला सुखावतं असं नाही तर मनाला अधिक व्यापक आणि प्रगल्भ करतं. विविध कवींच्या कवितांमधून वेगवेगळं विश्व आपल्यासमोर उभं राहतं. जीवन त्यांच्या नजरेतून बघता येतं. म्हणूनच कवी संमेलनं महत्वाची असतात. कवींच्या तोंडूनच त्यांची कविता ऐकणे महत्वाचं असतं. कवितेमध्ये व्यक्त झालेल्या भावना थेट हृदयाला भिडतात आणि कवितेतल्या अनुभवाशी समरस करतात.” असाच काहीसा अनुभव श्रोत्यांना या कवी संमेलनातून मिळला.
काही कवींच्या शब्द मध्ये हलकेच आपल्याला त्यांच्या तरल जगात उचलून नेण्याची ताकद असते. अशी जादू दशरथ परब यांच्या ‘दूर मी कशी जाऊ’ व ‘वाटे इथून जावे’ या कवितेतून ऐकण्यास मिळाले. त्यांच्या “दूर मी जाऊ कशी पाकळ्यांचे श्वास ओले मोकळे झाले” ही ओळ मनाला खूप भिडून गेली.
काव्य हे देश, काळ आणि संस्कृती यांच्या चौकटीत फुलतं, त्याचे संदर्भ घेऊनच उलगडत असतं. तरीसुद्धा त्यातल्या अनुभवानं दिलेलं शहाणपण हे देश-कालातीत असतं. आता हेच बघाना, भारतातली स्त्री असो की अमेरिकेतली, कवितेत मांडलेल्या स्त्रीजाणिवा जगाच्या वेगवेगळ्या टोकावर राहणाऱ्या एकमेकींना सहज जवळ आणू शकतात. या स्त्रीजाणिवा वैश्विक स्तरावरसुद्धा समान आहेत असं जाणवतं.
अगदी अशाच असणाऱ्या अंजली कुलकर्णी यांच्या कविता ‘बदलत गेलेली सही’ आणि ‘तो ती आणि ते’ या कविता मधून ऐकण्यास मिळाल्या.
सही म्हणजे खरोखरच सही होती सगळ्यांना खूप भावली आणि ‘तो ती आणि ते’ ही कविता खूप हृदयस्पर्शी होती कविता ऐकतांना अंगावर काटा आला. समाज कसं याकडे पाहतो हे जाणवून हळहळ वाटली. आणि आता खरंच त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलत चालली आहे.
आपल्या सर्वांची आयुष्याशी सामना करतांना हार-जीत चालूच असते. मनात साचलेल्या भावभावनांचा निचरा बरेचदा कवितेमधून होतो. कवींसाठी तर होतोच पण कधी कधी ऐकणाऱ्या किंवा वाचणाऱ्यासाठीही होतो. कवी हृदयातले सल, दुःख, वेदना, आनंद, प्रेम, या भावना जेंव्हा भवताली बदलणाऱ्या निसर्गाच्या प्रतिमांमधून मांडतो तेंव्हा त्यांची अलगद अनुभूती ऐकणाऱ्याच्याही मनात उलगडते. असाच अनुभव श्रोत्यांना प्रकाश होळकरांच्या ‘ माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला’ , ‘पाणी मागावे नभाला’ , ‘असे कोणत्या दुःखाचे दिस आले बाई ’ या कवितांमधून आला. त्या अंतर्मुख करणाऱ्या कविता होत्या. दुष्काळग्रस्त भागातलं चित्र डोळ्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी अंगावर काटा आला. लोक तिथे कसं जगत असतील आणि म्हणजे अशा वेळेला काय होत असेल, खूपच सुंदर मातीतल्या निसर्गाच्या त्या कविता अप्रतिम होत्या आणि ‘माझे आभाळ तुला घे’ ती गायलेली कविता ऐकून असं वाटलं की एखादा असा प्रेमी शेतकरी छान अल्लडपणे शेतात त्याच्या बागेत गाणं म्हणत असावा.
माणसाला नातीगोती खूप महत्वाची असतात. नाती आयुष्यात उभं राहण्याची ताकद देतात. त्यातल्या त्यात बाप लेकीचे आणि माय लेकाचे नाते खूप घट्ट आणि तितकेच गोड. कधी कधी तर नाती रक्ताचीच असावी लागतात असेही नाही, मैत्रीचे किंवा आधार देणारे नाते सापडले तर ते सुद्धा तेवढेच खरे. असाच नात्यातला गोडवा आणि मिळणारा आधार श्रोत्यांना कवी रमजान मुल्ला यांच्या ‘ साक्षात्कार ‘, ‘ मुलगी म्हणजे गूज बोलते ‘‘ या कवितेतून अनुभवास आला. वडील आणि मुलीच्या नात्याची जी कविता आहे ते वडील आणि मुलीचं नाजूक नाते सुंदर शब्दांकन केले. प्रत्येक मुलीच्याच काय इथे अनेक श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
आपल्या आयुष्यात मार्ग काढतांना आलेल्या शहाणपणाचा अर्क ज्यात उतरला जातो ती म्हणजे गझल. गझला प्रत्येकाच्याच मनाला भिडतात आणि आपल्याशा वाटतात. त्याला कारण म्हणजे लयबद्ध पण सहज ओघवत्या शब्दांमध्ये आयुष्याने शिकवलेल्या अनुभवांचा सच्चेपणा त्यात ठासून भरलेला असतो. गझलमध्ये गुंफलेला एकेक शेर कवीचा व्यक्तिगत अनुभव असतो त्याचबरोबर ऐकणाऱ्याला कुठल्यातरी वैश्विक सत्याचा अनुभव देतो. कवी गोपाळ मापारी यांच्या गझला – ‘ पुण्याने शिवले ना मग, पापाने शिवले होते ’. ‘ किनारे,चंद्र,तारे,नभ,नद्या,ढग दाखवत असतो ‘. ‘हृदय भेदल्यावरही, पाणी लागत नाही ‘. त्यांनी आपलं अनुभवविश्व आपल्यापुढे गझलेतून चित्रित केलं.
आयुष्याकडे गंभीरपणेही पाहता येतं आणि मिष्कीलपणेही. मिश्कीलपणे पाहिलं, स्वतः वर हसत पाहिलं तर सगळे दुःख, सगळ्या खंती निवळतातच. मिश्किल दृष्टिकोन मलम लावण्याचे काम करतो, कवी इंद्रजित घुले यांच्या ‘ लग्नातलं जेवण ’ या कवितेने प्रेक्षकांच्या हास्याचे फवारे उडवले होते. काही वेळा झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगाकडे बघत जुन्या विसरत चाललेल्या साध्या साध्या सुंदर गोष्टींना लयाला जातांना पाहून हळहळ वाटते आणि ती कवितेमध्ये हताश, अगतिक उपहासानचे रूप घेऊन व्यक्त होते तेंव्हा जास्त मनाला भिडते. ‘ शिल्लक आहेत अजून रंग , ‘प्रॉपर्टीच्या नोंदीसाठी‘ या कवितेतून श्रोतांनी अनुभवले.
कवी संमेलनाच्या शेवटी सौ.अलका वठारकर यांनी या कवी संमेलनाचा सारांश गोड शब्दांकित केलेली शीघ्रकविता श्रोत्यांचे आकर्षण ठरले.
अश्विनी कुंटे यांनी कवी संमेलनाचा समारोप अतिशय सुंदर शब्दांनी केला.
जागतिक मराठी अकादमीचे ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य राजू मंत्री आभार मानताना म्हणाले ,“ मित्रांनो सर्वात पहिले आभार हे या तंत्रज्ञानाचे आहे की ज्या तंत्रज्ञानामुळे आपण सर्व वेगवेगळ्या देशातून आणि भारतातील सर्व वेगवेगळ्या प्रांतातून एकत्र आलो आहोत आणि सकाळी सकाळी मराठी भाषेच्या कविता ऐकत आहोत. दुसरं म्हणजे मराठी भाषेमुळे आपल्याला सर्व जगातील लोकांना एकत्र आणून ही सकाळ आनंदी झालेली आहे त्याचप्रमाणे यात सर्व सहभागी झालेले लोक आणि सर्व कवींचे मी आभार मानतो कारण पहिल्यांदाच जागतिक मराठी अकादमीने असा एक प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये श्री माधव गोगावले यांचे मी विशेष आभार मानतो की ज्यांच्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन कवितेचा आस्वाद घेऊ शकतो धन्यवाद असेच प्रकारचे आपण कार्यक्रम वेळोवेळी करत राहू. . आमची संध्याकाळ तुम्ही खूप सुंदर खुलवली. धन्यवाद.”
मंजुषा पांडे यांनी सुंदर आकर्षक परिपत्रक केले. महाराष्ट्र मंडळ शिकागो यांच्या वतीने मंजुषा पांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
कवी संमेलनाची सांगता ज्येष्ठ कवी आणि जागतिक मराठी अकादमीचे संस्थापक माननीय श्री रामदास फुटाणे यांच्या तरुणांसाठी सांगितलेल्या प्रेरणादायी शब्दांनी झाली.
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800
