१. शिक्षक
जीवनाच्या अंधकाराला मिटवतो हाच शिक्षक
जीवनाची वाट सुखकर ही बनवतो हाच शिक्षक
दाखवूनी धाक मारूनी छडी जर शिकवतांना
हाथ मायेचा हि डोक्यावर फिरवतो हाच शिक्षक
मंदबुध्दि लेकरांना शिकवण्या लागे कसौटी
सर्व विद्यार्थ्यांना युक्तिने शिकवतो हाच शिक्षक
मानधन थोडेच शिक्षण सेवकाचे आज ही पण
आपली स्थिती घराची ही लपवतो हाच शिक्षक
काम मत मोजायचे असो, असो जनगणाचे
नोकरी टिकण्यास जास्तीचे पचवतो हाच शिक्षक
देवुनी आकार चिखलाला धिराने संयमाने
थोर वैज्ञानीक पिढ़ीला ही घडवतो हाच शिक्षक
संस्थापक चालकाचा मानसिक जाचास सहुनी
शिकवतांना खूश राहूनी हसवतो हाच शिक्षक.
— रचना : अनिसा सिकंदर शेख. दौंड जि.पुणे
२. “गुरुपूजन“
गुरु घडवती शिष्यास
देऊन ज्ञान
गुरु माता गुरु पिता
तिसरे गुरुजन ।।धृ।।
गुरु दाविती प्रकाश
करिती सज्ञान
शिकवती आदर्श हातचे
ना राखून
संतोषती जेव्हा होई
शिष्याचा सन्मान।।1।।
गुरु शिष्याचे अमोल नाते
शब्दातीत मर्मबंधाते
जपूयाच सदा हृदयांत
परंपरा युग युगांची
राहे महान ।।2।।
गुरु देती प्रतिभा
दूरदृष्टी बुद्धी कान
उन्हात-सावली निराशेत
आशा किरण
देती बोधामृत स्मरूया
गुरूंचे ऋण ।।3।।
–– रचना : अरुण गांगल. कर्जत- रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
शिक्षक हे जीवनाला आकार देतात .त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सुरेख कविता अनिता शेख आणि गांगल यांनी सादर केल्या आहेत.