“साहित्य यज्ञ” हेच ध्येय असलेल्या शुभंकरोति साहित्य परिवाराचे एक दिवसीय रंगतदार संमेलन नुकतेच मुंबईतील दादर, माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाध्यक्षपद श्री हेमंत सुधाकर सामंत यांनी भूषवले होते तर श्री नीलकंठ श्रीखंडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे सर्वश्री. राजीव श्रीखंडे, श्री. गुलराज सिंग (ढगे), गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष श्री आप्पा ठाकूर या प्रसंगी उपस्थित होते.

संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन आणि संस्थेच्या संस्थापिका सौ. सोनाली जगताप यांच्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर स्वाती पोळ यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सर्व मान्यवरांना शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सर्व मान्यवरांनी यथोचित मनोगत व्यक्त केले.
त्यानंतरच्या गझल मुशायरा सत्रात श्री किरण वेताळ यांनी ज्येष्ठ गझलकार श्री ए. के. शेख सरांनी जुलै महिन्यात घेतलेल्या गझल कार्यशाळेचा आढावा घेतला.

त्यानंतर या कार्यशाळेत सहभाग घेतलेल्यांनी आपापल्या गझला सादर केल्या. राधिका भांडारकर यांनी अरुणा मुल्हेरकर यांची गझल तर सुनील पारेख यांनी गुजराती गझल सादर केली. श्री सुहास जगताप व संगीतकार गुलराज सिंग (ढगे) आणि गझल गायक आदित्य कडतने यांनी गझला गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सत्राचे सूत्रसंचालन दिपाली घाडगे यांनी केले.

पुढील सत्रात शिल्पा चऱ्हाटे यांचे “भेट तुझी माझी” आणि ऋचा पारेख यांचे “आत्मायन” या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

त्यानंतरच्या सत्रात विविध व्यक्तींना “शुभंकरोति गुणगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आले.

त्यानंतर श्री हेमंत सुधाकर सामंत यांचे अध्यक्षीय भाषण अतिशय प्रबोधन करणारे होते.
पुढील सत्रात गझलकार आप्पा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा रंगला यात निमंत्रित गझलकारांनी आपल्या बहारदार गजला सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यांची प्रत्येक गझल मनाला भुरळ पाडणारी होती. त्यांची सुप्रसिद्ध गझल “करार बाकी आहे” आणि “विठ्ठलाची गझल” ऐकून प्रेक्षक भारावून गेले. सूत्रसंचालन किरण वेताळ यांनी केले.
अंकिता गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केल्यावर राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप झाला.

— लेखन : अजित महाडकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800