नमस्कार
आज श्रीकृष्ण जन्म आहे. त्यानिमित्त या काही भक्तिपर कविता. सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
१) श्रीकृष्ण पाळणा
बाळा जो जो रे…
यदुराया देवकीच्या नंदना…
बाळा जो जो रे ॥धृ॥
श्रावणात वद्य सप्तमीला
मध्यरात्रीस कृष्ण जन्मला
उघडली दारे तुरुंगाची- ईश्वर कृपेने ॥१॥
बाळा जो जो रे….
जनक वसुदेव निघाला
घेऊन टोपलीत कृष्णाला
घनतमी वाट यमुनेची-मुक्त हो दैवाने ॥२॥
बाळा जो जो रे…
कवटाळी छातीशी कृष्णाला
सोडिला नंदगृही पुत्राला
खात्री होतीच नंदमैत्रीची- देवाच्या इच्छेने ॥३॥
बाळा जो जो रे…
ना इथे धोका मम बाळाला
कळता आल्या पावली गेला
ठेवून भावना सुरक्षेची- दुःखद मनाने ॥४॥
बाळा जो जो रे…
वार्ता गोकुळी सुप्रहराला
जाहला पुत्र नंद-यशोदेला
साखर वाटली पुत्रजन्माची- अत्यानंदाने ॥५॥
बाळा जो जो रे…यदुराया
देवकीच्या नंदना…बाळा जो जो रे..
— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली.
- २) जय श्रीहरी
मोरपीस खोवून शिरी
वेणू वाजवील श्रीहरी
गुंग करी स्वर लहरी
कदंबतरु ताल धरी
भुलवी ऐसे नरनारी
भरी भरी पिचकारी
उडवी रंग गिरिधारी
खेळवी हा रास बिहारी
रंगी न्हाली दुनिया न्यारी
अजीबसा प्रेमरंगारी
जन सारे नाम पुकारी
जय जय कृष्ण मुरारी
जो जो आला तुझ्या दारी
भुलवी भक्तीरंग भारी
भाव ओळखी हा रंगारी
षड्रिपुपासून निवारी
गोरी राधा सावळा हरी
एकरुप मन मंदिरी
राधेकृष्ण राधेकृष्ण
जपू जोवरी प्राण शरिरी
— रचना : विजया केळकर. नागपूर
३) कन्हैया ..
रे संभवामि युगे युगे
शब्द राखी मनमोही
महोत्सव जन्माष्टमी
कृष्णजन्म कारागृही
मुक्त केले माय बापा
स्वता का विरहसाही
जगत् तव अवताराने
बंदिस्त ऋणात राही
गोकूळवासी त्रस्तावे
धावा करे त्राही त्राही
हिशेब मांडी मामाचा
पाठवले त्या यम गृही
अनाकलनीय श्रीहरी
चौर्य कर्म लोणी दही
त्रैलोक्याचा तू स्वामी
मजा देखे दिशादाही
कालिया मर्दन करतो
नर्तनकरे यमुना डोही
अनंतऋण रे अनंताचे
शुभ हस्त ठेवला डोई
भागवत कथेत रंगता
सत्यरुपात येई ग्वाही
हरिनाम मुखे वदताचं
जाणीव ठाई ठाई देही
कृष्ण लिला अर्थपूर्ण
कन्हैया कळला नाही
मोहात पाडे भक्ताला
स्वतः श्री धर निर्मोही
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
