“सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात न ब्रूयात सत्यं अप्रियम
प्रियं तु नानृतं ब्रूयात एतद धर्म सनातन:“
सत्य बोला, प्रिय (गोड) बोला पण जे अरुचिकर असेल असे सत्य बोलू नका. प्रिय किंवा मनाला आनंद देणारे असत्य बोलू नये. हाच एक सनातन किंवा शाश्वत धर्म आहे.
सत्यं ब्रूयात: सत्य हे एका खणखणीत नाण्याप्रमाणे किंवा २४ कॅरेट सोन्याप्रमाणे असते. सत्य हे त्रिकालाबाधित असते. सत्य कधीच पराजित होत नाही.
महात्मा गांधी म्हणतात, ‘सत्य हाच ईश्वर आहे.’
सत्य किंवा खरे बोलणे केव्हांही चांगलेच असते पण अनेकदा माणूस खरे बोलण्याच्या नादात दुसऱ्याचा अपमान करत असतो. मला खरे बोलायला आवडते, म्हणत तो समोरच्यावर तोंडसुख घेतो आणि स्वतःचा अहंकार जपतो. खरं बोलण्याच्या खोट्या मग्रूरीत तो समोरच्याचे दोष/अवगुण दाखवत स्वतःच स्वतःची पाठ थोपटत हे सिद्ध करत असतो की हे दोष किंवा अवगुण माझ्यात नाहीत.
असं आचरण करणारा माणूस स्वतःच्या बाबतीत मात्र एकही उणा शब्द ऐकायला तयार नसतो. तो विसरतो की एक बोट समोरच्याकडे दाखवत असता बाकी बोटं आपल्या कडेच वळलेली असतात.
अनेकदा सत्य बोलण्याने एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळून तो जीवनात काहीतरी करून दाखवतो. एखाद्या निराश, हताश व्यक्तिला जर त्यांच्यातील चांगल्या गोष्टी किंवा गुण दाखवून दिले तर तो उत्साहित होतो. असे सत्य जरूर बोलावे. हेच या श्लोकातील हा भाग सांगतो.
प्रियं ब्रूयात् : नेहमी गोड आणि प्रिय बोलले पाहिजे. अथर्ववेदात सांगितलं आहे,
‘वाचा वदामि मधुवद् भूयांस मधुसदृशम्’
हे देवा माझी वाणी मधापरी गोड असावी. मी मधापरी गोड व्हावे. (माझं अस्तित्व मधासमान गोड व्हावे.)
वाणीचा गोडवा हा अतिशय आवश्यक आहे. हे लहान मुलांनांही कळतं. गोड बोलून लाडीगोडी लाऊन ती आपल्या मनाप्रमाणे आपल्या पालकांचे मन वळवून घेतात.
अशक्यातली कामेही ही गोड मधुर वाणी चुटकीसरशी करवू शकते.
‘हे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुर प्रिय..’
‘जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र’
हे समर्थ रामदासांनी म्हटलेलं वचन म्हणजे अमृतवाक्य.
मधाळ, रसाळ बोलणारा सगळ्यांना आपलंस करतो. सगळ्यांना समजून घेऊन लोकप्रिय होतो.

न ब्रूयात सत्यं अप्रियम् : सत्य बोलणं कितीही चांगलं असलं तरी मनाला न भावणारं, दुसऱ्याला दुखवणारं, न्यूनगंड उत्पन्न करणारं किंवा एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणारं सत्य कधीच बोलू नये.
अधू माणसाला, “तू अधू आहेस.” हे सत्य सांगून काय होणार ? त्याला त्याचे शारीरिक व्यंग माहित असताना असले सत्य बोलून काय हाशिल होणार? फक्त तो दुखावला जाईल या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही.
एका त्रस्त माणसाने ज्योतिषाला हात दाखवल्यानंतर प्रश्न विचारला,
“मला आयुष्यात कधी आराम मिळणार की नाही ?”
त्यावर ज्योतिषाने सांगितले, “काळजी नसावी सेवानिवृत्ती नंतर तुम्ही सुख, शांतीने निवांत आपलं आयुष्य जगणार आहात.” विचारणारा खुश. पण त्यात लपलेला अर्थ असा होता की “सध्या तुम्हाला आराम मिळणे नाही.” हेच सत्य त्या ज्योतिषाने किती वेगळ्या शब्दात सांगून त्या माणसाला आनंद दिला आणि जगण्याची आशाही.
एखादं मूल हुशार नसेल पण जर त्याला “तुझं कसं होणार ? आजकाल हुशार पोरांचा जमाना आहे. जरा काहीतरी कर. नाहीतर नुसता बसून राहण्याशिवाय तुला गत्यंतर नाही.”
हे सत्य त्याला सांगितलं तर ते पोरं सगळी आस गमावून स्वतःच्या कोषात तरी जाईल किंवा काही भलतंच करून बसेल. म्हणून कोणाचाही दोष, अथवा कमीपणा अथवा अन्य असं काही जे खरं असूनही त्याने समोरच्याला फक्त त्रास होणार असेल असं न बोललेले श्रेयस्कर असते.
प्रियं तु नानृतं ब्रूयात: आता प्रश्न उद्भवतो की मग काय गोड गोडच बोलत राहायचं. नाही तसं मुळीच नाही. उगाच गोड बोलून परत आपण समोरच्याचं नुकसानच करतो.
एखाद्या कवीला खोटंच सांगितलं की तुझ्या कविता सर्वोत्कृष्ट असतात, तर हे खोटं गोड बोलणं त्याची प्रगती खुंटवणारं ठरेल. म्हणून गोड बोलायचं म्हणजे असत्य असलेलं गोड बोलू नये. उगाच कोणाची खोटी प्रशंसा करू नये. दुसऱ्याला आनंद देणारं खोटं बोलून आपण अप्रत्यक्षपणे थोडंसं पापच करत असतो.
खरा मित्र आपल्या मित्राला मार्गदर्शन करत असतो आणि तो सत्य बोलतो गोड वाणीने पण कधीच उगाच त्याची खोटी प्रशंसा करत नाही कारण त्याला त्याच्या मित्राचे यश त्याची प्रगती हवी असते.
एकंदरीत काय तर माणसाने खरं बोलावं, गोड, मधाळ बोलावं हा जरी नियम असला तरी मनाला यातना देणारं सत्य किंवा खरं बोलू नये. त्याच बरोबर खोटं खोटं पण प्रिय वाटणारी किंवा मनाला सुख देणारी वाक्येही नक्कीच बोलू नये. हेच आपला धर्म सांगतो. तर पुढे आपण या सगळ्याचा सारासार विचार करूनच बोलू यात.
अस्तु…

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
