नमस्कार मंडळी.
गणेशोत्सव सुरू झाला आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील दहा परिचित, अपरिचित गणपतींची मीरा जोशी यांनी संकलित केलेली माहिती आपण दर रोज प्रसिद्ध करीत आहोत. गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
“सिद्धिविनायक महागणपती” : टिटवाळा
ठाणे जिल्ह्यातील कल्याण कसारा महामार्गावर टिटवाळा येथे “सिद्धिविनायक महागणपती” मंदिर आहे.
हे मंदिर काळू नदीच्या काठावर वसलेलं आहे. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे.
प्राचीन काळी हे गाव दंडकारण्य जंगलाचा भाग होते. इथे कातकरी जमात राहत होती. ऋषी मुनींच्या काळातील कण्वमुनिंचा तिथे आश्रम होता. शकुंतलेने हे देऊळ एका सरोवरात बांधल्याची आख्यायिका आहे.
शकुंतलेने उत्तम वरासाठी याच महागणपतीची पूजा केली होती. काळाच्या ओघात सरोवरात गाळ साचून देऊळ पूर्ण गाडले गेले. सरोवरही नाममात्र राहिले.
माधवराव पेशव्यांच्या काळात दुष्काळ पडला. टिटवाळा येथील रहिवासी रामचंद्र मेहेंदळे यांनी पाण्यासाठी उत्खनन करवले आणि काय आश्चर्य हे देऊळ जसेच्या तसे अभंग मूर्ती सकट सापडले. लढाई जिंकल्यानंतर पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करून मूर्तीची पुनर्स्थापना केली. तसेच लाकडी सभामंडप बांधला.
या गणपतीची पूजा करण्यासाठी विवाह इच्छुक मोठ्या संख्येने येत असतात. लोकांचे विवाह सहज होतात. त्यामुळे या गणपतीला “वर विनायक” असेही म्हणतात.

येथील मूर्ती साडेतीन फूट उंच व रुंद असून ती चतुर्भुज आहे. उजव्या हातात परशु, खालच्या हातात रुद्राक्षमाला, डाव्या हातात गदा कमल, खाली मोदक असे मोहक रूप आहे.
प्रतिमेचे डोळे आणि नाभी माणिक दगडांनी सजवली आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे शिवलिंग असलेले मंदिर आहे मंदिराच्या समोर एक प्रभावी दीपिका आहे मंदिराचे शिखर महाराष्ट्रातील पुणे जवळील आठ आदरणीय गणेश मंदिरातील मध्यवर्ती प्रतिमा असलेल्या अष्टविनायकांच्या शिल्पांनी सजवलेले आहे.

येथे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती उत्सव अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. लाखो भाविक येथे दर्शन घ्यायला येतात. “पावणारा गणपती” अशी याची ख्याती आहे. अकराव्या शतकातील हे गणेश मंदिर खूप प्रसिद्ध असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
जय गणेश, श्री गणेश.

— लेखन : मीरा जोशी. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800