“विज्ञान गणेश”
प्रत्येक देवतेची शक्तीपीठ असतात. जसे 11 मारुती किंवा 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक. तशीच गणपतीच्या साडेतीन पिठांशिवाय इतर 21 पीठ किंवा क्षेत्र आहेत. ती सर्व प्राचीन मंदिरे आहेत.त्यांना इतिहास आहे.आणि मुख्य म्हणजे देवांनी स्वतः निर्माण केलेली मंदिरे आहेत. उदाहरणंच द्यायची झाली तर लक्ष विनायक वेरूळ, चिंतामणी क्षेत्र कळंब राजसदान क्षेत्र जालना. त्यातीलच एक पीठ म्हणजे विज्ञान गणेश मंदिर बीड.
मंडळी आज त्याचीच माहिती घेऊ या. खुद्द दत्तात्रेय प्रभूंनी मोठी साधना करून या गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
अथर्वशिर्ष 4 थ्या श्लोका ची 4 थी ओळ, त्वम ज्ञानमयो विज्ञान मयोसी. विज्ञान गणेशाचे नामस्मरण केले आहे. तो हाच गणेश.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन या पौराणिक तीर्थक्षेत्री ह्या स्वयंभू उजव्या सोंडेच्या नवसाला पावणाऱ्या गणेशाचे विज्ञानाच्या आधारावर स्थापन केलेले मंदिर आहे. अहिल्याबाई होळकरांनी याचा जिर्णोद्धार केला आहे. याची अख्यायिका थोडी मोठी आहे पण नक्कीच रंजक आहे. आपल्याला वाचायला नकीच आवडेल.
प्रभू रामचंद्रांना त्रेता युगात साडेसाती लागली होती. त्यावेळेस त्यांचे वास्तव्य राक्षस भुवन येथे होते. त्यांनी तिथे गोदावरी नदी काठी नवग्रहांची स्थापना केली होती. बाजूला घनदाट जंगल होते. त्यायोगे हे गाव अतिशय प्रसिध्द झाले.

याच दंडकारण्यात अत्री ऋषी व अनुसया माता अनुष्ठान करायचे. ब्रम्हांश व रुद्र पत्नीना गर्व झाला आपल्यासारख्या पतिव्रता या भूतलावरच काय तिन्ही लोकी नाहीत. आपणही जगनियंत्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी आहोत.पण अनुसूया ह्याच जास्त पतिव्रता आहेत असे नारद मुनींचे म्हणणे होते. आपल्या पत्नींचा हट्ट पुरवण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी साधुंचे रूप घेऊन राक्षस भवन गाठले. माता अनुसयेकडे भिक्षा मागितली.परंतु विचित्र अट घातली. नग्न अवस्थेमध्ये स्वयंपाक करून भोजन द्यावे. आमचे समाधान करावे. अनुसया माताना ही मागणी अयोग्य वाटली. अत्रि ऋषींच्या कानावर हे पडताच दिव्य दृष्टीने त्यांनी ओळखले हे ब्रह्मा विष्णू महेश यांचेच काम आहे. अनुसयेने कमंडलूतील पाणी तिघांवर शिंपडताच ते तिघेही बालक स्वरूपात गेले. तिचे पुत्र झाले. नग्न अवस्थेत तिने त्यांना भोजन दिले. इकडे तिघांच्या ही पत्नी संभ्रमावस्थेत गेल्या. पतीना शोधू लागल्या. नारद मुनींना विनंती केली. ते तिघेही बालाकावस्थेत आहेत हे समजताच त्यांचे गर्वहरण झाले. राक्षस भुवन येथे येऊन माता अनुसयेची माफी मागितली. अनुसयेचा अनुग्रह घेतला. अनुसयेने दत्तात्रेय चंद्रात्रे ध्रुवात्रेय चे मुळ स्वरूप त्यांना देऊन टाकले. परंतु त्यांचे मूळ अंश अनुसयेने थोडे काढून घेतले व तीनही बालकाना लहानाचे मोठे केले. पुढे मोठेपणी तिघेही हिमालयात निघून गेले. दत्तात्रय यांनी राक्षसभुवन येथे घोर तप केले व विज्ञान गणेशाची स्थापना केली. तेच हे आजचे विज्ञान गणेश मंदिर.
तर मंडळी अशी ही थोडी मोठी पण कुतूहल वाढवणारी या मंदिराची कथा. अशाच प्राचीन गणेशाची माहिती पुढील भागात घेऊ.
क्रमशः

— लेखन : मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800