“हरिशंकर परसाई”
वर करणी विनोदी, व्यंगात्मक वाटणाऱ्या, पण प्रत्यक्षात समाजातील अनिष्ट चालीरीती, मानवी स्वभावातील,वर्तनातील दोष, विसंगती यावर मार्मिक भाष्य करणारे श्रेष्ठ हिंदी साहित्यिक हरिशंकर परसाई यांची जयंती नुकतीच, म्हणजे २२ ऑगस्ट रोजी होऊन गेली.
त्यानिमित्ताने या भागात त्यांच्या विषयी वाचू या. व्यक्तिशः, शाळेपासून माझे आवडते लेखक असलेल्या हरिशंकर परसाई यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
हिंदीचे हास्य व्यंग्य लेखक हरिशंकर परसाई व त्यांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याआधी हास्य व्यंग्य लेखन परंपरेची माहिती पाहणे क्रमप्राप्त ठरेल.
हास्य व्यंग्य लेखन परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ती वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या रूपात विकसित झाली आहे. याचे उदाहरण सातव्या शताब्दीमध्ये संस्कृत कवी बाणभट्ट यांच्या गद्य काव्य ‘हर्ष चरित्रा’मध्ये पहावयास मिळते. बाणभट्ट हा कलाप्रेमी बौद्ध सम्राट हर्षवर्धन यांच्या अनेक कवींपैकी एक दरबारी कवी होता. व्यंग्य साहित्याचा विकास आधुनिक काळात विसाव्या शतकात झाला. या काळात साहित्यकारांनी विशेषत: सामाजिक विसंगती व राजकीय घडामोडींवर आपले लक्ष्य केंद्रित केले.
हिंदी साहित्यात ही परंपरा श्रीलाल शुक्ल, नरेंद्र कोहली, भगवतीचरण वर्मा, शंकर पुणतांबेकर, धर्मवीर भारती, रवींद्रनाथ त्यागी, शरद जोशी इत्यादींनी पुढे नेली. या परंपरेमध्ये हरिशंकर परसाई यांचं अनन्य साधारण महत्त्व आहे. हास्य व्यंग्या विषयी हिंदी समीक्षक डॉ.रामविलास शर्मा असे म्हणतात की, “हास्य व्यंग्य काव्य समाजातील विसंगती आणि विकृतींवर कठोर प्रहार करते आणि हे समाज सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे.”डॉ. नामवर सिंह यांच्या मते, “हास्य व्यंग्य हा एक असा काव्य प्रकार आहे जो समाजातील दोषांना उजागर करतो आणि वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करतो.”हरिशंकर परसाई यांच्या मते, “हास्य व्यंग्य साहित्य हे एक समाजातील विसंगतींवर प्रहार करण्याचे सशक्त माध्यम आहे.”
सारांश रुपाने असे म्हणता येईल की हास्य व्यंग्य काव्य व गद्य साहित्याचा असा प्रकार आहे की या माध्यमातून समाजातील विकृती व दोष यावर कठोर प्रहार केली जातात व वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त केले जाते. व्यंग्याचा मूळ हेतू हा असतो की समाजातील अनिष्ट प्रथा व व्यक्तीतील दोष करून सुधार करणे.
हरिशंकर परसाई हे हिंदी साहित्यातील श्रेष्ठ व्यंग्य लेखक आहेत. यांचा जन्म २२ऑगस्ट १९२४ रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील ‘जमानी’ या गावी झाला.त्यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी तर उच्च शिक्षण नागपूर येथे झाले. नागपूर विद्यापीठातून त्यांनी एम.ए. हिंदी व बीएड या पदव्या संपादन केल्या. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी वन विभागात नोकरी केली. खांडवा येथे ते सहा महिने अध्यापक होते. १९४१ ते १९४३ अशी दोन वर्षे त्यांनी जबलपूर स्पेस ट्रेनिंग कॉलेज मध्ये शिक्षण कार्याचे अध्ययन केले. तिथेच त्यांनी १९४३ पासून मॉडेल हायस्कूल मध्ये अध्यापन केले. त्यांनी १९५२ मध्ये ही सरकारी नोकरी सोडली. १९५३ ते १९५७ पर्यंत खाजगी शाळेत नोकरी केली. पण १९५७ मध्ये ही नोकरीही सोडून त्यांनी पूर्णवेळ साहित्य लेखनाला सुरुवात केली.
परसाई यांनी जबलपूर येथे ‘वसुधा’ नामक मासिक सुरू केले. आर्थिक नुकसान सहन करूनही त्यांनी हे मासिक अनेक वर्ष चालवले परंतु शेवटी त्यांना हे मासिक बंद करावे लागले. त्यांनी काही वर्तमानपत्रे व मासिकांमध्ये अनेक वर्ष स्तंभलेखन केले. नई दुनिया मध्ये ‘सुनो भाई साधो’, नई कहानियां मध्ये ‘पांचवा कालम’, ‘कल्पना’ आणि ‘सारिका’ मध्ये ‘कबीरा खडा बाजार में’ निरंतर लेखन केले.
हरिशंकर परसाई यांची ख्याती हास्य व्यंग्य कथाकार, निबंधकार व मार्क्सवादी विचारांचे प्रखर चिंतक म्हणून आहे. त्यांच्या समृद्ध साहित्यात ‘हॅंसते है रोते हैं’, ‘जैसे उनके दिन फिरे’ हे कथा संग्रह, ‘रानी नागफणी की कहानी’, ‘तट की खोज’ या कादंबऱ्या, ‘तब की बात और थी’, ‘भूत के पाव पीछे’, ‘बेईमानी की परत’, ‘वैष्णव की फिसलन’, ‘पगडंडियों का जमाना’, ‘शिकायत मुझे भी है’, ‘सदाचार का ताबीज’, ‘विकलांग श्रद्धा का दौर’, ‘तुलसीदास चंदन घिसैं’, ‘हम एक उमर से वाकिफ है’, ‘जाने पहचाने लोग’ इत्यादी व्यंग्य कथा संग्रह प्रसिद्ध आहेत.

हरिशंकर परसाई यांच्या काही रचनेतील व्यंग्य पाहणे येथे क्रम प्राप्त ठरेल. ‘सदाचार का तावीज’ ही त्यांची अत्यंत प्रसिद्ध व्यंग्य रचना आहे. या रचनेमध्ये त्यांनी विशेष करून समाज, राजनीतिक भ्रष्टाचार आणि पाखंड यावर कठोर प्रहार केला आहे. या कथेच्या माध्यमातून त्यांनी, एक राजा कशाप्रकारे आपल्या राज्यातील भ्रष्टाचारामुळे चिंतीत होऊन एका साधूकडे भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक तावीज मागतो. परंतु हा तावीज सुद्धा भ्रष्टाचाराची समस्या रोखण्यासाठी कसा असमर्थ ठरतो याचे चित्रण केले आहे. वास्तविक पाहता भ्रष्टाचाराची समस्या सोडविण्याची शक्ती तावीज मध्ये नाही तर ती सामाजिक व्यवस्था आणि लोकांच्या मानसिकतेमध्ये आहे. आणि त्या साठी लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.
‘भूत के पांव पीछे’ या निबंध रचनेच्या माध्यमातून हरिशंकर परसाई यांनी ढोंगी आणि अंधविश्वासू लोकांवर तीव्र व्यंग्यात्मक प्रहार केला आहे. भूत हे अज्ञानाचे प्रतीक आहे. जो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो, पुढे जाण्यासाठी अडसर ठरतो. भुताचे पाय पाठीमागे असतात. अर्थात उलटे असतात. अर्थात या रचनेच्या माध्यमातून लेखक तर्क, ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पुरातन रूढी पासून मुक्त होऊन प्रगती करण्याचा संदेश देतात.
‘विठ्ठले की डायरी’ ही परसाई यांची प्रसिद्ध रचना आहे. याद्वारे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलखोल केली आहे. ते म्हणतात, “गाली वही दे सकता है, जो रोटी खाता है. पैसे खाने वाला सबसे डरता है. जो कर्मचारी जितना नम्र होता है वह उतने ही पैसे खाता है.” या माध्यमातून लेखकाने सरकारी कर्मचारी अधिकारी लाचखोर प्रवृत्ती उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी समाजातील ढोंगी, कपटी आणि दिखाऊपणा या सारख्या वाईट गोष्टींवर टीका केली आहे. विशेष म्हणजे समाजातील रिकामटेकड्या लोकांना व्यंग्याच्या माध्यमातून सक्रिय बनण्यासाठी प्रवृत्त केले आहे.
‘ठिठुरता हुआ गणतंत्र’ या व्यंग्या निबंधाच्या माध्यमातून लेखकाने भारतीय प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यानंतर ढोंगी राजनेत्यांद्वारे समाजवाद निर्माण करण्याची केवळ घोषणाबाजी केली जाते. गरीबी हटावचे नारे दिले जातात परंतु गरीबी मात्र आहे तशीच राहते. प्रजासत्ताक दिनी भारतातील वेगवेगळ्या राज्यांचे विकास कार्याचे दृश्यांचे प्रदर्शन प्रस्तुत केल्या जाते. ते वास्तविक असते. आमचे ब्रीद वाक्य आहे ‘सत्यमेव जयते’ परंतु खोटी विकास कामे दाखविली जातात. भारतीय ‘स्वतंत्रता दिवस’ हा उत्सव भर पावसाळ्यात येतो व ‘प्रजासत्ताक दिन’ हा प्रचंड थंडीच्या काळात येतो. या विषयी ते व्यंग्यात्मक पध्दतीने लिहितात, “अंग्रेज बहुत चालाक है. भरी बरसात में स्वतंत्र करके चले गये. ऊस कपटी प्रेमी की तरह भागे, जो प्रेमिका का छाता भी ले जाये. वह बेचारी भिगती बस स्टॅन्ड जाती है, तो उसे प्रेमी की नही छाता चोर की याद सताती है. स्वतंत्रता दिवस भीगता हैं और गणतंत्र दिवस ठिठुरता है.”
‘संसद और मंत्री की मुंछ’ हा व्यंग्य निबंध भारताच्या संसदीय कामकाजावर कटाक्ष टाकतों. भारताच्या संसदीय अधिवेशनात वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर चर्चा, त्यावर उपाय व योजना आखली गेली पाहिजे,असे अपेक्षित आहे. परंतु संसदेत हे घडताना दिसत नाही. दिसतो तो नेत्यांचा हिडीसपणा. सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांच्या चुका दर्शविण्यात पूर्ण कालावधी गोंधळात घालवताना दिसतात. समाजातील वास्तविक प्रश्न चर्चिले न जाता मंत्र्यांच्या वैयक्तिक बाबींवर लक्ष वेधून घेतले जाते. या मध्ये संसदेच्या कामकाजाचा वेळ आणि पैसा व्यर्थ वाया जातो.
समाजातील विरोधाभास, दांभिकता, जातीयता, राजकीय स्वार्थ आणि ढोंगी नैतिकतेवर व बौद्धिक प्रात पातळीवर प्रहार करणारी ‘हरिजन को पीटने का यज्ञ’ ही रचना आहे.ती समाजातील खोट्या नैतिकतेचा आणि जातीय अहंकाराचा पर्दाफाश करते. स्वतःला धार्मिक, नैतिक आणि पवित्र मानणारी लोकं प्रत्यक्षात आपल्या वर्तनात किती क्रूर आणि अन्यायी असतात हे लेखकाने अचूकपणे टिपले आहे. यज्ञासारख्या कर्मकांडावर लेखकाने कठोर प्रहार केला आहे, “यज्ञ में वास्तव में अन्न, घी, शक्कर नहीं जलते, विवेक स्वाहा ! बुध्दि स्वाहा ! तर्क स्वाहा ! विज्ञान स्वाहा !” पुढे ते लिहितात, “पुजारी जानता है, भगवान चाहे कहीं ओर हो मगर मंदिर में तो कतई नहीं हैं.” ते असे ही लिहितात, “बच्चा माॅं के पेट में आता है तभी से पोथी-पत्री और पूजा शुरु हो जाते हैं. आदमी पैदा हुआ तो ब्राह्मण तैयार बैठा हुआ है. फिर चालू होता है लंबा सिलसिला-छठी, नामकरण, मुंडन, कनछेदन, जनेऊ, विवाह- सबमें हैं ब्राह्मण! आदमी मर जाये तो तेरहवे दिन ब्राह्मण भोजन करके दक्षिणा ले जायेंगे. आगे जब तक उसका वंश चलेगा, हर साल पितृपक्ष में ब्राह्मण भोजन करेगा .उसी के नाम से और दक्षिणा ले लेगा. हरिजन दूल्हा यज्ञ के कारण ही पीटा.” अर्थात यज्ञ, कर्मकांड, ब्राह्मण अर्थनीतीचा व बहुजनांच्या शोषणाचा पर्दाफाश येथे दिसून योतो. तसेच समाजाला पुरातन रूढी, परंपरा, जातीभेद, उचनिचता, अंधविश्वास यामध्ये जखडून ठेवण्याच्या उद्देशाने यज्ञासारखी कर्मकांड केली जातात.
‘इंस्पेक्टर मातादिन चांद पर’ हा व्यंग्य निबंध सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्यावर मार्मिक टीका करतो. विशेषतः पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराचे व राजकीय नेत्यांच्या सहसंबधाचे चित्रण येथे दृष्टिस येते. मातादिन इन्स्पेक्टरला एका विशेष मोहीमेसाठी चंद्रावर पाठविले असता तो तेथे ही दांभिक जातीवाद, भ्रष्ट पोलिस व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. इन्स्पेक्टर मातादीन ही व्यक्तीरेखा म्हणजे भारतातील भ्रष्ट पोलिस अधिकार्यांचे प्रतीक होय. जो शक्तीशाली लोकांसमोर नम्र आणि दुर्बलांसाठी क्रूर असतो.
‘दो नाकवाले लोग’ ही रचना समाजातील वास्तविकतेवर मार्मिकपणे प्रहार करते. तसेच समाजातील काही लोक अहंकार, व्यर्थ, अभिमान, खोटी प्रतिष्ठा जपणाऱ्या लोकांवर तीव्र व्यंग करते. विशेष करून स्त्रीची अब्रू, विवाहाच्या वेळी जातीय बंधन, हुंडा देणे, पत नसताना अधिक खर्च करणे, अयोग्य वेळी म्हणजे भर उन्हाळ्यात विवाह करणे, अनावश्यक बाबींना प्राधान्य देणे.
हरिशंकर परसाई यांच्या साहित्य विषयी रवींद्रनाथ त्यागी असे म्हणतात की, “आजादी के बाद का पूरा दस्तावेज परसाईजी की रचनाओं में सुरक्षित हैं. परसाई जी ने हिंदी व्यंग्य निबंध लेखन साहित्य की केवल दिशाही नहीं बदली बल्कि उसे चरम स्थान पर प्रतिष्ठित करने में विशेष योगदान दिया है. आपने व्यंग रचना को इतना सशक्त बनाया कि, ‘व्यंग्य बिन सब सुन’ लगता हैं.”
हरिशंकर परसाई यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. ‘विकलांग श्रद्धा का दौर’ या रचनेला मध्यप्रदेश साहित्य अकादमी द्वारा ‘भवभूती अलंकारण’ पुरस्कार मिळाला आहे. राणी दुर्गावती विद्यापीठाने त्यांना डी.लीट. ही मानद उपाधी दिली आहे. पद्मश्री अलंकार, १९८७ मध्ये उत्तर प्रदेश लखनौ हिंदी संस्थान तर्फे ‘संस्थान सन्मान’ दिला गेला आहे.
संक्षिप्त रुपाने असे म्हणता येईल की, १० ऑगस्ट १९९५ रोजी जबलपूर येथे निधन झालेल्या हरिशंकर परसाई यांनी आपल्या व्यंग्य शैलीतून समाजातील जातीय विषमता, शोषण, भ्रष्टाचार, अनिष्ट रूढी परंपरा, जातीभेद, अंधश्रद्धा, ढोंगी धार्मिकता, कर्मकांड , खोटी नैतिकता इत्यादी बाबींचा खरपूर समाचार घेतलेला आहे. तसेच माणसाच्या अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकला आहे. त्यांचे व्यंगे साहित्य वाचकांच्या व्यक्तीच्या मेंदूला झिणझिण्या आणल्या शिवाय राहत नाही.

— लेखन : प्रा डॉ एम डी इंगोले.
— संपादन:देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800