जागतिक पातळीवर हॉकी या खेळात भारताला सर्वोच्च स्थान मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन आहे. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने हा विशेष लेख. मेजर ध्यानचंद यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
जागतिक कीर्तीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट, १९०५ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील सामेश्वर दत्तसिंह हे नामवंत हॉकीपटू होते. तर लहान भाऊ रूपसिंह हेही हॉकीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होते.
मेजर ध्यानचंद १८ व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाले. त्यांचे खरं नाव ध्यान हे होते. पण ते रोज रात्री चंद्राचे आगमन होताच हॉकीचा सराव करायचे. यामुळे त्यांचे सहकारी खेळाडू गमतीने त्यांना “ध्यान ‘चंद'” म्हणू लागले. पुढे ते सर्व जगाचे ध्यानचंद झाले.

देशाला विश्वात हॉकीमध्ये मानाचे स्थान मिळवून देणारे ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार म्हणून प्रख्यात होते. त्यांनी १९२८, १९३२ व १९३६ अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताला सुवर्णपदके मिळवून दिलीत.
मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झलँड, नेदरलँड, जर्मनी, हंगेरी, बर्लिन, जपान, अमेरिका, न्युझीलंड आदी देशांच्या हॉकी संघांना मोठ्या लिडने पराभूत केले. सन १९२६ ते १९४८ या काळात त्यांनी सुमारे ४०० गोल केले. हा हॉकी मधील उच्चांक म्हणावा लागेल.
मेजर ध्यानचंद यांना भारत सरकारने सन १९५६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले. त्यांच्या हॉकी मधील मोलाच्या योगदानाबद्दल दिल्ली येथील नॅशनल स्टेडियमला त्यांचे नाव दिले. तर, भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे त्यांच्या स्मरणार्थ २००२ पासून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.
एकीकडे आपली आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. पण दुसरीकडे बदलत्या, बिघडत्या जीवन शैलीमुळे समाजात शारीरिक, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणून आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपण सर्व रोज खेळाच्या मैदानावर येण्याचा, एक तास व्यायाम करण्याचा संकल्प करू या. तर युवा पिढीने जागतिक पातळीवर देशाला विविध खेळांमध्ये अधिकाधिक पुरस्कार मिळवून देण्याचा संकल्प करावा.
आपले हे संकल्प हेच मेजर ध्यानचंद यांची खरी स्मृती जागी ठेवतील. हाच देशासाठी खरा राष्ट्रीय क्रीडा दिन ठरेल.
आपणा सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

— लेखन : महेश मधुकर खुटाळे. राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक तथा
निवृत्त क्रीडा अधिकारी, सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800