“सख्खा मित्र”
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकांमध्ये नेहमीच गर्दी असायची. अजूनही तशी असतेच म्हणा.
काउंटरवर तर कित्येकदा हाणामारीची वेळ यायची. राजेशला काउंटरवर बसणं नेहमीच नको वाटायचं. तो नेहमी म्हणायचा,
मी ‘बॅकस्टेज वर्कर’ ! त्यात कॅशचा काउंटर तर अजिबात नको. एक दिवस त्याला अशा गर्दीच्या वेळी काउंटरवर बसावे लागले. एक तर पहिला आठवडा आणि त्यात सोमवार. म्हणजे सुट्टीचा दुसरा दिवस. नेमकी राजेशची रवानगी झाली, कॅशच्या पिंजऱ्यामध्ये ! दिवसभर हातामध्ये पैसाच पैसा आणि ऑफिस सोडताना त्यातला एक पैसा सुद्धा मालकीचा नाही. हा मासलेवाईक शेरा राजेशचाच !
कॅशियर म्हणून काम करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मन राखायचे आणि स्वतःचे मन अगदी ठरवून स्थिर ठेवायचे ! पैसे सुटे नाहीत असे बँकेत सहज सांगू शकत नसे, एखादा बँकर ! गंमत म्हणजे पेन्शन जमा झाले नाही, असं सांगितल्यावर म्हातारी-कोतारी मंडळी चक्क काउंटरच्या माणसावरच चिडायची. मेसेज वगैरे काही काही नव्हते बघा तेव्हा.
मी हे आज सांगते आहे, तो काळ आहे पस्तीस वर्षांपूर्वीचा. बँकांमध्ये कॉम्प्युटर प्रचलित नव्हतेच. भली मोठी अवजड वही असायची. ते लेजर ! एखाद्याने पैसे काढले की त्याच्या खात्यावर वजाबाकी करून उरलेली रक्कम लिहायची. होय, हाताने लिहायची. आताच्या पिढीला हे खरे सुद्धा वाढणार नाही. दंतकथा वाटेल !
पस्तीस वर्षांपूर्वी सांगितले जायचे की सगळे काही कॉम्प्युटरवर होईल. हाताने लिहावे लागणार नाही. आकडेमोड करावी लागणार नाही. पासबुक मशिनमध्ये सहज प्रिंट होतील. हे सगळं आम्ही ऐकायचो, तेव्हा ती आम्हाला दंतकथा वाटायची ! काल्पनिक वाटायचे सारे.
त्या काळामध्ये आकडेमोड करताना फरक लागणे ही गोष्ट अगदी कॉमन होती. ह्याला फरक लागला म्हणण्याऐवजी डिफरन्स लागला असेच म्हटले जात असे. त्या शोधण्याच्या युक्त्या असत. मग फरक शोधणे या कामी तरबेज असलेले भाव खाऊन जात असत.
पैशाचा व्यवहार करताना चूक महागात पडू शकते. कॅश कमी आली तर, धडकीच भरायची. कारण समजा पैसे घेऊन खातेदार घरीच गेला की उपाय काय ? त्यामुळे हा फरक ‘कॅश’ मध्ये लागला की जी घाबरगुंडी उडायची, विचारू नका. कोणाला पैसे जास्त तर दिले नाहीत, या भीतीने हा फरक शोधायला कित्येकांना त्राण उरत नसे !

त्या दिवशी राजेशला डिफरन्स लागला. मोठी रक्कम, सत्तावीस हजार.. त्या काळी भली मोठी. दिवसभराचा हिशोब कॅश काऊंटर बंद करतेवेळी द्यावा लागतो. तीन हजारचे तीस लिहिले का, चौदाचे एकेचाळीस दिले का सोपे फंडे वापरुन झाले. एक हजार ऐवजी लिहिताना एक शून्य जास्त लिहिले की दहा हजार होत म्हणजे नऊ हजारचा फरक ! चोवीसचे बेचाळीस लिहिणे चौपनचे पंचेचाळीस लिहिणे ही साधीशी चूक असायची. अशा आमच्या युक्त्या असायच्या या फरकाला नऊ ने भागायचे नऊ ने भाग गेला की, लिहिताना संख्या उलट सुलट झाली !
हे गणित आहे. शिवाय लिहिताना रिव्हर्स फिगर होऊ शकते, ही नेहमी आढळणारी बाब आहे. सत्तावीस ह्या संख्येला नवाने भाग जातो. त्या नियमानुसार तीन हजारचे, तीस चौदाचे एकेचाळीस चेक करून झाले. पण रिव्हर्सफिगर नव्हती. म्हणजे क्लिष्ट होतं प्रकरण. साधा डिफरन्स नव्हता.
राजेश जाम घाबरला. त्याची आई आजारी आहे. एक मन तिकडे ठेवून त्याने कॅशडिपार्टमेंट मध्ये दिवस भरला आहे. पण ही कारणे कोणी देऊ शकत नाही ना ! फरक लागला, की स्वतःचे पैसे भरा. हा नियम !
दीप्ती म्हणाली, “तू हे काम कधीतरी करतोस रे. त्यात दडपण आहे तुला आईचं. आपला डिफरन्स नेहमी दुसऱ्याला चटकन सापडतो. विकासला बोलावते.”
दीप्तीला तर तिचाच अजून हिशोब करायचा होता. “विकास नको. वेळ पडल्यास मी पैसे भरेन.” तटकन् राजेश उद्गारला.
आज देखील सत्तावीस हजार ही मामुली रक्कम नाही. तीस वर्षांपूर्वी तर खूपच होती !
“असं काय ! विकास एक्स्पर्ट आहे. तुझा मित्र आहे.“
“सख्खा मित्र नाही तो. त्यापेक्षा प्रकाशला बोलावतेस ? बिझी असला तरी.”
विकास काय सावत्र मित्र आहे ? स्वतःशी पुटपुटत दीप्ती प्रकाशकडे गेली.
प्रकाशसमोर खातेदारांचे पैसे जमा करण्यासाठी असलेल्या व्हॉऊचर्सचा ढीग पडला होता. सगळं बाजूला ठेवून तो धावत आला. डिफरन्स शोधला. एंट्री लिहिताना दोन चुका झाल्या होत्या. चुटकीसरशी त्याने संकटातून सुटका केली. आम्ही अशा वेळी ’डबल मिसटेक‘ म्हणायचो बरं का. एकेक भाषा ! एखादी ’एंट्री‘ चुकली असेल, तर ती कॅन्सल करावी लागते. तसं म्हणण्याऐवजी ’डिसेन्ट्री‘ कर रे, असं फर्मान सोडलं जायचं. हा एक ठराविक पी. जे.
अजून एक ठरलेला जोक सांगते. कॅशमध्ये पहिल्या फटक्यात हिशोब जुळला की फर्स्ट स्ट्रोक टॅली असे ओरडत. बऱ्याच प्रयत्नाने डिफरन्स शोधून कॅश टॅली झाली की, आफ्टर सम स्ट्रोक्स् फर्स्ट स्ट्रोक टॅली ! असे चिडवत. पी. जे.!
परिस्थिती बदलते. भाषा बदलत रहाते. लोक बदलतात.
लेजर गेले. कॉम्प्युटर आले. संरचनाच बदलून गेली. समस्याही बदलल्या.
सुटकेचे मार्ग बदलले.
पण, मैत्रीत सख्खा आणि सावत्र हे भेद होते तसेच आहेत. विकासने नक्की मदत केलीच असती. पण कॅश टॅली झाल्यावर त्याने मोट्ठी आरोळी दिली असती, “मिल गया !“
आसपासचा स्टाफ डोकावला असता. मॅनेजर पर्यन्त हे पोचावं म्हणून विकास धडपडला असता. भरपूर गाजावाजा केला असता त्याने. मी किती ‘मोठा‘ हे सांगताना राजेशची फजिती त्यानं उजेडात आणली असती. ह्यात मैत्री कुठे आहे ? आपुलकी कुठे आहे ?
दोघांची घरे एका गावात आहेत. एका ट्रेनने येत असत. म्हणून त्यांना मित्र संबोधले जात असे. समस्या घरी असो किंवा घराबाहेर. कधीतरी मदत मागायची वेळ येते. कित्येक जण मदत करतात.
मित्र, मैत्रीण, नातलग, शेजारी असोत. छोटी अडचण असो किंवा मोठं संकट असो. काही जण मी कशी मदत केली हे रंगवून सांगतात ! पाठीमागे गॉसिप करतात. मी मदत केली असं सांगताना ‘मीच’ केली असा कधी आविर्भाव असतो. कधी मदत घेणाऱ्याला कशी अक्कल नाही, असा भाव असतो. अशी लक्षणे असतील, तर ती सख्खी मैत्री नाही. ते सख्खे नाते नाही. तुम्हाला काय वाटतं ?
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
