Thursday, February 26, 2026
Homeसाहित्यसंगती रंग : 3

संगती रंग : 3

“पन्नास रुपयात राजा !”

शिरीष लिफ्टपाशी पोचला तेव्हा मोठ्ठी थोरली रांग होती. बारा जणंच जाऊ शकतात एका वेळी.सगळ्या मजल्यावर थांबे घेत लिफ्ट वर पोचली. पुन्हा लिफ्ट खाली आली तर, तो बारावा नंबर म्हणून घुसणार इतक्यात धापा टाकत मोहिनी आली, ‘लेडीज आहे, साहेब’ असं म्हणत लिफ्टमनने त्याला डावलून मोहिनीला घेतलं.
मग काय,त्याला लेटमार्क झाला !. ‘ एक गाडी ‘ उशीरा आली मोहिनी,तरी तिला लेटमार्क नाही ! सात्विक की काय म्हणतात, तो संताप घेऊन तो केबिन मध्ये गेला. शोभेल एव्हढा आवाज केला. .कर्जतहून येतो तो. तीन लेटमार्क झाले की गेली एक रजा ! घरून वेळेवर निघून, गाडी वेळेवर येऊनदेखील लेटमार्क लागणे ह्याचा अनुभव म्हणजे ज्याचं जळतं त्याला कळतं ह्या प्रकारातला.

मोहिनी शिरीष जवळ येऊन म्हणाली, “सॉरी महाडिक ! लिफ्टमन या म्हणाला मी गेले, तुम्ही तिथे आहात हे लक्षातच नाही आलं…”
“असूदे. आतला कन्सीडर करतोय. आपल्याकडे काही कार्ड पंचिंग नाहीये ते बरं… मस्टरवर तो मला लेटमार्क करणार नाही. होईल ऍडजस्ट.” आतला म्हणजे केबिनमधला, बाकीचे बाहेरचे.

लंचअवरमध्ये राजेशने विषय काढला. विषय अगदी सम्राट अकबर आणि प्रधान बिरबल पर्यन्त पोचला.अकबर शहेनशहा झाला. जास्त हुशार, चतुर असलेला बिरबल शेवटपर्यंत त्याच्या पदरी काम करणारा राहिला. ह्याला म्हणतात नशीब ! लिफ्टमनने लिफ्ट मध्ये घेणे, न घेणे ह्यात सुद्धा नशीब आहे, ह्यावर एकमत झाले.

कोणी असे जादा स्त्रीदाक्षिण्य दाखविले की राजेश चिडत असे. त्याने त्याचा मुद्दा लावूनच धरला.
“प्रेग्नंट असेल तर ठीक आहे. केवळ महिला म्हणून प्राधान्य का ?”
“शिऱ्या तू त्याला दिवाळी दिलीस का? ” प्रकाशने विचारलं.
“कोणाला ?”
“त्या लिफ्टमनला !”
“कशाबद्दल ?
सहा मजल्यावर वेगवेगळी कार्यालये आहेत. दर महिन्याला त्यांच्याकडून पगार आणि प्लस दिवाळी पोस्तं दिले जातेय…पोस्तं का देतात हे तर मला कळतंच नाही !“
“देऊन बघ,दिवाळी. ” प्रकाश शांतपणे म्हणाला आणि सांगू लागला,
“लिफ्टमन राजा आहे. त्याला खुर्ची आहे. लिफ्टचा एरिया किती असेल, चार -पाच स्क्वेअर फूट, ती त्याची सत्ता ! कधी ऑफिसचं फंक्शन असतं तेव्हा जा- ये खूप असते. तेव्हा हे महाशय लिफ्ट मधून गायब असतात. तंबाखू चोळत बाहेर कट्ट्यावर बसतात. “
” तेच तर ! तरी दिवाळी द्यायची ?
काय पण तू पक्या !! “
“अरे अनुभव सांगतोय मी. मला तर त्याने इतका त्रास दिलाय. खूपदा दुपारी यायचो मी इन्सपेक्शन झाल्यावर. मुद्दाम लिफ्ट सहाव्या मजल्यावर न्यायची.
सॉरी सॉरी करत तिसऱ्या मजल्यावर आणण्याची नाटकं करायची. वेळेवर दार न उघडल्यानं दाणकन लिफ्ट खाली…चावटपणा ! मग मी चढून येत असे तीन मजले ! “
” इंटरेस्टिंग ! ” शिरीष आता मन लावून ऐकू लागला.
” सारिका देते ह्या कर्मचाऱ्यांना पगार,दिवाळी ! ती रजेवर होती,दोन वर्षांपूर्वी. तेव्हा ते काम मी केलं. लिफ्टचा शहेनशहा माझ्यावर खुश झाला !
कशाला साहेब जिने चढता…
असं करत माझी इज्जत ठेवायला लागला ! मला ट्यूब पेटायला जरा वेळ लागला. मग नंतरच्या दिवाळीला पन्नास रुपये मी माझे स्पेशल दिले. चक्क विकत घेतला मी तो राजा.”
“फक्त पन्नास रुपयात ! “
“ तेवढीच लायकी म्हण. जो हातात पैसे देतो,तो मोठा ! सारिका म्हणाली,पगार वाढवण्यासाठी मी साहेबांशी बोलले होते, साहेब म्हणाले त्या पेक्षा दिवाळी, होळी,न्यू इयर अशी बक्षिसी देऊ आपण. पगार वाढण्याचा आनंद त्याला एकदाच मिळेल. आणि ते तो विसरेल. असे अधूनमधून देऊया. ”
राजेश म्हणाला, “बघा आतल्याचा अभ्यास किती सूक्ष्म आहे ! पैसे वाचले आणि फायदा जास्त !”
“उगीच नाही, ऑफिसचे राज्य चालवत. तो ! ऑफिसच्या परिघाचा तो राजा. लिफ्टच्या चौरसाचा हा राजा ! “
“तर शिऱ्या, दिवाळी गेली,
न्यू इयर गेले आता गुढी पाडवा आहे, देऊन बघ.”

जेव्हढी हातात सत्ता असेल तिचा गैरवापर करणे ही विकृती आहे. ती प्रकृती वाटावी किंवा सहज प्रवृत्ती असावी की काय अशी शंका येते.आणि बक्षिसीला काय म्हणावे ? लाच ? लाच म्हटले तर देणाऱ्याला थोडे अपराधी वाटते. जगण्याच्या शर्यतीत करावी लागणारी देणाऱ्यासाठी तडजोड आहे ही. काय म्हणाल ? टीप ? वरकमाई ? पन्नास रुपयात विकले जाण्याचा भोळेपणा ?

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments