महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे गुरु आणि महानुभाव पंथाच्या पंचकृष्णांमध्ये असलेले श्री गोविंद प्रभू महाराज यांची जयंती काल सर्वत्र साजरी झाली. त्यानिमित्त ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले…..’ हेच जीवनाचे सार आणि सर्वस्व मानणाऱ्या श्री गोविंद प्रभु महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती…
आपल्या महानुभाव पंथातील पंचकृष्ण अवतारांमधील श्री गोविंद प्रभु महाराज हे थोर समाजसुधारक होते. किंबहुना सुमारे आठशे वर्षांपूर्वी सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून देखील त्यांचा उल्लेख करण्यात येतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर जवळील काटसुरे तथा मातुलग्राम या गावी अनंत नायक आणि नेमाइसा या ब्राह्मण दांपत्याच्या पोटी इ.स. ११८७ भाद्रपद शुद्ध १३ शके ११०९ रोजी रात्री अकरा वाजता श्री गोविंद प्रभु यांचा जन्म झाला. त्यांचे जन्म नाव गुंडम असे होते, त्यांच्या बालपणीच मातापित्यांचे निधन झाल्यावर त्यांचा सांभाळ मावशी आणि मामा यांनी केला.
लहानपणापासूनच श्री गोविंद प्रभु हे अतिशय बुद्धिमान होते. वयाच्या सातव्या वर्षी मौजीबंधन झाल्यावर ते शिक्षणासाठी रिद्धपूर येथे आले. त्यानंतरच्या काळात द्वारावती येथे जाऊन त्यांनी संन्यास घेतला तसेच श्री चांगदेव राऊळ यांच्या कडून शक्ती स्वीकार केला, म्हणजेच शिष्यत्व पत्करले.
महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप चक्रधरस्वामी यांचेही ते गुरू होते. त्यांचे वास्तव्य अमरावतीजवळील ऋद्धिपूर इथे होते.
ऋद्धिपूरला महानुभाव पंथाचा प्रारंभ झाला. गोविंदप्रभू त्या पंथाचे आद्यपुरुष होते. लहानपणीच आईवडील वारल्याने गोविंदप्रभू यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने केला. तीच त्यांना ऋद्धिपूरला घेऊन आली. विध्याध्यनानंतर गोविंदप्रभूंना परमार्थाची आस लागली. ते श्रीकृष्णाचे भक्त होते. ज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून लीळाचरित्र हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही अवतरले आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत ‘राऊळ वेडे : राऊळ पिके’ असा उल्लेख आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत . त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले.
तसेच स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांच्या स्त्री-शिष्यांना ‘श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो’ असे वाटे. या लीळांमध्ये त्यांच्या कार्याविषयी अनेक प्रसंग वर्णिले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय वातावरणाला प्रचंड असा वारसा आहे. आजतागायत नवनवीन बदल वर्तमान युगात होत आहे. सत्ता संघर्षाच्या काळात अनेक धर्म राजश्रयाला गेली होते. अनेक ठिकाणी संस्कृतीच्या नावावर आणि धार्मिक अधिष्ठान कायम ठेवत अन्यथाज्ञान वाढीस लागले होते.
त्या काळात प्रस्थापित समाज व्यवस्था इतकी बिघडली असताना परिवर्तनवादी विचारांचा एक नवीन वर्ग निर्माण होत गेला. अकरावे आणि बारावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक परिवर्तनाचा काळ होता. वऱ्हाड प्रांतात एक ईश्वर पुरुष जन्माला आले ते म्हणजे गोविंदप्रभु होय. त्यांनी सतत १२५ वर्ष आपले आयुष्य समाज परिवर्तनासाठी खर्च केले आहे. श्रीगोविंदप्रभू फार तरुण अवस्थेत असताना त्यांना यात्रेकरूंच्या मेळाव्यात सहभागी होणे आवडायचे. एके वेळी ते द्वारकेला गेले. तेथ श्रीचक्रपाणी राउळांशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून श्रीप्रभूनी संन्यास घेतला व समाजकार्याची दीक्षा घेतली. आपल्या गुरुसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण्यासारखी बनवावी हाच संकल्प करून त्यांनी तो प्रत्यक्षात उतरविला.
विशेष म्हणजे त्याकाळी अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती. या अस्पृश्यतेला गोविंद प्रभुनी वाचा फोडली. तात्कालीन धार्मिक परिस्थिती फार कठीण होती. त्यावेळी गोविंदप्रभु त्यांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्या मुलांशी खेळू लागले. त्यांच्या मुलांच्या ताटातील अन्न प्रेमाने खाऊ लागले. लगेच गावच्या वरिष्ठ जनामध्ये यासंबंधी चर्चा होऊ लागली. हा परिवर्तनवादी बदल गावातील काही जनांना पाहवत नव्हता. म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर आरोप केले. परंतु गोविंदप्रभु डगमगले नाही.चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट मोडून त्यांच्या घरी जाणे, खाद्यपदार्थ खाणे हा परिवर्तनवादी विचार त्या जनांना रुचला नाही.
शूद्रांना त्याकाळी रिद्धपुरात पाणी पिण्याची सोय नव्हती.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फक्त राऊळच सोडवू शकतात. म्हणून सर्व बांधव राऊळा जवळ गेले आणि विनंती केली त्यावर लागलीच गोविंदप्रभुनी ज्या ठिकाणी पाणी लागेल त्या ठिकानी इशारा केला. विहीर खणल्यावर लगेच त्याला पाणी लागले. आपला प्रश्न इतक्या तातडीने सोडवल्याबद्दल सर्वच समाज बांधव खुश झाले. “राउळ माय राउळ बापु: राउळाचेनि प्रसादं आम्ही पाणी पीत असो.” असे उद्गार या बांधवांनी काढले. या अगोदर दलितांच्या प्रश्नाला अशी वाचा कुणीच फोडली नव्हती. या अगोदर असा प्रयत्न महाराष्ट्रात कधीही झाला नाही.
गोविंदप्रभुनी त्याकाळात केलेल्या या कार्याचा परिणाम इतका झाला की, हा समाज माणूस म्हणून जगू लागला. स्त्री आणि शूद्र या घटकाला समाजात त्याकाळी अजिबात स्थान नव्हते. मनुस्मृतीचा प्रचंड प्रभाव त्याकाळी होता त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला कुणीच हात घालत नव्हते. अज्ञानी असलेला समाज लाखो वर्ष या दडपशाहीच्या आणि बंधनाच्या ओझ्याखाली अडकला होता. भक्ती करण्याचा आधार केव्हाचाच काढून घेतला होता.
इतकेच नव्हे तर अंत्यजांची सावली पडली म्हणजे पाप झाले अशी अंधश्रद्धा बोकाळात चालली होती. अशा परिस्थितीत गोविंदप्रभु मातंगाच्या घरी जाऊन उतरंडी उतरून त्यातील खाद्यपदार्थ खात. त्यांच्या मुलांचा सांभाळ करीत असे. कधी ते बालगोपालांशी खेळत, तेल्या तांबोळ्याच्या घरी जाऊन भाकरी खात असे, त्यामुळे स्त्री वर्ग, दलितांना व रंजल्या गांजलेल्याना ते आपलेसे वाटत. म्हणून सर्व समाजाने त्यांचा ‘राउळ माय राउळ बाप’ म्हणून गौरव केला. गोविंदप्रभु म्हणजे त्याकाळच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. इतकं असूनही त्यांच्या जवळ अपार श्रद्धा,कृपा, करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता आदी गुणांचा आविष्कार दिसून येतो.
श्री गोविंद प्रभु हे समाजातील रंगल्या गांजल्याच्या घरी मदतीला धावून जायचे, आपल्या सेवाभावी वृत्तीने त्यांच्या अडचणीचे निवारण करायचे. त्यांनी कोणताही चमत्कार केला नाही, माणुसकीचे दर्शन मात्र त्यांनी घडविले. साधी व्यवहारिक वागणूकीने दैनंदिन जीवनातील अडचणी दुःखे नाहीशी करणारी समाजसेवा त्यांनी केली. त्यामुळेच गोविंद प्रभु हे महाराष्ट्रातील आद्य समाजसेवक आहेत, असे धार्मिक आणि इतिहास संशोधक मानतात. गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हटले जाते.
श्री गोविंद प्रभू जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची क्षणचित्रे आपण पुढील लिंक वर पाहू शकता.
– लेखन : सौ. नलीनी मुकुंद बाविस्कर. नाशिक
– संपादन: देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800

🌹खूप दुर्मिळ अशी माहिती या लेखातून मिळाली आहे. खूप प्रेरणादायी 🌹
धन्यवाद