मॉर्निंग वॉकला निघालो होतो… चेहऱ्याला सवयी प्रमाणे मास्क लावला होता… दिड एक किलोमीटर फिरून झाल्यावर माघारी येत होतो.. दोन युवक सायकल उभे करून बोलत होते… एक जण माझ्याकडे बघून हसला… म्हटलं कदाचित आजकालची पोरं मस्त अनोळखी लोकांना पण स्माईल देतात, तसंच असेल !
थोडं पुढं गेलो…फोन आलेला दिसला, बघतोय तर संतोष बालगीरचा फोन … माझी ट्यूब पेटली. स्मित हास्य करणारा संतोष होता… खरं तर त्यांनी मला समोरासमोर कधी कधी बघितलेलं नव्हतं… वरून मी मास्क घातलेला. पण त्यांनी फक्त फेसबुक प्रोफाइलवरून ओळखलं…!!
ज्या संतोषबद्दल मी सांगतोय, तो संतोष साधारण युवक नाही… ज्यांनी डिसेंबर 2020 ते जून 2021 या सहा महिन्यात सायकल वरून खिश्यात पाच पैसे न घेता… उभा भारत देश म्हणजे तब्बल 12 हजार किलोमीटर एवढा प्रवास सायकल वरून केलाय… त्याचा उद्देश होता...देशाच्या वैभवी इतिहासाला वंदन करण्याचा…..
हा युवक लातूर शहराला लागून असलेल्या वासनगावचा (जे माझं आजोळ आहे) … जो व्यवसायाने अभियंता आहे. अर्थात भेटल्यावर कडकडून मिठी मारली… मला मायंदळ आनंद झाला. आम्ही दोघे रेस्ट हाऊस ला आलो. कधी एकदा त्याचे अनुभव ऐकतो असे मला झाले होते… छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य अभिमान आणि राष्ट्रप्रेम या उर्मीतून संतोषने भारत भूमीच्या विविध प्रांतातील माती भाळी लावून… त्याचं जगणं हिमालया एवढं मोठं केलं… त्याचे सगळे अनुभव खूप थ्रीलिंग आहेत… सगळे लिहिण्याचं हे ठिकाण नाही…
पण त्याने सांगितलेले दोन अनुभव इथे सांगतो… यावरून त्याच्या या प्रवासाचा अंदाज येईल.
तंजावर ही मराठ्यांची दक्षिणेतील राजधानी… तिथे हा गेला. राजवाड्यात आजही आबाजी राजे भोसले आणि बाबाजी राजे भोसले राहतात… राजवाड्यात जाऊन त्यांनी एका व्यक्तीला विचारणा केली, मी असा असा महाराष्ट्रातून आलो आहे, माझ्या या प्रवासाचा हेतू असा असा आहे. ती व्यक्ती म्हणाली, मी लगेच जाऊन तुमचा निरोप देतो… आणि काही मिनिटात तिचं व्यक्ती कपडे बदलून आली… अहो आश्चर्यम, तिच व्यक्ती खुद्द आबाजी राजे भोसले होते… त्यांनी त्याचे स्वागतच केले. इतकेच नव्हे तर राजवाड्यात राहण्याची व्यवस्था केली…हे तो सांगत होता आणि माझाच ऊर भरून आला… आजही छत्रपतीचे वंशज महाराष्ट्रातल्या लोकांवर एवढं अतूट प्रेम करतात... आम्हाला तुमचा अभिमान आहे महाराज.. 😊🌹🙏🏻
दुसरा अनुभव अर्थातच काश्मीरचा आहे… त्याला तिथे फारसं सुरक्षित वाटलं नाही… एक प्रसंग तर थोडक्यात निभावला.. संतोष निधड्या छातीचा मावळा आहे.. त्याच धैर्याने त्याने तोंड दिले…!!
पण सॅल्यूट तुमच्या सगळ्यांच्या समोर व्हायला हवा… म्हणून लिहितो आहे…
माझ्या नागपूरच्या स्नेही रश्मी पडवाड यांनी पहिल्यांदा फोन करून सांगितलं होतं… एक तुझ्या लातूरचा युवक सायकल वरून भारताच्या ऐतिहासिक परंपरेला वंदन करण्यासाठी निघाला आहे… त्याला मी आज नागपूर मध्ये घरी बोलावलं आहे… हे घे बोल… अगदी तसाच फोन मी आज त्यांना केला… संतोष मला भेटला बरं… हे घ्या फोन बोला त्याला.. 😍
मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी संतोष ज्याठिकाणी श्रीशैल्यम (आंध्रप्रदेश) छत्रपती शिवराय जिथे थांबले होते… तिथे देशातले भव्य छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे तिथे नतमस्तक झाला… आणि 6 जून ला महाराष्ट्रात येऊन रायगडावर शिवराजयभिषेक दिनी नतमस्तक होऊन…जवळपास 12 हजार किलोमीटरची भारत भ्रमंती शिवचरणी अर्पण करून… लातूरला आला…!!
त्याचे या सहा महिन्यातले अनुभव पुस्तकबद्द करण्यासारखे प्रचंड थ्रील करणारे आहेत… कधी जंगलात झोपला.. कधी कोणी दिलेल्या ब्रेडच्या तुकड्यावर दिवस काढले… हिम्मत असेल तर जग जिंकण्याची ताकत निर्माण होते… ही महाराष्ट्राची भूमी असे रत्न जन्माला घालते… मित्रा, तुझ्या असिमांत धैर्याला सलाम, तुझ्या शिवभक्तीला प्रणाम….!🙏🏻
– लेखन : युवराज पाटील.
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800