थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय आगरकरांकडे जाते.
आगरकरांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू येथे झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला.
पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेश सेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.
आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून ‘केसरी’त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे ‘केसरी’ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासुन ‘केसरी’चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.
आगरकरांनी पुण्यातच १८८८ साली सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
आगरकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील.
पुढे अनेक कारणावरून मतभेदाची दरी रूंदावत गेली. संमतीवयावरून आणि बालविवाहाच्या प्रश्नावरून ती वाढली. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. हे मतभेद पुढे वाढत गेले याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली.
पण त्यानंतर आणि तत्पूर्वीही दोघे अत्यंत चांगले मित्र होते. शिवाय एकमेकांच्या विचारांशी प्रामाणिक मतभेद राखून परस्परांवर प्रेम करणारे होते. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे.
त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे.
त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे.
मतभेदांनी दोघांना विभक्त केले ते वर्ष होते. १८८७. या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. “आजपासून बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.“ अशा शब्दांत दोघांचे संबंध तुटले. पण मने तुटली नाहीत.
आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत.
फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण.
तीव्र मतभेद असतानाही हे दोघे एकमेकांवर प्रेम करीत. सार्वजनिक वादात शिवीगाळ झाली असतानाही अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक घळाघळा रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही.
या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की “मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, “देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.“
यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६ मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते,
‘सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्र्यांत राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.’….
आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेऊन संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसून हि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत.
आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्रीत मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती.
वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले.
सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते.
स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे – अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला.
सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला. गोपाळ गणेश आगरकर यांचे १७ जुन १८९५ निधन झाले.
अशा या थोर, द्रष्ट्या समाजसुधारकास विनम्र अभिवादन.

– लेखन : संजीव वेलणकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800