Saturday, January 31, 2026
Homeलेखसुनीता विल्यम्स : आपण काही शिकू या !

सुनीता विल्यम्स : आपण काही शिकू या !

सुनीता विल्यम्स नासाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत होते आहे. ती भारतीय आहे याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. त्यातही ती महिला आहे याचा तर जास्तच अभिमान वाटायला हवा.

कल्पना चावला

कल्पना चावला नंतर अवकाशात यशस्वी झेप घेऊन जगात स्वतःचा स्पेसवॉक चा आगळा वेगळा विक्रम करणारी, अवकाशात मॅराथॉन करणारी ही महिला काही महिन्यापूर्वी तिची आठवड्याची स्पेस ट्रीप यंत्रात बिघाड झाल्याने कित्येक महिने लांबली. तेव्हा आपणा सर्वांचे श्वास रोखले होते. काळजीने आपण ग्रासलो होतो. सगळे जग तिच्या सुखरूप परतण्यासाठी प्रार्थना करीत होते.अन् आपले मिशन धैर्याने, आत्मविश्वासाने पूर्ण करूनच ती सुखरूप परतली देखील. हे सगळेच अचंबित करणारे आहे. भारतीयांची मान गर्वाने उंचावावी असेच आहे. पण आपल्याकडे मिडिया म्हणा, सरकार म्हणा अशा कार्याची, अभूतपूर्व कामगिरीची म्हणावी तशी दखल घेत नाही. पब्लिकचे रटाळ मनोरंजन करणाऱ्या दुय्यम दर्जाच्या कलावंताना पद्म पुरस्काराने गौरविले जाते. पण सुनीताला असे राष्ट्रीय स्तरावर विशेष पुरस्काराने गौरवावे असे कुणालाच वाटले नाही. हे वैचारिक दारिद्र्याचे लक्षण आहे.

सुनीता विल्यम्स

सुनीता सध्या भारतात आहे. तिने नुकतेच दिल्ली येथे दिलेले भाषण वाचण्यात आले. ते विचार करण्यासारखे आहे. आपण पृथ्वीवर राहून, सगळी सुखं भोगून एक दुसऱ्याशी भांडतो. एकमेकांचा द्वेष करतो. पण वर अवकाशात गेल्यावर आपण आपलेच असतो. आपण त्रयस्थ नजरेने वरून, अवकाशातून पृथ्वीकडे बघत असतो. तिथून दिसणारे अवतीभवतीच्या अवकाशाचे चित्र अद्भुत असते. सुंदर असते. न कुणाचा राग, ना कुणाचा द्वेष, ना कुणाशी स्पर्धा, ना कसली रेस.. सगळे अलिप्त तेच्या भावनेत विरघळलेले. आपले कर्तव्य, आपली जबाबदारी, आपल्या मिशन पूर्ती वरील निष्ठा, विजयीभावनेवरची असीम श्रध्दा हे सारे जास्त महत्वाचे असते तिथे वर गेल्यावर. करोडो रुपये खर्च झाले असतात या प्रकल्पावर. शेकडो गणिती, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कारागीर, कामगार यात गुंतले असतात. वेगवेगळ्या स्तरावर त्या प्रत्येकाचे काही ना काही योगदान असते. त्यामुळे अवकाशात मिशन वर गेलेल्या व्यक्तीवर फार मोठी जबाबदारी असते. नेमून दिलेले कार्य, नेमून दिलेल्या पद्धतीनेच, नेमून दिलेल्या वेळात, गुणवत्तेशी कसलीही तडजोड न करता, जीव ओतून करणे हेच त्या स्पेस सायंटिस्टचे एकमेव ध्येय असते. इथे साधी चूक देखील महागात पडू शकते. जीवावर बेतू शकते. तुमच्याच जीवावर नाही. तुमच्या बरोबर असलेल्या सहकार्याची देखील निष्ठा, जबाबदारी तितकीच महत्त्वाची. त्याच तोलामोलाची हवी असते.

आजच्या तरुणांनी, महिलांनी सुनीता विल्यम्स कडून खूप शिकण्यासारखे आहे. आजकाल या जेन झी पिढीत चंगळवाद वाढला आहे. प्रामाणिकपणाचे, परिश्रमाचे मोल, महत्व कमी होत चालले आहे. सगळे सगळ्यांना इन्स्टंट हवे आहे. फुकटात हवे आहे. सवलती हव्या आहेत. साधना, तपश्चर्या, झोकून काम करणे, एकमेकांना बरोबर घेत पुढे जाणे, स्वतः इतकाच दुसऱ्याचाही विचार करणे या गोष्टी आपल्या तरुण पिढीच्या मनातून, समाजातून हद्दपार होत चालल्या आहेत की काय ? असे वाटु लागले आहे. ज्यांच्या मताने सरकार निवडून येते त्या समाजाची नस सत्तापिपासू पुढाऱ्यांनी चांगलीच ओळखली आहे. त्यामुळे लाडकी, लाडके, असे लाड सुरू आहेत. सुनीता विल्यम्सच्या अभूतपूर्व यश बद्दल, दैदिप्यमान कामगिरी बद्दल तिचे लाड कौतुक करावे असे कुणाही सत्ताधारी भारतीयाला वाटले नाही. हे बुद्धिमत्ता गहाण असल्याचे लक्षण आहे. आपण आदर्श हीरो कुणाला मानायचे, कुणाचे गुणगान गायचे हे संस्कार नीट झालेच नाहीत आपल्यावर. त्यामुळे त्याच त्या नावांचा जप आपण करत बसतो वर्षानुवर्षे. त्याच त्या लोकांची आरती ओवाळण्यात धन्यता मानतो आपण. अजूनही आपल्या मनातील जळमटे दूर होतच नाहीत. म्हणूनच जग कुठे चालले आहे, आपलेच भारतीय कुठे किती चांगली कामगिरी करताहेत, तंत्रज्ञान पुढे नेण्यात योगदान देताहेत याची आपल्याला खबरबात च नसते. सुनीता विल्यम्स चे स्वागत प्रत्येक विद्यापीठात व्हायला हवे होते. संशोधन संस्थेत तिचे सत्कार व्हायला हवे होते. नव्या पिढीने तिला जवळून बघायला हवे, तिला ऐकायला हवे. धुरंधर सारख्या डोकेदुखी मनोरंजनात डूबलेल्या जेन झी पिढीने आता जागे व्हायला हवे. आपले आदर्श बदलायला हवेत. आयुष्याला योग्य दिशेने नेव्हीगेट करायला हवे.

जाता जाता.. ज्या मोबाईल ने आज सर्वांचे आयुष्य बदलून टाकले त्या वायरलेस कम्युनिकेशन तंत्राचा शोध सव्वाशे वर्षापूर्वी भारतात, कोलकत्यात डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावला (मार्कोनी ने नाही!) हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे ? उघडा डोळे बघा नीट !

डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9