अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था ही गेल्या पन्नास वर्षांपासून ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी काम करीत आहे.
ज्येष्ठ नाटककार प्रभाकर पणशीकर (मुंबई), श्री. भालबा केळकर (मुंबई), श्री. नारायणराव नाईक (मुंबई), श्री. श्री. मो. मराठे (पुणे), श्री. चंद्रशेखर जोशी (जुन्नर), श्री. का. पु. वैशंपायन (नाशिक) आणि डॉ. नि. ह. कुलकर्णी अशा मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. नाशिक येथील ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे हे विद्यमान अध्यक्ष म्हणून तर उदयकुमार मुंगी हे कार्याध्यक्ष, सुभाष सबनीस हे कार्यवाह म्हणून काम पहात आहेत.
वेगवेगळ्या कालखंडांमध्ये विविध कार्यकर्त्यांनी अखंड परिश्रम घेऊन उभी केलेली ही संस्था वेगवेगळे उपक्रम तडीस नेत आज पन्नास वर्षे पूर्ण करीत आहे. संस्थेसाठी जागा मिळविण्यापासून त्या जागेवर संस्थेची इमारत उभी रहावी यासाठी तन, मन, धनाने योगदान देऊन कार्यकर्त्यांनी निधी संकलन केले. नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे सभागृह उभे केले. हे सर्व कार्य उल्लेखनीय आहे.

ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर समाजातील विद्यार्थ्यांनी नाशिकसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना रहाण्याची सोय उपलब्ध करून देणारी म्हणून या संस्थेची ख्याती आहे. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील हजारो विद्यार्थ्यांनी आजपर्यंत याचा लाभ घेतला आहे.
संस्थेच्या आवारात श्री विघनहर्ता गणेशाचे अतिशय सुबक मंदिर बांधण्यात आले आहे. गणेशजयंतीला गणेशयागाचे आयोजन करण्यात येते. तेव्हा नाशिकमधील भक्तगण मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. या निमित्त लोकांच्या भेटीगाठी होतात व सौहार्द वाढते.
संस्थेची विविध केंद्रे नाशिक, पंचवटी, पुणे, जुन्नर, फलटण, करमाळा, लोणंद, शिरवळ येथे कार्यरत आहेत. जुन्नर केंद्राची स्वतःची वास्तू उभी आहे. पुणे केंद्र एक सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका चालवत आहे.
अनिष्ट रुढींचे निर्मूलन, उच्च आचारविचारांची जपणूक, पोटशाखा भेद कमी करणे, विभागीय संमेलने घेणे, राज्य पातळीवर अधिवेशन घेऊन विविध संस्थांमध्ये विचारांची देवाणघेवाण करणे, जनमानसातील विविध समस्या सोडविण्यासाठी सांघिक योजना करणे, तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करणे, वैद्यकीय कायदेशीर सल्ला देण्यासाठी केंद्र चालविणे, विवाहसमस्या सुलभ करणे अशी उद्दिष्टे समोर ठेवून गेली पन्नास वर्षे ही संस्था मार्गक्रमण करीत आली आहे.
१९७२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचा सुवर्णमहोत्सव नाशिक येथे नुकताच, ५ दिवस विविध उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला.
या महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात अस्थिरोग चिकित्सक डॉ. विजय काकतकर यांनी केले. तर भाजप नेते श्री. किरीट सोमैय्या यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निमित्त नाशिक येथे पाच दिवसीय भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ह. भ. प. चारुदत्त आफळे यांचे तीन दिवस वेगवेगळ्या विषयांवर कीर्तन झाले. २१ डिसेंबर रोजी सादर झालेल्या कीर्तनाचा विषय होता ‘विवेकानंद आणि आजचा युवक’. यातून युवकांना जीवनाची वाटचाल करण्यासाठी चांगले मार्गदर्शन मिळाले.
२२ डिसेंबर रोजी ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ हा विषय कीर्तनातून मांडला होता. तर २३ डिसेंबर रोजी ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ यांच्या जीवनावर कीर्तन होते. या विषयांवरील कीर्तनांमुळे श्रोत्यांच्या मनात चांगलेच विचारमंथन झाले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभप्रसंगी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पन्नास मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हे मान्यवर केवळ ब्राह्मण ज्ञातीपुरते मर्यादित नव्हते हे विशेष. हे सत्कार नाशिकमधील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले. या मान्यवरांना त्यांच्या कार्याबद्दल मानपत्र प्रदान करण्यात आले.

सत्कार झालेल्या मान्यवरांची नांवे –
सुप्रसिद्ध संपादक आणि पत्रकार श्री. उदय निरगुडकर, ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक श्री. दीपक करंजीकर, डॉ. मंजुषा कुलकर्णी, श्री. माधव अभ्यंकर, श्री. संतोष हुदलीकर, श्री. विद्याधर निरंतर, श्री. महेश दाबक,
डॉ. दिनकर केळकर, डॉ. विकास गोगटे यांचे सत्कार २१ डिसेंबर रोजी करण्यात आले. तर पीतांबरीचे श्री. रवींद्र प्रभुदेसाई, कविवर्य श्री. सी. एल. कुलकर्णी, सीए विनायक गोविलकर, पत्रकार श्री. सुशील कुलकर्णी, श्री. विकास काकतकर, डॉ. हर्षद आराधी, सौ. अनुश्री आराधी, श्री. रतन लथ, श्री. शेखर गायकवाड, श्री. देवेंद्र बापट यांचे सत्कार २२ डिसेंबरच्या समारंभात करण्यात आले.
संगीतकार व कवी श्री. अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते श्री. प्रदीप वेलणकर, सुप्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे, श्री. विलास शेळके, डॉ. राम पंडित, श्री. दिनेश वैद्य, श्री. श्रीकांत बागूल, डॉ. अतुल वडगावकर, श्री. मकरंद तुळणकर, श्री. मकरंद ओक यांचे सत्कार २३ तारखेच्या समारंभात करण्यात आले.
या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. महिला व पुरुष पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. करवीर पिठाचे शंकराचार्य आणि कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. नाशिकमधील सर्व चित्रपट आणि टीव्ही कलाकार यांची रॅलीत उपस्थिती होती.
बी. डी. भालेकर मैदानापासून सुरु झालेली ही रॅली नाशिकमधील महत्वाची ठिकाणे घेत संस्थेच्या आवारात संपन्न झाली. सर्वांची एकी व्हावी आणि सर्वांनी आनंद घ्यावा हा संस्थेचा उद्देश अशा उपक्रमांमुळे साध्य झाला असे म्हणता येईल.
रॅलीनंतर सकाळी १०.३० वाजता सत्यविनायक पूजन आणि महाआरती या मंगल कार्यक्रमासाठी जगद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी (करवीर पीठ, कोल्हापूर) यांची उपस्थिती लाभली. सायंकाळी ५ वाजता मान्यवर समाजबांधवांचा सत्कार सोहळाही संपन्न झाला. अभ्यंकर सभागृह, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था या ठिकाणी संपन्न झालेल्या या सत्कारसोहळ्यात सत्कारमूर्ती होते, श्री. विनायक रानडे, श्री. विलास शिंदे, श्री. प्रशांत जुन्नरे. डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर, श्री. विजय सूर्यवंशी, डॉ. शामा कुलकर्णी, डॉ. प्रसाद जोशी, पं. विजय जकातदार, श्री. सुनील धोपावकर व श्री. महेश वैद्य.
रविवार २५ डिसेंबर रोजी सुवर्णमहोत्सवाच्या सांगता सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती लाभली संकेश्वर करवीरपिठाधिश्वर शंकराचार्य श्री सच्चीदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती महास्वामी यांची.
सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील समस्त समाजबांधवांचा मेळावा व सत्कारसमारंभ आयोजित केला होता. सत्कारमूर्ती होते, श्री. महामंडलेश्वर अनिकेत शास्त्री देशपांडे, डॉ. आशुतोष रारावीकर, श्री. धनंजय जोशी, श्री. सुविनय दामले, श्री. गजानन देवचके, श्री. मुकुंद भट, श्री. प्रणव माजगावकर, श्री. संदीप लोंढे, श्री. प्रकाश कोल्हे, श्री. मिलिंद गांधी. हा सत्कार समारंभ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात संपन्न झाला.
समाजाच्या प्रगतीचा विचार करणाऱ्या, चांगल्या विचारांचे आदानप्रदान करणाऱ्या आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अभिनंदन !

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +91 9869484800