“शिंगाड्याच्या शेवयांची खीर”
बऱ्याच लोकांचे वर्ष भरात उपवास, व्रत वैकल्य असतातच. पण तेच ते साबुदाणा,भगरीचे पदार्थ खाण्याचा खूपच कंटाळा येतो. अशावेळी झटपट बनवून पोटभरणारा, भरपूर एनर्जी देणारा, गरम गरम आणि खायलाही सोपा असा पदार्थ बनवावा वाटतो सर्वच गृहिणींना. हो ना ? म्हणूनच आज आपण शिंगाड्याच्या शेवयांची झटपट बनणारी, पौष्टिक,टेस्टी खीर बनवूया. या शेवया घरीही बनवू शकतो, पण बाजारात ही मिळतात.
साहित्य :
1 वाटी शेवयांचा चुरा, 2 चमचे साजूक तूप, पाऊण लिटर दूध, 8..10 बदाम, पाव वाटी साखर, 1 चमचा दुध मसाला, सजावटीसाठी केशर
कृती :
या शेवया पांढऱ्याशुभ्र, नाजूक कुरडयासारख्या गोल तारांचे वेढे असलेल्या खूप सुंदर दिसतात. कडक असल्याने त्यांचा चुरा सहज बनवू शकतो. प्रथम बदाम पाण्यात 3..4 मिनिटे उकळून थंड पाण्यात टाकून त्यांची साले काढावीत. मग यांचे बारीक पातळ काप करावेत. गॅसवर कढईत दूध उकळायला ठेवावे.
ते थोडेसे आटवून घ्यावे. त्यामुळे चवदार बनते. आता त्यात साखर, घालून दुधमसाला घालावा आणि पुन्हा मंद गॅसवर उकळत ठेवावे. दुसऱ्या बाजूला छोट्या कढईत तूप घालून ते गरम झाले की त्यात शेवया घालून मस्त तांबूस, गुलाबी रंगावर परताव्यात. या शेवया कुरडयांसारख्या मस्त फुलतात आणि हलक्या होतात. आता या उकळणाऱ्या दुधात घालाव्यात. पुन्हा उकळी आली की वाटीत थोडेसे गरम दूध घेऊन त्यात केशर घालून ते चमच्याने छान हलवून खिरीत घालावे व छान उकळली की खीर सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्यावी. सजावटीसाठी वरून पिस्ते, गुलाबपाकळ्या, आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकतो.
वैशिष्ट्य :
उपवासाला साबुदाणा, तेलकट पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे पित्त वाढते, खूप त्रास होतो. पण या शिंगाड्याचे फायदे इतके आहेत की ते समजल्यावर सारेच बाकीचे पदार्थ सोडून ही खीरच खातील. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, पचन सुधारणे, वजन कमी करण्यास मदत करणे आणि शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, शिंगाड्यामध्ये असलेले फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला आवश्यक पोषण देतात आणि विविध आरोग्य समस्या कमी करण्यास मदत करतात. फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. वजन नियंत्रणात राहणे, हिरड्यांच्या समस्या दूर थायरॉईड नियंत्रण करणे, लो ब्लडप्रेशरची समस्या दूर करते.असे आणि यापेक्षाही कितीतरी फायदे आपल्याला याच्या सेवनाने होतात. आपण याच्या पिठाची पण खीर याच पद्धतीने तुपावर भाजून केली तरी छान लागते. ज्यांना गोड नको असेल ते याचा तळून चिवडा किंवा उपमा सुद्धा करु शकतात. ते सुद्धा खूप टेस्टी बनतात शिवाय पोट सुद्धा लगेंच भरते.
आता उपवास केले तरी आरोग्याची काळजी करण्याचे कारण नाही !

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800