Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यस्पंदन : शब्द चांदण्यांचे

स्पंदन : शब्द चांदण्यांचे

प्राध्यापिका सौ. मानसी मोहन जोशी ह्यांचा “स्पंदन” हा काव्य संग्रह म्हणजे शब्दात वसलेलं चांदणंच…

शोपिझन वर प्रकाशित झालेला हा काव्य संग्रह म्हणजे विविध कवितांची नक्षीदार रांगोळी..

रांगोळीत जश्या वेगवेगळ्या आकारांच्या विविध नक्षी, सुरेख, सुंदर रंगांनी नटलेल्या असतात, तश्याच वेगवेगळ्या विषयांना, शब्दांचे रंग लेवून, सजवलेला हा काव्य संग्रह..

हा काव्य संग्रह अर्पण केला आहे, आपले लाडके काव्यगुरु श्री. अशोक बागवे सर ह्यांना आणि काव्यप्रेमी रसिक मैत्रिणींना..म्हणजेच आपल्याला ही..!☺️

मानसीताई मनोगतात लिहितात, आरशात उमटलेलं मानवी मनाचं प्रतिबिंब म्हणजे कविता..ते मन कधी निसर्गाशी जुडत, तर कधी माणसांशी, काही घटनांशी..हो ना…
तर अश्याच विविध विषयांवर रचलेल्या ह्या कविता..
सुरवात स्पंदना ने…
त्यात मानसीताई लिहितात…

मी आहे तर स्पंदन आहे…
नात्यामधले बंधन आहे..
खरंच.. जीवनाची सुरवात आपल्या पासूनच आहे..

पुढे “राधाकृष्ण, ओलेती, चांद्रमुखी, माझी आई, जागृती”, मैत्र, थंडी, गुरुदेव दत्त, माझी मराठी, ललना अश्या एकशे सात कविता आहेत…

खासियत म्हणजे सर्व विषयांना स्पर्शल आहे.. तितक्याच हळुवारपणे.. निसर्गाच्या आनंदा बरोबरच मानवी मनातल्या व्यथा, परमेश्वराची ओढ, भक्तीची तन्मयता अगदी स्त्री म्हणून भूमिका अश्या सर्वांगीण विषयावर भाष्य करणाऱ्या कविता आहेत..

आई म्हणजे आपल्या सर्वांच्या मनातला हळवा कोपरा.. जाता माहेरच्या वाटा, सय तुझी येते आई
“अंगणात तुझी मूर्ती,
आणि दारी जाई जुई”
वाचताना डोळ्यात टचकन पाणी येतच आणि आईच्या आठवणीने जाई जुईचा सुगंध हृदयात उमलते…

तशीच एक वेगळी कविता “मनाचं कपाट”.. आवरायला घेतलेलं हे कपाट, जुन्या आठवणीने भरलंय.. आणि कटू आठवणीने डोळ्यात येणारा पूर आवरून, संध्याकाळ हसत मुखाने साजरी करू अस मानसीताईंनी लिहिलंय..सकारात्मक दिशा दाखवत…

खरं तर स्त्रियांना दागिने फारच प्रिय असतात. दागिना ह्या कवितेची सुरवात बघा…
“चेहऱ्यावरचे हास्यच असते
आयुष्यातला खरा दागिना
खळखळून हसताना जातील
मनात लपलेल्या
जुन्या वेदना”

निसर्गवर्णन करताना  “धुक्याची सकाळ” ह्यात लिहिलंय
दवबिंदूचे सडे शिंपूनी
धुंद लालिमा मोहक कांती…

“तू एक स्त्री”  ह्या कवितेत स्त्री तिच्या विविध भूमिका निभावत असते… तरी आधी माणूस होत जग सांगताना….
तू नाही अष्टभुजा
नाही दुर्गा भवानी
माणूस होत जग
हीच कामना मनी..
असं साध्या, सोप्या शब्दात स्त्रीचं अंतरंग उघडलं आहे…

समारोप करताना ‘ती’ ह्या कवितेमधून मानसीताई म्हणतात..
भक्तीचा महिमा कवितेमधे
भक्त व्याकुळ जाहले
विठ्ठलाच्या दर्शनासी

भक्तीची अनिवार ओढ चितारली आहे…थेट आत्माशी आत्म्याशी सांगड साधत…
स्मितरेषा ढळू न देता
सगळ्यांसाठी राबणं
जमते कशी कला तुला
अलवार मनं जपणं..

निसर्ग, स्त्री, भक्ती, मातृत्व, धरणी, निशा, तरुणी, मुलगी अश्या सर्व तरंगाचे साकव बांधत केलेली ही शब्दरचना, आपल्याला तरल अनुभूती देईल हे नक्की..

प्रतिभा चांदूरकर

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments