यश संपादन करायचे असेल तर त्या साठी दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे अफाट कष्ट करण्याची तयारी आणि दुसरी उतुंग इच्छा शक्ती, यांच्या जोरावर जगातील कोणतीही व्यक्ती यश प्राप्त करू शकते. मग ती कितीही सामान्य असो वा कितीही गरीब…!! याचंच उदाहरण म्हणजे प्रकाश फासाटे ! अगदी सर्व सामान्य आणि बिकट परिस्थितीतून यश संपादन करून आज मोरोक्को देशात ते स्थायिक झालेत, त्यांचीच ही यशगाथा, त्यांच्याच शब्दांत …….
मी मूळचा हरिगांव येथील !!!
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हे छोटेसे गाव..वडील साखर कारखान्यात नोकरीला होते. परंतु त्या वेळी म्हणजे 1980 सालचा काळ, अगदी सातशे रुपये पगारामध्ये घर चालवणे आणि मुलांचे शिक्षण करणे ही त्यांच्यासाठी खूप तारेवरची कसरत असायची. परंतु अशाही परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू नये ही त्यांची तळमळ आणि मुलांचे भविष्य उज्वल व्हावे ही आतंकरणापासून असलेली इच्छा हीच आमच्या यशाला कारणीभूत ठरली.
लहानपणी आम्हाला कधीही मौजमजा किंवा आवडीनिवडी पैशाच्या अभावाने जोपासता आल्या नाही. उलट काटकसर आणि पर्याय कसे शोधायचे व कमी खर्चात चांगले काम कसे करायचे हा व्यवस्थापनाचा मूलमंत्र परिथितीमुळेच शिकायला मिळाला.
कोणत्याही परिस्थितीकडे जर सकारात्मकतेने बघितले तर मनुष्य जीवनात नक्की यशस्वी होतो. याउलट आपण जर नुसत्या तक्रारी करत बसलो तर प्रगती न होता पेच निर्माण होत राहतात हे रहस्य त्या वेळी लक्षात आले.
लहानपणी वडिलांची नोकरी ही कायम स्वरूपी नव्हती. पण आमच्या शिक्षणासाठी त्यांनी कष्ट केले. मला एक मोठा भाऊ, आमचे शिक्षण ह्याही परिस्थितीत चालु होते.
मी मराठी शाळेत आठवीला असतांना 1987 साली आमचा साखर कारखाना व्यवस्थापनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्व कामगारांच्या नोकऱ्या एका क्षणात गेल्या.-त्या वेळी मोठा भाऊ दहावीच्या वर्गात होता आणि मी आठवीच्या !!
आमच्यावर खूप बिकट वेळ आली होती.
पण प्रत्येक रात्रीमागे एक आशेची पहाट असते अस म्हणतात. तशी आशेची पहाट आमच्या आईच्या रुपाने आमच्या पाठीशी प्रत्येक वेळी होती. आईने त्यावेळी हिम्मत न हारता शेळीपालन, कुक्कुटपालन आणि गोपालन हे लघुउद्योग सुरु केले व आमच्याच गावातील बालवाडीत मदतनीस म्हणून छोटीशी नोकरी चालु केली.
पण समुद्रात जश्या लाटा थांबायचं नाव घेत नाही त्या प्रमाणे संकट आम्हाला सोडत नव्हते. एका मागे एक संकटे सतत येत होती. त्याच वर्षी वडील कॅन्सरने आजारी पडले आणि एक वर्षात वडिलांचे
देहावसन झाले…खरोखर आता मात्र आम्हाला आणि आईला कोणताच आधार उरला नाही. राहायला घर नाही, जवळ पैसा नाही अश्या परिस्थितीत आयुष्याचा डोंगर कसा पार करायचा हा प्रश्न समोर ठाम मांडून उभा राहिला, पण ध्येयाकडे जायचे असेल तर तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावे लागते मग निसर्ग आणि काळ आपोआप मदत करतो असं म्हणतात. संकटे सुद्धा मायाळू असतात फक्त त्यांना जवळ घेता आलं पाहिजे त्यांना समजून घेतल की मग तेच मार्ग सुचवतात.
आम्ही सर्व जण काकाच्या घरी राहायला गेलो. भाऊ दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आमची मावशी त्याला नाशिकला घेऊन गेली. मी गावातच राहिलेले शिक्षण दहावी पर्यंत पूर्ण केले. एव्हाना परिस्थितीची जाणीव झाली होती आणि शिकून नोकरी मिळवणे हाच आपल्याला आता पर्याय आहे हे समजून चुकले होते.
पुढे कॉलेजला वर्गातील मित्रांच्या सल्ल्याने सायन्स ला प्रवेश घेतला आणि केमिस्ट्री मध्ये पदवी मिळवली.
पण ही पदवी मिळवतांना सुद्धा खूप कष्टातून जावे लागले. आम्हाला अगदी तुटपुंज्या पैशात सगळ्या गरजा भागवाव्या लागत. कधी बसच्या पाससाठी तर कधी चहा साठी पैसे नसायचे, मग वर्षभर सायकलवर कॉलेजला जावे लागे. रोज वीस किमी प्रवास करून थकायला व्हायचं, शिवाय कॉलेज मध्ये चार चार तास प्रॅक्टिकल करून उपाशीपोटी पुढील तास करावे लागे पण हे सर्व करतांना मनात एकच जिद्द होती की आपल्याला यश मिळवायचेच !
कोणत्याही यशामागे किती यातना असतात हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे हया म्हणी प्रमाणे आपण जो पर्यंत अनुभवत नाही तो पर्यंत कळत नाही. कॉलेज संपले आणि लगेच मित्राच्या ओळखीने औरंगाबादला चांगल्या फार्मा कंपनीत नोकरी लागली. सुरवातीला खूप कष्ट करावे लागले. अगदी सोळा सोळा तास काम करावे लागत असे. तो काळ सुद्धा खूप त्रासदायक होता. दोन दोन शिफ्ट आठवड्यातून कराव्या लागत. यश मिळण्याच्या अगोदर तुम्हाला या सर्व अग्नी परीक्षेतून जावेच लागते.
त्यातही नंतर नोकरी करून कॉलेज केले आणि पुढील शिक्षण घेऊन औरंगाबादला मी मास्टर डिग्री मिळवली.
सहा वर्षानंतर मग परदेश नोकरीची आमच्या साहेबांकडून संधी चालून आली आणि मी संधीचं सोनं केलं.
आज जवळपास अकरा वर्षापासून मी इकडे व्यवस्थापक पदावर नोकरी करतोय आणि परिवारसहित स्थायिक झालोय.सन 2018 मध्ये मोरोक्कोला भारताच्या तत्कालीन विदेश मंत्री सुषमा स्वराज आल्या होत्या. त्यांनाही सपत्नीक भेटण्याचा योग आला कारण पत्नीही इकडे आयुष मिनिस्ट्रीत योगा ट्रेनर आहे आणि इकडे योगाचे क्लास चालवते.
मी इकडे फ़्रेंच आणि अरेबिक भाषांचे ज्ञान घेऊन त्याही भाषा कालांतराने आत्मसात केल्यात.
आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा तो कष्टाचा काळ आणि बघितलेले दिवस मात्र कधीही विसरू शकत नाही. अपयश, अपमान, अवहेलना यांचा अनुभव जीवनात यायलाच हवा त्या शिवाय यश, मान, सन्मान यांची किंमत कळत नाही. आणि मुख्य म्हणजे बिकट परिस्थितीतून जर मनुष्य यशाच्या शिखरावर गेला तर अहंकार अंगी येत नाही हे एक सत्य आहे.

– लेखक : प्रकाश फासाटे. अल जदीदा. मोरोक्को.
(नॉर्थ आफ्रिका)
– संपादक : देवेंद्र भुजबळ +91 9869484800