“९ बीआरडी अकौंट्स सेक्शन”
‘मी फार दुःखी आहे रे ! तू आत्ताच का जॉईन होत नाहीस ? असे म्हणून बॉस गुप्ता श्रीनगरला परत न जाता इथेच जॉईन हो म्हणून माझ्या मागे लागले! कसेबसे मी त्यांना समजावले की मी श्रीनगरमध्ये माझे सामान आणि बाकीची कामे करून ठरल्या दिवशी आपल्या सेवेला हजर होतो पण आत्ता मला थांबता येणार नाही.’
पुण्यात ऑफिस जॉईन केल्यावर समजले ते इतके का काकुळतीला आले होते ते !
ऑक्टोबर १९९८ दोन भल्या मोठ्या ट्रंका, होल्ड ऑल आणि एक लाकडी बॉक्स असे माझे गेल्या दोन वर्षातील वाढलेले सामान घेऊन मी श्रीनगर ते जम्मू आर्मी कॉनव्हॉय मधे बसून निघालो होतो. बनीहाल बोगद्याच्या जागी काही कारणाने गाड्या अडकून पडल्या होत्या, तेव्हा पाय मोकळे करायला म्हणून मी थोडासा दूर गेलो आणि तिथून मला संपूर्ण काश्मीर व्हॅली दिसत होती. मनात म्हटले आता हे शेवटचे येणे, त्यावेळी कल्पना नव्हती की पाकिस्तानचे कारगिल घेण्याचे मनसुबे रचले जात होते !
सगळे सामान पार्सल व्हॅन मध्ये टाकून जुजबी हातात घेऊन पुण्यात खाली उतरलो. मला कल्पना नव्हती की माझे उरलेले सामान हे मला परत मिळायला जवळजवळ दोन आठवडे लागतील! मला न्यायला गाडी आली होती. त्याआधी माझे पार्सल व्हॅन मधले सामान उतरवून घेण्याकरता म्हणून मी गेलो तर त्या दिवशीची प्लॅटफॉर्म सोडून ती बोगी आणखीन पुढे उभे होती. त्यामुळे कोणालाच त्या वॅगन मधून सामान बाहेर काढून आम्हाला देणे शक्य नव्हते. म्हणून त्या क्लार्कने सांगितले की सर तुम्ही असे करा की आम्ही सामान बाजूला काढतो पण आत्ता न येता उद्याला या. तोपर्यंत हे सामान आम्ही आमच्या गोडाऊन मध्ये ठेवतो.
म्हणून मी तिथून परत येताना बीआरडी च्या रोजच्या जाण्याच्या ट्रकच्या ड्रायव्हरला तो हो म्हणाला म्हणून ती पार्सल व्हॅन मधून बाहेर काढण्याकरता लागणारी रिसीट त्याच्या हातात दिली. पुढे झाले असे की तो ड्रायव्हर काही कारणानी ड्युटीवरच आला नाही! मीही वाट पाहत बसलो. मध्यंतरीच्या काळात माझे सामान पुण्याच्या पार्सल व्हॅनच्या गोडाऊनमध्ये येऊन पडलेले आहे की नाही, हे पाहायला गेलो तर ते तिथेही नव्हते! चौकशी करता असे कळले की ती पार्सल व्हॅन त्यातील सामान न काढताच मुंबईला जाणाऱ्या एका ट्रेनला लावली गेली आणि त्यामुळे ती आता मुंबई ते पुणे या रस्त्यावर जा-ये करते. माझ्या सामानाचे काय झाले ? असे विचारता, ते म्हणाले की ते सामान बहुतेक अजूनही तिसऱ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवरच आहे. मी तिथे जाऊन पाहेपर्यंत प्रचंड पाऊस सुरु झाला होता. मी भिजत भिजत ते सामान कुठे आहे पाहत फिरत होतो. एखाद्या रस्त्यावरचे कुत्रे पावसाच्या पाण्याने भिजलेले, कुडकुडत बसलेले, जसे दिसते तसे माझे सामान संपूर्ण पावसाचा जोर झेलत एका कोपऱ्यात पडलेले होते.त्यात भारी सामान, कपडे, युनिफॉर्म, काही पुस्तके असल्यामुळे ती कशा परिस्थितीत मिळतील याचा विचार करत दोन आठवडे गेल्यानंतर ते सामान मला माझ्या ताब्यात मिळाले. उघडून पाहता प्रत्येक बॉक्सच्या आत लावलेल्या प्लास्टिकच्या चादरीने आतील सामानाची स्थिती अगदी सुस्थिती होती.
ऑफिस मधील वातावरण कटकटीचे होते. मी ज्याला रिप्लेस केले, तो माझ्यावर रागावला होता. तुमच्यामुळे माझी पुण्यातली पोस्टिंग आता संपली, असे म्हणत असे. तो माझ्याशी धड बोलतही नसे आणि कोणाशीच त्याचे पटत नसे. त्याला दिलेले काम तो नीट करत नसे. ऑफिसमध्येही त्याच्या तरकटी वागण्याने स्टाफ वैतागला होता. तो नीट कोणाशी बोलायचा नाही. एक ना दोन, गुप्ता ‘मी दुःखी आहे’ असे मला जे म्हणाले ते खरोखरच होते. काही दिवस गेल्यानंतर त्याची पोस्टिंग आली. तो गेला.
मी एकटा असूनही मला सगळ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे सगळे सुरळीत झाले. विमानांचा 9 बेस रिपेअर डेपो हे त्याचे नाव. तिथे १९६२ सालपासून सगळा सिव्हिलियन लोकांचा भरणा होता. आता त्यातील एक एक लोक रिटायर होत होते. मला त्यांच्या फेरवेलला जावे लागे. त्यातून सिव्हियन क्लार्क, टेक्निशियन्सशी सलोख्याचे संबंध झाले. त्यातील एकानी मला नान उमरीगर यांच्या बद्दल माहिती सांगितली. नंतर ज्यानी ऑटो रायटिंगची दीक्षा दिली.
इथेच माझी भेट डॉ. वि. ह. कुलकर्णी सरांशी झाली. त्यांच्याबरोबर मॅप डाऊझिंगचे प्रयोग केले. विमानांसाठी बांधलेल्या टारमॅकच्या काँक्रीटच्या २० बाय २० च्या एका चौकोनात माझी स्कूटर ठेवली. अशा आणखी ९ चौकोनांचा एक चौरस नकाशा तयार केला. डॉक्टर कुलकर्णी आपल्या घरात १० किमी दूर बसून डाऊझिंग वरून मला सांगत राहायचे की तुम्ही जे काही ठेवलेले आहे ते २ सी चौकोनात आहे. त्यांना माहित नव्हते की मी माझी स्कूटर तिथे वस्तू म्हणून ठेवली होती. त्यांनी डाऊझिंग करून सांगितलेली वस्तूची जागा जोपर्यंत आमचा हा प्रयोग चालू होता तोपर्यंत अगदी बरोबर येत होते. आपल्या सैन्य दलाला त्यांच्या वाटेत पुरून ठेवलेले बॉम्ब शोधण्याकरता डाऊझिंग विद्येचा वापर आपण करू शकतो त्याकरता तुम्ही पुढाकार घेऊन मला तशी परवानगी वरिष्ठांनी द्यावी पण त्यांचे कोणी ऐकले नाही. ही डॉक्टर कुलकर्णी यांची तक्रार असे. त्यांच्या मॅप डाऊझिंग विद्येची सत्यता प्रयोगाने सिद्ध करण्याची गरज होती. ते प्रयोग करून पाहण्यासाठी माझी मदत त्यांना झाली. डाऊझिंग करून दुसऱ्या महायुद्धानंतर पुरलेले बॉम्ब शोधायला वापर केला गेला तसा उपयोग करता येणे शक्य आहे, हे त्यांचे म्हणणे मला तरी अगदी पटले. डाऊझिंग हे ऑकल्ट सायन्स आहे त्यामुळे त्यावर विसंबून राहून असे प्रयोग करणे मान्य होणार नाही, तुम्ही त्याच्या नादाला लागू नका असे माझे म्हणणे त्यांना नंतर पटले.
एअर चीफ मार्शल टिपणीस फेअरवेल विजिटमध्ये ९ बी आर डीला आले असताना, मी परेड कमांड केली. तो एक वेगळाच सन्मान मला मिळाला. नाठाळ सिविलियन लोकांपैकी बायका पांढऱ्या साडीत आणि पुरुषांना पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट ह्या युनिफॉर्म मध्ये आणण्याकरता माझे मैत्रीचे संबंध कामाला आले. तेही या परेडमध्ये सामील होऊन गेले. नंतर अनेक जण म्हणाले की सर, असे आम्हाला परेड ग्राउंडवर उभे राहून चीफ ऑफ एयर स्टाफना मान वंदना देण्याची आयुष्यातील ही पहिलीच घटना आहे. हवाई दलात सेवा करतो याची जाणीव आम्हाला झाली.
जानेवारी २००१ ला मला बी आर डी हून २विंगच्या अकाउंट्स सेक्शन मध्ये पोस्टिंग वर जावे लागले. तिथे तिथले किस्से सांगतो. २६ जानेवारी २००१ ला कच्छ भागात अत्यंत मोठा भूकंप झाल्यामुळे विमानाने मोठ्या प्रमाणात मदत पाठवली गेली. त्यामध्ये रात्रंदिवस काम करण्याकरता टारमॅकवर जाणाऱ्या येणाऱ्या विमानांच्यावर देखरेख करण्याकरता मी हजर असे. अशाच एका दिवशी कॉर्पोरल पांडे धावत पळत आला आणि म्हणाला, ‘सर मला या उभ्या असलेल्या विमानातून भूजला जायचे आहे’. अशा तऱ्हेचे कोणी काही कारण नसताना विमानातून नेणे चुकीचे होते, परंतु जेव्हा तो म्हणाला सर, ‘भूज हवाईदल स्टेशन दुरुस्तीला हवाई दलातील लोक काम करतील. पण जे आपले सर्वस्व गमावल्यामुळे रस्त्यावर आलेले आहेत तेही आपल्या सारखीच माणसे आहेत, आपण फक्त हवाई दलाच्या लोकांबद्दल विचार करता. मला अशा दीनहीन लोकांना, जनावरांना वाचवायला जायचे आहे. माझे शरीर मी त्यांच्यासाठी उपयोगात आणू इच्छितो. मला असे हातावर हात ठेवून बसून राहणे मान्य नाही. तुम्ही कसेही करून मला विमानातून पाठवा’. नंतर तो खरोखरच एका विमानात लपून बसून गेला. त्यानंतर त्याने जे काही अद्भूत केले, ते हवाई दलातील आमच्यासारख्यानाही जमले नसते. चार भागाची सिरीज मी लिहिली आहे ती इच्छुकांनी जरूर वाचावी.
२००१ सालच्या जनगणना कामासाठी मला नियुक्त केले गेले. त्यामुळे मला ब्रीफिंग घेण्यासाठी मुंबईच्या मंत्रालयात जाण्याची संधी मिळाली. जनगणना करून त्याचा एक रिपोर्ट आम्ही पुण्यातील कार्यालयात सादर केला, तेव्हा तो वेळेच्या आधी कॉम्प्युटर मधला पहिलाच रिपोर्ट होता. सोमवारच्या परेडमध्ये तो सर्वासमक्ष तू मला द्यावास, नंतर वाचून दाखवावास अशी आज्ञा केली. आमचे कमांडिंग ऑफिसर म्हणजेच जे नंतर एअरचीफ मार्शल झाले ते एअर कमांडर अनिलकुमार ब्राऊन होते. त्यांनी परेड कमांडर, मला डायसवर चढून अहवाल सादर करण्याचा मान मला दिला म्हणून २५ वर्षानंतरही लक्षात आहे.
मी पुणे हवाई दलाचा वेल्फेअर ऑफिसर असल्यामुळे वारंवार तक्रारी येत होत्या की पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर वॉरंट एक्सचेंज करण्याकरता म्हणून गेलो तर दोनदोन, तीनतीन तास लागतात. कारण पूर्वी कुठल्याही खिडकीपाशी जाऊन ते काम पटापट होत असे. ते आता बंद झाले आणि एकाच खिडकीवर वॉरंट एक्सचेंज करण्याचे काम होत आहे म्हणून उशीर होतो असे म्हटले गेले. मी स्टेशन मास्टरांना याबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले, ‘आम्हालाही कल्पना आहे की तुम्हाला अशा तऱ्हेच्या कटकटी निर्माण झाल्या आहेत. परंतु मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही, कारण मध्यंतरी मध्य रेल्वेचे चीफ राजेंद्रकुमार इन्स्पेक्शन करताना आले असताना त्यांनी अशी आज्ञा दिली आहे. त्यामुळे जर काही यात बदल करायचा असेल तर फक्त तेच करू शकतात. हवे तर तुम्ही त्यांना भेटायला मुंबईच्या सीएसटीच्या आमच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटा’. खरे तर अशा गोष्टी प्रत्येक स्टेशनवर असलेल्या एम सी ओ (मोमेंट कंट्रोल ऑफिसर) कडून व्हायला हव्यात. परंतु त्यानेही नकार दर्शवला, म्हणाला, ‘त्याच्याकडून असा बदल होणे असंभव आहे. अत्यंत कठोर निर्णय घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. संपूर्ण स्टाफ त्यांना अत्यंत टरकून असतो. मी काही त्यांना जाऊन भेटणार नाही’. अशा या त्रांगड्या कामाची घंटा माझ्या गळ्यात पडेल अशी मला कल्पना होती. कडक व्यक्तीचा मुकाबला मला करायला लागणार होता. मी त्यांच्या ऑफिसच्याबाहेर बसलो असताना आतून खाली मान घालून चेहरा पाडलेले बरेच मला दिसत होते. त्याचवेळी काही कारणाने आत त्यांना भेटायला जाणाऱ्यांचे बोलणे आणि हा भाव यामधून बॉस भलतेच कडक आहेत हे लक्षात येत होते. प्रत्येक लाँग डिस्टन्स ट्रेनला पाच मिनिटापेक्षा जास्त उशीर का झाला हे यासाठी ते स्टेशन मास्टरना जबाबदार धरून असे काही तंबी देत होते, स्टेशनवरील रंगरंगोटी, स्वच्छता वगैरै काही मजेशीर घटना मला त्यावेळी ऐकायला मिळाल्या.
अशा परिस्थितीत मी जेव्हा त्यांना भेटलो, त्यावेळेला आपल्या फायलीतून डोके वर काढून मला येस ऑफिसर, म्हणत बसायला सांगितले. आमचे गाऱ्हाणे ऐकून ते म्हणाले की हो मीच तसा निर्णय दिलेला आहे आणि मी तो परत घेणार नाही. मी फक्त त्यांना एवढेच म्हणालो की आमची गरज ही सगळ्या खिडक्यांवर काम करायला मिळावे अशी नसून एकाच खिडकीवर जे कामाचे दडपण येते ते कमी करण्याकरता आणि आमच्या सैनिकांना तासन्तास उभे राहण्याची शिक्षा न व्हावी यासाठी मी आपल्याला असे सुचवतो की एकच्या ऐवजी तीन खिडक्यावर ते काम करायला द्यावे आणि याशिवाय पुण्यामधील कॅम्प आणि रविवार पेठेतील कार्यालयातूनही वॉरंट एक्सचेंज करण्याकरता परवानगी द्यावी. त्यांनी पुण्यातल्या स्टेशन मास्तरांना फोन करून सांगितले की मी जे त्यांना विनंती करून म्हटले होते तो निर्णय पाळा.जी कामे हवाई दलात नसतात तरीही माझ्यासारख्यावर विश्वास टाकल्याने वेळेत ती पूर्ण करणे, अशा लहान लहान गोष्टी जरी असल्या तरी त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर होतो.
आणखीन एक किस्सा फारच रंजक आहे .एअर कमोडर रानडे म्हणून आमचे खूप सिनिअर होते. पूर्वी ते व मी जनकपुरीला राहत असल्यामुळे त्यांच्याशी माझी ओळख फक्त बॉस म्हणून राहिली नाही. एक दिवशी त्यांचा फोन आला म्हणाले, ‘मी आता रिटायर होऊन बरीच वर्षे झाली.एका रंगीत फोटोसाठी युनिफॉर्म घालून मी उभा राहणार नाही’. असे म्हणून ते रुसून बसले.
‘सर तुम्ही अकौंट्सच्या जीएसआय गौरवाच्या पोस्टवर होता. आता जे जीवंत आहेत त्यांचे फोटो लावणासाठी विनंती तुम्ही का धुडकावताय? मी युनिफॉर्म, रिबिन्स, पीक कॅपची व्यवस्था करतो. पण हा हट्ट सोडा’. नंतर काय झाले माहित नाही.
असाच एकदा फोन आला. ‘ओक, तू एओसीशी बोलून एओसी इनसीला भेटायला अपॉईंटमेंट घे. मी संजीवन संस्थेच्या वतीने दिल्ल्लीतील सेंट्ल अकौंट्स ऑफिसमधे बसून ज्यांचे आईबाप भुकंपात मेले आहेत त्यांच्य अनाथ जीवंत बालकांच्या केसेसची कागदपत्रे तयार करून द्यायला पुढाकार घेऊन आमच्या खर्चाने काम करू इच्छितो. तशी परवानगी मिळवायला मला भेटायचे आहे’. एयर कमोडोर ब्राऊन म्हणाले, ‘ओक, तुला असे वाटते का की आपण अशा केसेस हाताळू शकत नाही ? ‘सर तुम्ही म्हणता ते मान्य आहे. पण अशा काही मोजक्या केसेसमधे जी बालके त्यांच्या वयाच्या १८व्या वर्षी पासून फॅमिली पेन्शन घ्यायला लागू होतील त्यांच्यासाठी त्यांच्या घरच्या पत्त्यावर जाऊन हवी ती कागदपत्रे त्यांच्या इतर नातेवाईकांकडून मिळवून देण्यासाठी खेटे मारायचे काम मागे पडून दुर्लक्षित होईल. एयर कमोडोर रानडे त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या संजीवन संस्थेतर्फे म्हणजे अनेक जण कारावासाची शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर समाजात सामावून जाण्याला मदत करतात. त्यांना अशा दुर्लक्षित होत जाणाऱ्या अनाथ बालकांच्या केसेस हाताळायचा अनुभव आहे म्हणून ते आणि एक अकौंट्स ऑफिसर मानवतेच्या दृष्टिकोनातून कामाला परवानगी मागत आहेत’.
‘ओक तू म्हणतोस ते पटले पण अशी परवानगी दिली तर हवाई दल कुचकामी असा शिक्का बसेल. म्हणून तू नाही म्हणून सांग. संजीवन अशा लोकांसाठी काम करणारी संस्था आहे. हे ऐकून चांगले वाटले’.
मी एयर कमोडर रानडे बोलतोय. फोनवरून आवाज आला. तुला एक काम सांगणार आहे आणि माझी खात्री आहे की ते तूच करू शकशील. एक सिव्हिलियन बाई आहे, म्हातारी आहे, ती नुकतीच येरवडा जेलमधून सुनेला जीवे मारण्याच्या कारणाने १४ वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आली आहे. तिचा नवरा हवाई दलात क्लास फोर सिविलियन होता. त्यामुळे त्याला पेन्शन मिळत होती. मधल्या काळात तो मेल्यामुळे फॅमिली पेन्शन तिला मिळायला हवी. त्या सिविलियनचे सर्विस डॉक्युमेंट शोधून पेन्शन ऑफिसला संपर्क करून तिची फॅमिली पेन्शन तिला सुरू करण्यासाठी तू हे काम हातात घे. त्यांनी हेही सांगितले की हे काम जवळजवळ अशक्य आहे’.
पेन्शनचे काम अकौंट्स ब्रांचचे नाही तरी त्यांच्या शब्दाखातर मला एखाद्या अशा पीडित व्यक्तीला मदत करण्याची पहिलीच वेळ होती. असे कळले की ज्या युनिटमध्ये तो सिव्हिलियन काम करत होता ते बंद झाल्यामुळे त्याचे नोकरीचे डॉक्युमेंट्स मिळणे अवघड होते. मी माझ्या बाजूने प्रयत्न केले आणि सिव्हिलियन अॅडमिन सेक्शन मध्ये काही लोकांना त्या वृद्ध बाईची मदत करणे हे तुमचे मानवतेचे काम आहे असे बिंबवले. त्यानंतर बरीच वर्षे मध्ये गेली. आणि एक दिवशी मी काही कामाने नागपूरचाळ भागात गेलो असता एक व्यक्ति माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, ‘सर कदाचित तुम्ही मला ओळखणार नाही पण तुम्ही विंग कमांडर शशिकांत ओक आहात हे ड्रेसमध्ये नसताना सुद्धा ओळखतो. असे म्हणून त्यांनी आपला परिचय दिला म्हणाला, ‘सर पूर्वी आपण मला पेन्शनच्या संदर्भात एका बाईची केस माझ्याकडे सोपवली होती. त्या कामाचा मी पाठपुरावा करत जुने सगळे कागदपत्र शोधून तिला तिची शिक्षा संपली असल्यामुळे फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गरजा पूर्ण करत त्या वृद्ध महिलेला तिचे फॅमिली पेन्शन सुरू करणारी ऑर्डर मिळवून दिली. कदाचित ही गोष्ट आपण विसरुनही गेला असाल, पण आज इतक्या वर्षांनी तुम्ही माझ्यासमोर दिसल्याबरोबर मला तुमच्याशी बोलून त्या घटनेची आठवण करून द्यावीशी वाटली. हे काम करण्यासाठी तुम्ही जे शब्द वापरलेत आणि आम्ही सिव्हिलियना आमच्या कर्तव्याची जाणीव करून दिलीत. “एक दिवशी तुम्ही सुद्धा पेन्शन घेणार आहात. पेन्शनवाल्या लोकांच्या गरजा आणि त्यांना होणारी गैरसोय ही तुम्ही आत्ता सर्विस मध्ये असताना जर लक्षात घेतली नाहीत तर तुमचा काय उपयोग? हे काम व्हायलाच हवे. हे फक्त एक कर्मचारी म्हणून नव्हे तर हवाई दलातील आपल्या एका मृत सहकाऱ्याचे काम आहे असे म्हणाला होता”. ते बोल मला प्रेरणा देऊन गेले आणि शेवटी त्या बाईंच्या हातात ती ऑर्डर देताना मला अत्यंत समाधान वाटले. विंग कमांडर ओकांनी माझ्यावर जे काम सोपवले होते ते मी पूर्ण केले. आज आपण समोर दिसल्यानंतर आपल्याला सांगताना मला त्या कार्याची पूर्ती झाल्याचा आनंद होत आहे. समोरासमोर बसून आम्ही चहा घेत असताना त्यांनी सांगितलेले कथन मला आज या भागात आठवणीने सादर करताना समाधान वाटते.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800