Wednesday, December 3, 2025
Homeसेवाहव्यात अशा शाळा, असे शिक्षक !

हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !

त्या शाळेचा पट आता उरला होता जेमतेम चौदा ! शाळा पहिली ते सातवी पर्यंत. तशी शाळा खूप जुनी. म्हणजे इमारतीलाच जवळपास दिडशे वर्षे होऊन गेलेली. परंतु अजूनही ते ब्रिटिश कालीन बांधकाम जसेच्या तसे. फक्त आता माकडांनी उच्छाद मांडल्याने कौले फुटून पावसाळ्यात त्यातून पाणी गळायचे. भिंती जुन्या काळच्या दगडी, उंचच्या उंच.. पावसाळ्यात कोण छपरावर चढेल..

दिवस मे महिन्याचे.. माकडांनी बरीच कौले फोडून ठेवलेली. आताच ती बदलली नाहीत तर पावसाळ्यात काही खरे नव्हते..!! त्यामुळे नवीनच आलेले दोन तरुण शिक्षक काही उत्साही पालकांना घेऊन शिड्या लावून त्या उंच छपरावर चढून नवीन कौले बसविण्याचे काम करीत होते. आतापर्यंत पालकांनी आणि शिक्षण खात्यानेही दुर्लक्षिलेल्या शाळेत, ही लगबग पाहून येणारे जाणारे नागरिक किंचित थबकून आश्चर्याने पाहत आणि ‘सांप्रती हा कोण नवा अवतार अवतरला..’ असे म्हणून पुढे जात..

त्या नव्या अवतारांचे नाव होते श्री. संतोष घोटुकडे सर आणि श्री. सुनील बैकर सर..!!

तर मंडळी एका तालुक्याच्या मुख्य ठिकाणच्या या शाळेचे नाव “रायगड जिल्हा परिषद” मराठी शाळा, तळे.

गावात एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेने आता चांगलेच बाळसे धरले होते आणि गावातीलच संस्थेची एक सेमी इंग्लिश मिडीयम शाळाही चालू होती. त्यामुळे या गरीब बिचाऱ्या जिल्हा परिषद शाळेत कोण मुले पाठवणार.. आसपासच्या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा असेच आचके देत चालू होत्या. त्यामुळे हे आता असेच चालणार.. आणि एके दिवशी ही शाळा इतिहास जमा होणार हे सत्य गावातील लोकांनी स्वीकारले होते !!

हल्ली इतिहास हा फक्त मतलबापुरता उरला असल्याने या शाळेचाही इतिहास कोणाला ज्ञात असण्याची शक्यता नव्हतीच !!

रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री, पद्मविभूषण डॉ. सी .डी. देशमुख यांनी ज्या दगडी शाळेत पहिली मुळाक्षरे गिरविली आणि इयत्ता चौथी पर्यंत ते ज्या शाळेत शिकले तीच ही शाळा हे आता फारसे कोणास माहीत असण्याचे कारण नाही.. असो..

तर मंडळी आज शिक्षण क्षेत्राची किती वाताहत झालेली आहे, आणि शाळा आणि शिक्षण हे सुद्धा धंदा झालेला आहे हे आपण पाहत असतानाच अजूनही काही ध्येय वेडे शिक्षक इथे उरलेत हे पाहून प्रचंड आश्चर्य वाटते आणि आशेचे किरण दिसू लागतात.

वर उल्लेख केलेले श्री. संतोष घोटुकडे सर इथे आले तेंव्हा शाळेच्या पटावर फक्त चौदा मुले उरली होती. पहिली ते सातवी शाळा आणि चौदा विद्यार्थी..!! त्यांनी जीवाचे रान केले आणि विद्यार्थी संख्या पन्नास वर नेली. त्यासाठी उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण, अगदी सुरुवाती पासून उत्तम इंग्लिश शिकविणे, पालकांचा प्रत्यक्ष सहभाग आणि चोवीस तास विद्यार्थ्यांसाठी देण्याची तयारी हे त्यांचे गुण उपयोगी पडले.

सुनील बैकर सर

त्या नंतर श्री. सुनील बैकर सर हे मुख्याध्यापक म्हणून आले. वर्ग सात..शिक्षक दोन.. समोर आव्हानांचा डोंगर.. परंतु श्री. सुनील बैकर सर हे एक ध्येय वेडे शिक्षक !! दोन हजार एकोणीस साली श्री. सुनील बैकर सर यांची जिल्हा परिषद तळे मराठी शाळेत बदली झाली आणि या आमच्या ऐतिहासिक शाळेचे नशीब पालटले. अर्थात तेंव्हा कोणाला याची जाणीव झाली असण्याची शक्यता नाही.. एक नियमित बदली म्हणून आलेला हा मुख्याध्यापक.. किती दिवस उत्साह दाखवतो ते पाहू.. असाच एकूण आविर्भाव असावा..

परंतु आता इतिहास घडणार होता.. श्री. सुनील बैकर सर यांनी आता संकल्प केला होता की या शाळेला मी गतवैभव प्राप्त करून देईन. आव्हान प्रचंड मोठे होते. येणारे विद्यार्थी निम्न स्तरातील होते. पालक शैक्षणिक बाबतीत फारशी मदत करू शकणार नव्हते. स्पर्धा दोन प्रस्थापित शाळांशी होती. स्पर्धा आजिबात तुल्यबळ नव्हती. त्यातच आता श्री. संतोष घुटुकडे सरांची सांगलीला बदली झाली. आव्हान अधिक खडतर झाले !

परंतु हार मनातील ते बैकर सर कसले !! त्यांनी विचार केला, जिल्हा आणि राज्य स्तरावरील स्पर्धा परीक्षा हे आता आपले लक्ष.. बस्स.. ध्येय निश्चित झाले.. परंतु जिथे सामान्य वार्षिक परीक्षा देणे ज्या विद्यार्थ्यांना अवघड आहे, अशा विद्यार्थ्यांना थेट स्पर्धा परीक्षांचे आव्हान कितपत पेलवेल हा मोठा प्रश्न होता.

आता श्री. सुनील बैकर सर यांची कसोटी होती. त्यांनी हे आव्हान स्वीकारले. आठवड्याचे सातही दिवस. एकही सुट्टी न घेता विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे वर्ग सुरू झाले. श्री.सुनील बैकर सर यांनी एक यज्ञ आरंभीला होता. त्यात स्वतःच्या खासगी आयुष्याची आहुती त्यांनी आनंदाने दिली होती. उद्दिष्ट एकच होते,इतर दोन्ही शाळांनी आजवर एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण करून दाखविला नव्हता.मी हे करून दाखवीन !

आणि मग जे घडले तो इतिहास आहे !!

आज रा. जि. प. मराठी शाळा तळे या शाळेचे पंचवीस विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहेत..!! या बाबतीत शाळेने केवळ तालुक्यात नाही तर जिल्ह्यात टॉप केले आहे !! त्या शिवाय साठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून पैकी तीस विद्यार्थी मेरिट मध्ये आले असून त्यांना राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळते !! वर्ष २०२४ – २५ मध्ये चोवीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी अठरा उत्तीर्ण झाले आणि नऊ जणांना स्कॉलरशिप मिळाली !! आर टी एस रायगड परीक्षेत दोन विद्यार्थी यशस्वी झाले. गणित संबोध, होमी भाभा बाल वैज्ञानिक, मंथन प्रज्ञाशोध या परीक्षांमधूनही विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले. पैकी एका परीक्षेत जिल्ह्यातील तीस यशस्वी विद्यार्थ्यांपैकी फक्त एक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थिनी जिल्हापरिषद शाळेतील होती.. बाकी सर्व खासगी शाळेतील होत्या.. आणि ती विद्यार्थिनी आपल्या तळे शाळेतील होती..!!

सुनील बैकर सर २०१९ साली आले आणि लगेच २ शिक्षक येथून बदलून गेले. वर्ग १ ते ७ आणि शिक्षक दोन.. बाजूला दोन खाजगी शाळा.. त्यांच्याशी स्पर्धा करायची तर शिक्षक संख्या वाढवावी लागणार म्हणून तूर्त का होईना शिक्षक मिळावेत अशी त्यांनी प्रशासनाला विनंती केली. ती प्रशासनाने मान्य केली. पालकांचा अढळ विश्वास आणि स्पर्धा परीक्षेत दिसलेली गुणवत्ता या बळावर कमी शिक्षक असूनही यश मिळत गेले. आज एकशे आठ विद्यार्थ्यांचा पट आहे. पूर्वी मुलींची असलेली शाळेची इमारत आता या शाळेला मिळाली आहे. तिचे नूतनीकरण समाजसेवक रायगड भूषण कृष्णाजी महाडिक यांच्या सहकार्याने घडवून आणून एक आकर्षक इमारत आता तेथे तयार झाली आहे. सुसज्ज सभागृह, ऑफिस, सी सी टीव्ही, स्टीलची टेबल्स, या सारख्या विविध भौतिक सुविधा त्यांनी ट्रस्ट च्या माध्यमातून पुरवल्या त्यामुळे पालकांचा ओढा वाढला.

सन २०१९ अगोदर ज्या शाळेला स्पर्धा परीक्षा माहित नव्हती ती शाळा आज जिल्ह्यात टॉपची शाळा आहे.. म्हणूनच ती एक अद्भुत शाळा आहे.. शिक्षणासाठी सर्वस्व वाहिलेल्या त्यागी शिक्षकांची ही एक कथा आहे.. बदनाम झालेल्या शिक्षण खात्याविषयी आपुलकी निर्माण करणारी ही सफल कहाणी आहे.. अगदी एक किंवा दोन झपाटलेले शिक्षक कसे आणि किती परिवर्तन घडवून आणू शकतात याचे हे चालते बोलते उदाहरण आहे !!

दिनांक १८ ऑगस्ट २५ रोजी या माझ्या शाळेत.. जिथे मीही माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला त्या माझ्या या शाळेत, प्रमुख पाहुणा म्हणून या सर्व स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला जाण्याचा योग आला.चौपन्न वर्षांनी मला पुन्हा शाळेत जाता आले आणि शाळेचे हे यश समजले.. अक्षरशः छाती अभिमानाने भरून आली.

आज शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. सुप्रिया जामकर, केंद्र प्रमुख श्री. मुबिन वासकर सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.भास्कर गोळे.. आणि या सर्व यशाचे सूत्रधार श्री. सुनील बैकर सर यांच्या हातात आमची शाळा सुरक्षित आहे.

सध्या श्री. सुनील बैकर सर यांना जिल्ह्यातून प्रचंड मागणी आहे. खात्याने त्यांचा रायगड जिल्ह्याचे आयडॉल शिक्षक म्हणून गौरव केला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी थेट रोह्या पासून कर्जत पर्यंत असे त्यांचे दौरे चालू असतात. जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्यासी द्यावे या उक्ती प्रमाणे त्यांचे हे ज्ञान दानाचे कार्य चालू आहे !

आज ना उद्या श्री. सुनील बैकर सर येथून बदलून जाणार. ते अपरिहार्य आहेच.. परंतु त्या नंतर सौ. मितल वावेकर सारख्या कार्यक्षम शिक्षिकेच्या हाती किंवा श्री. सुनील बैकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या इतर नवीन पिढीकडे आता पुढील सूत्रे असतील. आणि अत्यंत समर्थ पणे ही नवी टीम ती पेलतील हे ही नक्की..

शाळेतून निघताना, मनात विचार आला, देशातील सर्व शाळा अशा हव्यात आणि सर्व शिक्षक बैकर सरांसारखे हवेत, तर आपल्या देशाला महान होण्यापासून कोण रोखू शकेल ?

सुनील कुळकर्णी

— लेखन : सुनील कुळकर्णी. तळे, जिल्हा रायगड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ,
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

49 COMMENTS

  1. असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात त्यातलेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच *श्री.सुनील बैकर सर…..* हे माझे मामा असल्याचे मला सार्थ अभिमान वाटतो. जीवनात खूप साऱ्या अडचणींना सामोरे जाऊन मिळवलेल्या या यशाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन ❤️🙌🏻 तुमच्या पुढील वाटचालिसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचे हे यश अभिमानास्पद आहे..!!💐🙏

  2. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपड करणारे, आपले ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे माननीय श्री. सुनिल बैकर सर.
    शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्यासाठी आज तुमच्या सारख्या ध्येयाने भारावून गेलेल्या शिक्षकांची समाजाला नितांत गरज आहे आणि असे शिक्षक आमच्या शाळेला लाभले हे आमचे भाग्य आहे.
    सुनिल सरांचे व्यक्तिमत्व आमच्यासाठी एक आदर्श आहे. सर फक्त शाळेतील मुलांनाच नाही तर पालकांना सुध्दा जवळचे वाटतात. सर्वांच्या सुख दुःखात ते नेहमी हजर असतात. एक आपुलकीचे नातेसंबंध ते नेहमी जोपासत आहेत.
    शाळेच्या प्रगतीबद्दल तर प्रश्नच नाही या अगोदर असे यश जिल्हा परिषद शाळेला कधी लाभले नव्हते, सरांच्या अथक परिश्रमातून सोन्याचे दिवस आमच्या शाळेला लाभले आहेत, धन्यवाद सर, तुमच्या उज्ज्वल कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
    तुम्हाला तुमच्या पुढिल कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

    नाव : सौ. रामेश्वरी मंगेश खैरे
    गाव : भोईरवाडी-तळा.

  3. सुनील सर, यांची शैक्षणिक कारकीर्द ही खरोखर उल्लेखनीय आहे.
    फक्त तळे मराठी शाळाच नाही तर ते ज्या पण शाळेवरती शिक्षक म्हणून रुजू झाल्यापासून सर्वच शाळांमधील त्यांचे विद्यार्थी चांगल्या क्षेत्रात पोहोचले आहेत.

    सुनील सर हे तळा तालुक्यातील बाहुलेवाडी गावचे सुपुत्र असले तरी आम्ही त्यांना आमच्या सोनसडे गावातील आहेत असे आमाला वाटत, खरच ते आमच्या गावातील आहेत कारण सोनसडे गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात ते घर करून बसले आहेत मग ती सोनसडे गावातली कोणती ही व्यक्ती असो सर नेहमीच आमच्या गावातील प्रत्येका च्या घरातली सुखात किव्हा दुखात हजर असतात आमच्या गावातील प्रत्येक व्यक्ती त्यांचा आदर करते

    विद्यार्थी घडविण्यामागे शिक्षकांचा खूप मोठा हात असतो,
    सर्वच शिक्षक तसे स्वयंप्रेरित नसतात पण मग अशा होतकरू शिक्षकांचा आदर्श घेऊन त्यांच्या शिकवणी पद्धतींचा अवलंब करून आप आपल्या मराठी शाळांचा महत्व वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
    कारण आजच्या पालकांना हेच वाटतं की विद्यार्थी फक्त इंग्लिश माध्यमातून चांगले घडू शकतात, त्याचं हे मत फक्त मराठी माध्यमाचा शिक्षकच बदलू शकतो.

    आमच्या गावातील युवकाना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. व काहि युवक तर त्यांचे विद्यार्थी आहेत
    त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष फायदा अनेक शाळांना झाला आहे.

    शिक्षणाबरोबरच ते समाजकार्याचाही ध्यास घेतात. त्यांनी स्थापन केलेल्या मायबाप या संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, विविध उपक्रमांचे आयोजन असे बहुआयामी कार्य ते करीत आहेत. कुणबी समाजाच्या माध्यमातूनही ते समाजातील बांधवांसाठी सदैव तत्पर असतात.

    गुरुजींना जवळून पाहणारा प्रत्येकजण एकच गोष्ट सांगतो – ते मनमिळावू आहेत, स्पष्ट बोलतात, पण कधीही कुणाचा राग मनात ठेवत नाहीत. एखादी चूक झाली तर ती रागावून न दाखवता समजावून सांगतात आणि योग्य तोडगा देतात. परिस्थितीनुसार मदत करणे ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या हृदयात एकच ध्यास आहे – “मराठी शाळा टिकल्या पाहिजेत!”

    आज अशा या शिक्षणप्रेमी, समाजाभिमुख, मनमिळावू व कार्यक्षम गुरुजींच्या कार्याचा प्रत्येक तळा रहिवासी अभिमानाने उल्लेख करतो. त्यांची कामगिरी ही खरंच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.

    सुनील बैकर सरांसारखे गुरुजी लाभणे ही आमची भाग्यरेखा आहे.

    त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व विनम्र अभिवादन

    मंगेश विठ्ठल भोसले
    गाव : सोनसडे

  4. श्री सुनील बैकर सर,
    प्रथमतः तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!! शिष्यवृत्ती नवोदय प्रवेश परीक्षा मध्ये गेले कित्येक वर्ष आपल्याला मिळत असलेल्या यशाबद्दल अभिनंदन!
    तुम्ही स्वतःच्या प्रयत्नातून व तन-मन-धन सर्वच अर्पण करून केवळ तळे मराठी शाळा नव्हे तर संपूर्ण तळा तालुक्यातील तळागाळातील खेड्यापाड्यातील गोरगरीब तसेच गरजू हुशार व इतर सर्वच विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेऊन त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चमकवत आहात. जणू काही या त्यांच्या आयुष्यातील पहिल्या यशाची पायाभरणीच करत आहात.
    अध्यापन कार्य व समाजकार्य या दोन्हींच्या विशुद्ध मिलाफ आपल्या ठायी आहे. साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांप्रमाणे आपली ही धडपड आहे.
    तुम्ही स्वतः एक आदर्श उत्कृष्ट शिक्षक आहातच.. आपल्या तत्त्वांवर कायम ठाम राहणारे ..प्रसंगी त्याकरिता कोणाशीही , कोणतीही तडजोड न करणारे आहात ‌. परंतु विद्यार्थ्या करिता मात्र एक कोमल व सहृदयी मित्राप्रमाणे आहात.
    सहृदयी तरीही शिस्तप्रिय असं व्यक्तिमत्व आहात.. तुमचा मिश्किल व विनोदी स्वभाव शाळेतील व वर्गातील वातावरण बदलून टाकणार आहे. आपला बहुमूल्य असा वेळ तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांकरिता देत आहात. सध्याच्या दिवसात पैसे कोणालाही देणं सोपं आहे परंतु वेळ देणं मात्र कठीण आहे. अशा काळात आपल्या उद्याच्या पिढी करिता आपण घेत असलेली मेहनत कायमच सर्वांना प्रेरणादायी आहे.. सहकारी शिक्षिका म्हणून काम करत असताना आपले शिस्तबद्ध , वेळापत्रक निहायअध्यापनाचे काम जवळून पाहता आहे.. त्यातून मला स्वतःला देखील नक्कीच प्रेरणा मिळाली आहे.. बघूया कितपत जमेल??
    आपल्या पुढील कामाला खूप खूप शुभेच्छा

  5. बयकर सर,
    प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या ह्या व्यक्ती बद्दलचे मत शब्दात कसे मांडायचे काही सुचत नाही, सर तुमच्या बद्दल कितीही बोललो तरी ते कमीच आहे. सर कमी आणि मनमिळावू मित्र जास्त अस तुमचं वैशिष्ट. स्पर्धा परीक्षा मध्ये मुलांना यश संपादन करण्यासाठीची तुमची ती धडपड अविस्मरणीय आहे. तुमची साथ अशीच पुढे आम्हाला लाभू द्या.

  6. श्री बयकर सर म्हणजे स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषदेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना उज्वल यश मिळवून देणारा ज्ञानाचा तळपता भास्कर होय. नोकरी ही केवळ पोट भरण्यासाठी केलेला व्यावसाय नसून तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन समाजात आदर्श नागरिक बनवणारी सेवा आहे, आणि ते मी माझ्या हयातीत शेवटपर्यंत करित राहीन अशी भिषमप्रतीज्ञा घेणारा व त्या
    प्रतिज्ञेशी इमानी रहाणारा ज्ञान भास्कर म्हणजे बयकर सर.

    ज्ञानाचा तळपता भास्कर हे हे हे”
    बयकर मास्तर बयकर मास्तर ”
    विद्यार्थ्यांवर कष्ट त्यांचे अपार
    नवोदयात पोरं केली हुशार जी जी ”
    शिक्षणाची क्रांती घडवली
    त्याने तळ्याला हो हो त्याने तळ्याला
    जिल्हा परिषद शाळा बी मागे नाही
    बांबूची सांगे समाजाला जी जीर जी.
    (शिवशाहीर सचिन कांबळे)

  7. श्री. सुनील बैकर सर तर त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ते फक्त उत्तम शिक्षकच नाहीत तर एक उत्तम व्यक्तिमत्त सुद्धा आहेत. त्यांची ही मुलांसाठी असलेली धडपड मी जवळून पाहिली आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखाच आणि २४ तास मुलांसाठी हजर राहणारे असे बैकर सर. ही त्यांची कामगिरी पाहून मला अभिमान होतो. मुलांसोबत ते जणू त्यांच्या मित्रासारखे पण अभ्यासाच्या बाबतीत मात्र कडक. अशा ह्या गुणवंत शिक्षकाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप

  8. “सुनिल बैकर सरांना माझा पुन्हा पुन्हा प्रणाम. आपल्या विषयी कितीही लिहिले तरी ते अपुरेच ठरेल. आपल्या सारखे आदर्श आणि पुरस्कृत शिक्षक लाभल्यामुळे आम्ही सर्व गावकरी धन्य झालो आहोत. आपण सर्व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहात. आपल्याला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळावा हीच आमची मनःपूर्वक इच्छा आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या शिक्षणातून मुलांचे भवितव्य उज्ज्वल करत आहात, ते आजच्या काळात फारच कमी दिसून येते. आपल्या विषयी अधिक लिहावे असे वाटले तरी माझ्याकडे शब्द नाहीत.”

    तळा – सोनसडे

  9. श्री सुनील बैकर सर यांचा खास परिचय म्हणजे ज्यावेळी आम्ही 2019 मध्ये नवीन नियुक्त झालो आणि प्रथम तळा तालुक्यामध्ये आलो तेव्हा सरांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात आला आणि तेव्हापासून खरी आमची शैक्षणिक मैत्रीला सुरुवात झाली. प्रत्येक गोष्टीमध्ये सरांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळाले व सुखदुःखाच्या वेळी देखील सरांचे आम्हाला खूप साथ मिळाली. सरांबद्दल दोन शब्द व्यक्त करावी वाटतात..

    नवोदय विद्यालयातील उज्ज्वल कामगिरी करणारे शिक्षक.

    नवोदय विद्यालयाचे गुणी, परिश्रमी व विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणास्थान ठरलेले आदरणीय श्री सुनिल बैकर सर आपण अध्यापन क्षेत्रात उत्तम कामगिरी करून शाळेचा मान वाढवला आहे.

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न, नवनवीन अध्यापन पद्धतींचा अवलंब, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व शिस्तीचे संस्कार रुजविण्याचे त्यांचे कार्य स्तुत्य आहे.

    विशेषतः त्यांनी घेतलेला विविध उपक्रम हा देखील उल्लेखनीय ठरला आहे.

    त्यांची प्रामाणिकता, अध्यापनातील निष्ठा व विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळेच ते खऱ्या अर्थाने “विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक दीपस्तंभ” ठरले आहेत.

    विद्यालय परिवार त्यांच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल अभिमान बाळगतो व यापुढेही ते असेच उत्तम कार्य करत राहोत, अशी सदिच्छा व्यक्त करतो.

    आपलाच सहकारी मित्र,
    विनोद तुपे सर,नाशिक.

  10. श्री .सुनिल बयकर सरांचे शैक्षणिक कार्य मी त्यांच्या सेवेतील गेली सतरा वर्ष पहिल्या शाळेपासून म्हणजे बहूलेवाडी शाळेपासून आजपर्यंत पाहतोय. त्यांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व व विद्यार्थ्यांसाठी असलेली आत्मीयता प्रत्येकास अनुकरणीय असीच आहे. त्यांच्या सेवेतील प्रत्येक शाळेतील म्हणजे बहूलेवाडी असो वा सोनसडे अथवा तळे मराठी या प्रत्येक शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना मिळालेला 2019 चा रायगड जिल्हा परिषदेचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” ही त्यांचीच पोच पावती आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!

  11. शिक्षकांचा समाजावर आणि विद्यार्थ्यांच्या
    जीवनावर मोठा प्रभाव पडतो . पालकांच्या
    जीवनात त्यांना खुप महत्व आहे. कारण पालक
    त्यांच्या मुलांसाठी क्षिक्षकांकडुन खुप अपेक्षा
    करतात.
    सुनिल सर तुमच्या मेहनतीला सलाम !!!

  12. मीही या शाळेचा माजी विद्यार्थी, माझे वडील म्हणजे श्री. मारुती शिर्के (गुरुजी) हे ही याच शाळेतून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी आम्हाला या शाळेबद्दल सांगताना पूर्वी या शाळेत मूळ मुलींचा गजबजाट असायचा, जवळपास ३०० च्या आसपास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या शाळेत शिक्षण घेत होते परंतु कालांतराने गावात खेड्यात उत्पन्नाचे साधन नसल्याने ओढे च्या ओढे मुंबईकडे स्थलांतरित झाले आणि शाळेतील किलबिलाट कमी होत गेला.
    मीही या शाळेची उतरती बाजू बघितली आहे कारण एका स्वयंसेवी संस्थेत काम करताना या शाळेशी कायम संपर्कात होतो तेंव्हा शाळेचा पट होता २४… वर्ग ७ वी पर्यंत आणि पटसंख्या फक्त २४…
    हे वास्तव स्वीकारून, ही आव्हान स्वीकारून शाळेला नवी उभारी देण्यासाठी जणू देवाने त्याचे दूत येथे पाठवले आणि मग सुरू झाली यशाची गाथा…
    सकाळी १० ते सायंकाळी ५.०० एव्हढाच माझं काम अस समजून शाळेत शिकविणारे शिक्षक पाहिले आणि विद्यार्थी घडविणे ही माझं काम अस ध्येयाने प्रेरित होणारे आणि नवीन इतिहास घडविणारे श्री. सुनील बैकर सर आणि श्री. संतोष घुटुगडे सर हे शाळेला स्वराज्य समजून हे स्वराज्य नवीन उभारी घेण्यासाठी झटणारे मावळे पाहिले. या दोन अवलियांमुळे फक्त शाळेचा पट वाढला नाही तर शिक्षणाची गुणवत्ता देखील झपाट्याने वाढली. मी या गोष्टींचा याची देही याची डोळा साक्षीदार आहे त्यामुळे माझं भाग्य समजतो की माझ्या शाळेला उभारी देणाऱ्या या जादूगारांची जादू पाहण्यात भाग्य मला लाभलं… या दोन्ही जादूगारांना त्रिवार अभिनंदन…

  13. “शिक्षक सुनील बैकर सर हे केवळ आदर्श शिक्षकच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच जीवनमूल्यांची जाणीव निर्माण करणारे, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि ध्येयासाठी झपाटलेले व्यक्तिमत्व आहेत.”आम्हाला ही अभिमान वाटतो अशा व्यक्तिमत्वाचा आम्हाला ही सहवास मिळतो त्यावेळी नकीच काहितरी नवीन शिकण्यास मिळते.

  14. शिक्षक हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते, त्यातलेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे बयकर सर.

    माझ्या शालेय जीवनात चौथी व पाचवीत मला त्यांचे मार्गदर्शन लाभले. सर त्या दोन वर्षांत तुम्ही माझ्या आयुष्यात अभ्यासाची खरी ओढ निर्माण केली. अभ्यासाविषयी रुची निर्माण करण्याबरोबरच खेळांविषयी प्रचंड आवड तुम्ही माझ्यात रुजवली. एक आदर्श विद्यार्थी घडावा यासाठी लागणारी प्रत्येक बाब तुम्ही माझ्यात जपली.

    सर तुम्ही अतिशय कमी वयात आपल्या कार्यातून मोठं यश मिळवलं आहे. असंख्य विद्यार्थी घडवलेत; केवळ विद्यार्थी नव्हे तर परिपक्व, जबाबदार आणि आदर्श विद्यार्थी निर्माण केले आहेत. तुमची ओळख ही केवळ शिक्षक म्हणून नसून एक आदर्श शिक्षक, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून आहे.

    तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, नवोदय आणि इतर स्पर्धा परीक्षांत यश मिळवलं आहे. कुठल्याही मराठी शाळेला तुमच्या सारखे शिक्षक लाभणे हे खरंच भाग्याचं लक्षण आहे. आपल्या सोनसडे च्या शाळेत सर तुम्ही आल्यानंतर थोड्याच काळात शाळेचं रूपच बदलतात.

    मी तुमचा विद्यार्थी आहे, हे माझं मोठं भाग्य आहे. आजही तुम्ही मला बहुमूल्य ज्ञान देत आहात. तुम्ही केवळ शिक्षकच नाहीत तर एक उत्तम वक्ते, समाजकार्यात पुढाकार घेणारे, आणि प्रत्येक गोष्ट शिखरावर नेणारे व्यक्तिमत्त्व आहात.

    🙏 सर, तुमचं कार्य सदैव असंच तेजाने झळकत राहो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.🙏

    आपलाच विद्यार्थी,
    कु.अजित महादेव गावडे.

  15. मी सोनसडे गावची सरांची विद्यार्थीनी आहे. बयकर सर यांच्या बद्दल लिहायचे असेल तर माझेच काय तुमचेही शब्द कमीच पडतील. बयकर सर हे जरी बहुलेवाडी गावचे असतील पण आमच्या गावाच्या प्रत्येक सुखात पण आणि दुखात पण सामील असतात. लहान मुलांन पासुन ते वयस्कार आजी आजोबांना मदत करणारे आमचे सर. सगळ्यांच्या मदतीला जाणारे. सरांचा एक वाक्य नक्की लक्षात ठेवा आपण एक चांगला माणूस आधी झालो पाहिजे. मला काहीही मदत लागली तरी वडीलांन सारखे धावून येणारे माझे सर. शिष्यवृत्ती, नवोदय यांसारख्या परीक्षांची तयारी करून घेणारे, सुट्टी असून ही मुलांना वेळ देणारे आमचे सर. आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे सर. आमच्या गावासाठी धडपड करणारे सर्वाना समजून सांगणारे माझे सर.

    गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
    आम्ही चालवू हा पुढे वारसा
    त्यांच कौतुक करु तेवढे कमीच असणार आहेत.
    अश्या ह्या माझ्या सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😍🙏

  16. सुनिल बयकर सर तुमच्या विषयी काय बोलायचे आणि किती बोलायचं खरंच माझे शब्दच अपुरे पडतील तरी सुद्धा थोडाफार लिहिण्याची संधी मिळते तर नक्कीच मी प्रयत्न करेन.
    सुनील भाऊ म्हणजे बहुले गावचा भूमिपुत्र नात्याने माझा मावस भाऊ,अवलिया मास्तर ,त्याचबरोबर समाज सेवेने झपाटलेला.शिक्षण म्हणून ज्या ज्या शाळेत तो रुजू झाला त्या त्या विद्यार्थ्यांचे त्याने सोन केलं.त्याचे सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे मानकरी आहेतच पण इतर शाळेतील विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षा युगात टिकून राहावे म्हणून सतत त्यांना मार्गदर्शन करत असतो .आणि तेही फ्री मध्ये बर का .कुठलाही मोबदला न घेता .भाऊ तू एक आदर्श शिक्षक तर आहेसच पण त्याचबरोबर तू एक उत्तम पिता आहेस .
    भाऊ तुझ्या कार्याला माझा सलाम तू माझा भाऊ आहेस अशी ओळख करून देताना माझा ऊर अगदी आनंदाने भरून येतो.
    तू कायम असेच चांगले कार्य करत रहा .
    तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा ..

  17. बयकर सरांचे शैक्षणिक कार्य मी त्यांच्या सेवेतील पहिल्या शाळेपासून म्हणजे बहूलेवाडी शाळेपासून पाहतोय.त्यांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व व विद्यार्थ्यांसाठी असलेली आत्मीयता प्रत्येकास अनुकरणीय असीच आहे. त्यांच्या सेवेतील प्रत्येक शाळेतील म्हणजे बहूलेवाडी असो वा सोनसडे अथवा तळे मराठी या प्रत्येक शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचे सर्व श्रेय बयकर सरांकडे आहे. त्यांना मिळालेला 2019 चा रायगड जिल्हा परिषदेचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” ही त्यांचीच पोच पावती आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…

  18. बयकर सरांचे शैक्षणिक कार्य मी त्यांच्या सेवेतील पहिल्या शाळेपासून म्हणजे बहूलेवाडी शाळेपासून पाहतोय.त्यांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व व विद्यार्थ्यांसाठी असलेली आत्मीयता प्रत्येकास अनुकरणीय असीच आहे. त्यांच्या सेवेतील प्रत्येक शाळेतील म्हणजे बहूलेवाडी असो वा सोनसडे अथवा तळे मराठी या प्रत्येक शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचे सर्व श्रेय बयकर सरांकडे आहे. त्यांना मिळालेला 2019 चा रायगड जिल्हा परिषदेचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” ही त्यांचीच पोच पावती आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…

  19. सुनील बयकर सर हे रायगड जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपारी प्रयत्न करणारे शिक्षक.शिष्यवृत्ती परीक्षा असो वा नवोदय परीक्षा असो हमखास यशाची खात्री म्हणून बयकर सरांकडे पाहिले जाते त्याला कारणही तसेच आहे. मागील काही वर्षांचे शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा यांचे निकाल पाहिले तर बयकर सरांचे मार्गदर्शन लाभलेल्या विद्यार्थ्यांनी या व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. बयकर सरांचे मार्गदर्शन लाभलेल्या विद्यार्थ्यांनी सातत्याने शिष्यवृत्ती मिळविली आहे. इतर शिक्षकांनी प्रेरणा घ्यावी असे उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य बयकर सर गेली अनेक वर्ष करत आहेत.बयकर सर आपले शैक्षणिक कार्य कौतुकास्पद तर आहेच पण इतरांसाठी प्रेरणादायी देखील आहे.

  20. आमचे आदर्श बैकर गुरुजी🙏🙏🙏
    मुलांन प्रती असणारी आपुलकी व बांधिलकी आपण कायम आपल्या कार्यातून जपली आहे.
    आपल्या कार्याला सहकारी भगिनीचा सलाम
    मनापासून शुभेच्छा 👌👌👌

  21. एक आदर्श शिक्षक कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे श्री. बैकर सर.एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना बैकर सर यांचा मराठी शाळा टिकावी म्हणून त्यांचा प्रयत्न असतो मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांची धडधड असते.शाळेच्या बाजूला शैक्षणिक संस्था असूनही या शाळेचा पट आजही टिकून आहे. नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये यांच्या शाळेतली मुल ही हमखास सिलेक्ट होणार अशी खात्री त्यांना असते कारण त्यासाठी मुलांनासोबत ते मेहनत ही ते घेत असतात अगदी एकही दिवस सुट्टी न घेता ते मुलांना शिकवत असतात.अगदी त्यांचे आई, वडील वारले असताना ही त्यांनी शाळेतील नवोदय व स्कॉलरशिप परीक्षा मध्ये बसलेल्या मुलांच नुकसान होऊ नये म्हणून शाळेत शिकविण्यासाठी जात होते.खरंच ध्येयवेडा माणूस. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा नावलौकिक तर आहेच पण सामाजिक क्षेत्रातही त्याचे योगदान असते मायबाप फॉउंडेशन च्या माध्यमातून ते गरजवंताना मदत करत असतात.सतत काहीतरी करण्याची धडपड असते. ते जसे आदर्श शिक्षक आहेत तसेच एक उत्तम जोडीदार आणि एक उत्तम बाबा ही आहेत. स्वतः मराठी शाळेचे शिक्षक आहेत याच भावनेने स्वतःच्या मुलींना ही त्यांनी मराठी शाळेतच शिक्षण दिले आहे. एक पत्नी म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

  22. आमचे आदर्श बैकर गुरुजी 🙏🙏🙏
    मुलांना प्रती असणारी बांधिलकी व आपुलकी तसेच आपल्या तालुक्यातील विद्यार्थी प्रगती साठी जे अविरत कार्य करत आहात.
    एक सहकारी भगिनीचा सलाम
    व शुभेच्छा

  23. नमस्कार baykarsir,

    तुम्ही केलेली मेहनत कौतुकास्पद आणी अविस्मरणीय आहे. तुम्ही मराठी शाळेत येऊन फक्त शिक्षण नाही दिलेत तर तुम्ही मुलांना अणि पालकांचा आत्मविश्वास वाढवला आहे. जर मेहनत केली तर यश नक्कीच मिळेल आणी आज सगळ्याच्या समोर दिसतआहे. आधी करतो मग बोलतो हे तुमचं वाक्य खर केलत तुमच्या या कार्याला माझा मनापासून सलाम आहे. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  24. नमस्कार बयकर सर तुमच्या कामाचे कौतुक करू तेवढे कमीच आहे.तुमची मेहनत आम्ही बघितली आहे .आधी करतो मग बोलतो हे तुमच वाक्‍य तुम्ही खर केल आहे अश्या तुम्ही केलेल्या कार्याला माझा सलाम आहे पुढील वाटचाली शुभेच्या

  25. श्री. सुनील बैकर सर म्हणजेच माझे प्रिय बाबा खरं तर त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ते फक्त उत्तम शिक्षकच नाहीत तर एक उत्तम वडील सुद्धा आहेत. त्यांची ही मुलांसाठी असलेली धडपड मी जवळून पाहिली आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखाच आणि २४ तास मुलांसाठी हजर राहणारे असे बैकर सर. ही त्यांची कामगिरी पाहून मला त्यांची मुलगी असल्याचा अभिमान होतो. मुलांसोबत ते जणू त्यांच्या मित्रासारखे पण अभ्यासाच्या बाबतीत मात्र कडक. अशा ह्या गुणवंत शिक्षकाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 💖💐👏

  26. संतोष घोटूकडे सर व सुनील बैकर सर तुमचं मुलांना शिकवण्याचं कौशल्य व त्यांच्या वरचे अपार प्रेम आहे.त्याचं मोल करणं कशातच शक्य नाही सर.
    गुरु विना विद्या नाही. तुम्ही ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी जी मेहनत घेतली आहे.ती आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं की मे महिन्याच्या सुट्टी मध्ये सुद्धा त्या मराठी शाळेसाठी अपार मेहनत घेतली. कोणताही स्वार्थ नाही फक्त आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि त्यांची चांगली प्रगती व्हावी व त्यांची बसण्या उठण्याची सोय होणे याकडेच तुमचे सातत्याने प्रयत्न असतात. धन्यवाद सर.

  27. श्री. सुनील बैकर सर म्हणजेच माझे प्रिय बाबा खर त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ते एक उत्तम शिक्षकचं नाहीत तर एक उत्तम वडील सुद्धा आहेत. त्यांची ही मुलांसाठी असलेली धडपड मी जवळून पहिली आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखाच आणि २४ तास मुलांसाठी हजर राहणारे असे बैकर सर. ही त्यांची कामगिरी पाहून मला त्यांची मुलगी असल्याचा अभिमान होतो. मुलांसोबत ते त्यांच्या मित्रासारखे पण अभ्यासाच्या बाबतीत मात्र कडक. अश्या ह्या गुणवंत शिक्षकाला पुढील वाटचाली खुप खुप शुभेच्छा.💖💐👏

  28. खूप छान सरांचीमेहनत ह्यावरून लक्षात येते असे शिक्षक सर्वांना भेटले तर जिल्हा परिषदेची शाळा उत्तम होतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  29. सुनील .. हा आमच्या रायगड मधील मित्राच्या समूहातील आदर्श व्यक्तिमत्व.. आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक तर सर्वच राहतात, वेळेत तर सर्वच काम करतात, पण ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करणारा,गोरगरिबांची मुले फक्त शिकली पाहिजेत.. फक्त शिकून पुढे न जाता ती सर्व गुणसंपन्न झाली पाहिजेत,जगाच्या स्पर्धेत टिकली.. वाढली पाहिजेत यासाठी कायम झटणारा.. अवलिया मास्तर… त्याचा इतिहास पाहिला तर सर्वांन कळेल त्यांनी कित्येक मुलांना स्कॉलरशिप ,नवोदय प्रवेश.. करून दिला, आज अनेक कुटुंब आनंदी आहेत,ते केवळ या शिक्षकामुळे… याचे कार्य फक्त शाळे पुरते मर्यादित नाही, आपली आजुबाजूच्या परिसरातील तरुण मुलांना सुद्धा एक करियर मार्गदर्शक म्हणून अनेक व्याख्यान सत्र आयोजन करतो.. गरजवंत लोकांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत करत असतो.. एक आदर्श शिक्षक.. समाजसेवक.. निडर.. उत्कृष्ट वक्ता म्हणून सुनील सर कायम सर्वांच्या स्मरणात राहतात,त्याच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा..

  30. सर हे आमचे भाग्य आहे की तुम्ही आम्हाला शिक्षक म्हणून लाभलात.रायगड जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती व नवोदय या परीक्षेमध्ये तुमची बरोबरी कोणीही करू शकत नाही.या शिक्षकांना माझा प्रणाम..🙏🙏

  31. Sir, it is our luck that you met us as a teacher. Keep up the good work. Best wishes to you for your future endeavors….🙏💯👍

  32. खूप छान, दोघेही शिक्षक ध्येयाकडे होते.ते म्हणतात ना,
    हौसले उन्ही के बुलंद होते है जितकी उम्मीद मे छान होती है!!
    अशा शिक्षकांवर माझा मानाचा मुजरा

  33. शिक्षक+शिस्त प्रिय-क्षमाशील-कर्तव्य दक्ष=शिक्षक
    श्री सुनील बैकर सर यांच्या माध्यमातून प्राथमिक मराठी शाळा तळे(दगडी शाळा)केंद्रीय शाळा असताना तालुका
    ठिकाणी उतरती कळा आलेल्या शाळेची कहाणी हे वास्तव उभे करणारी आहे. तालुक्यातील बहुलेवाडी गावात जन्मलेल्या सरांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडून
    उच्च शिक्षण पदवी प्राप्त करून दिवसा बघितलेले स्वप्न साकार करून शैक्षणीक क्षेत्र निवडले .कुंभार मातीच्या गोळ्या ला आकार देऊन मडकी घडवली जातात असा विचार मनात खुण गाठ बांधून धेय्य पूर्ती करायचीच. त्याप्रमाणे सुनील बैकर सर हे धेय्य वेडे झाले. त्यामुळे आज तालुक्यातील या शाळेची प्रगती होऊन संजीवनी मीळाली.अशा धेय्य वेड्या माणसाची समाजाला खरी गरज असते हे प्रकर्षाने दिसते. सलाम त्यांच्या कर्तत्वाला!
    त्यांच्या बाबतीत “दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती”असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गुणवंत किर्तीवंत, यशोवंत सुनील बैकर सरांना मानाचा मुजरा!!पुढील कारकिर्दीस मन:पुर्वक शुभेच्छा!यशस्वी भवो: किशोर पितळे पत्रकार तळा रायगड ९०२८५५८५२९

  34. ध्येय,चिकाटी,आणि प्रयत्न याचा उत्तम संगम म्हणजे सुनील बैकर सर. बैकर सरांच्या शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन आपण खऱ्या अर्थाने तळा मराठी शाळेचा आणि बैकर सरांचा सन्मान केलेला आहे. बैकर सरा यांच्या बद्दल लिहिलेला हा लेख त्यांच्या कार्य कर्तृत्वाला साजेसा केलेला सलाम आहे असे मला वाटते. आपण बैकर सरांचे केलेलं कौतुक इतर शिक्षकांसाठी देखील प्रेरणादायी आहे.बैकर सर खऱ्याअर्थाने ध्येयवेडे आहेतच त्याचबरोबर इतरांनाही आपल्या सोबत घेऊन जाण्याचा
    त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो म्हणून
    ते आमच्यासाठी देखील प्रेरणास्थान आहेत.
    त्यांच्या पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा

    .

  35. खरंच श्रीबयकर सर यांचे काम खूपच कौतुकास्पद आहे याची मी स्वतः साक्षीदार आहे 2019 सर त्या शाळेत हजर झाले तेव्हा शाळेची परिस्थिती खूप दयनीयहोती दोन शिक्षक आणि सात वर्ग पणबैकर सर यांनी धुरा सांभाळण्यास सुरुवात केली पालकांनी देखील खूप विश्वास ठेवला. त्यांचा विश्वास खरा ठरवण्यासाठी बैकर सरांनी खूप मेहनत घेतली मुलांची शिष्यवृत्ती व नवोदय या परीक्षेची तयारी घेण्यासाठी त्यांनी रविवारी देखील शाळेत आपले ठाण मांडले .मुलांकडून खूप सराव करून घेतला त्यांच्यावर खूप मेहनत घेतली मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतःचे वडील वारल्यानंतर अगदी तिसऱ्या दिवशी ते शाळेत हजर झाले होते .त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले तळे मराठी शाळेतील कित्येक मुलेआज राज्याच्या मेरिट लिस्ट मध्ये झळकली आहेत.अशा या ध्येयवेढ्या गुरुजींना माझा सलाम

  36. सुनील सर, यांची शैक्षणिक कारकीर्द ही खरोखर उल्लेखनीय आहे.
    फक्त तळे मराठी शाळाच नाही तर शिक्षक म्हणून रुजू झाल्यापासून सर्वच शाळांमधील त्यांचे विद्यार्थी चांगल्या क्षेत्रात पोहोचले आहेत.
    सुनील सर हे तळा तालुक्यातील बाहुलेवाडी गावचे सुपुत्र आणि मीही त्याच गावचा असल्याने त्यांचा आदर आणि ते आमच्या गावचे असल्याचा अभिमान तेवढाच आहे.

    विद्यार्थी घडविण्यामागे शिक्षकांचा खूप मोठा हात असतो,
    सर्वच शिक्षक तसे स्वयंप्रेरित नसतात पण मग अशा होतकरू शिक्षकांचा आदर्श घेऊन त्यांच्या शिकवणी पद्धतींचा अवलंब करून आप आपल्या मराठी शाळांचा महत्व वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
    कारण आजच्या पालकांना हेच वाटतं की विद्यार्थी फक्त इंग्लिश माध्यमातून चांगले घडू शकतात, त्याचं हे मत फक्त मराठी माध्यमाचा शिक्षकच बदलू शकतो.

    सुनील सर यांना खूप खूप शुभेच्या.

  37. शिक्षणव्रती थोर गुरुजी – आमच्या प्रेरणेचे अधिष्ठान
    जगात अनेक शाळा आहेत, पण ज्या शाळेने आपल्याला घडवले, घडवून समाजात उभे केले, त्या शाळेचे ऋण शब्दात व्यक्त करणे कठीणच आहे. रायगड जिल्हा परिषदेची आमची दगडी शाळा ही अशीच एक शाळा! एकेकाळी अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही शाळा आज नव्या जोमानं फुलली आहे, तर त्या मागे सुनील बैकर सर या शिक्षकांचे अथक प्रयत्न आहेत.त्या शाळेत केवळ ७ ते १५ विद्यार्थी उरले होते. शाळेची शेवटची घटका मोजली जात आहे असेच वाटत होते. पण, सुनील बैकर सरांनी आशेचा दिवा पेटवला. पालकांना शाळेचे महत्त्व समजावून सांगितले, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली, मुलांच्या गुणांना वाव दिला आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. आणि बघता बघता आज या शाळेत १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही केवळ शाळेची नव्हे तर संपूर्ण तळा गावाची अभिमानास्पद कहाणी आहे.गेल्या सलग पाच वर्षांपासून नवोदय शिष्यवृत्ती परीक्षासारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षेत या शाळेचे नाव झळकत आहे. हे यश योगायोग नाही तर गुरुजींच्या प्रामाणिक परिश्रमांचे फलित आहे. त्यामुळेच सरांना रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार आणि रायगड जिल्हा आयडॉल म्हणून गौरविण्यात आले आहे. शैक्षणिक कार्यशाळांद्वारे त्यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्या मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष फायदा अनेक शाळांना झाला आहे.

    परंतु त्यांचे कार्य इथेच थांबत नाही. शिक्षणाबरोबरच ते समाजकार्याचाही ध्यास घेतात. त्यांनी स्थापन केलेल्या मायबाप या संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, विविध उपक्रमांचे आयोजन असे बहुआयामी कार्य ते करीत आहेत. कुणबी समाजाच्या माध्यमातूनही ते समाजातील बांधवांसाठी सदैव तत्पर असतात.

    गुरुजींना जवळून पाहणारा प्रत्येकजण एकच गोष्ट सांगतो – ते मनमिळावू आहेत, स्पष्ट बोलतात, पण कधीही कुणाचा राग मनात ठेवत नाहीत. एखादी चूक झाली तर ती रागावून न दाखवता समजावून सांगतात आणि योग्य तोडगा देतात. परिस्थितीनुसार मदत करणे ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या हृदयात एकच ध्यास आहे – “मराठी शाळा टिकल्या पाहिजेत!”

    आज अशा या शिक्षणप्रेमी, समाजाभिमुख, मनमिळावू व कार्यक्षम गुरुजींच्या कार्याचा प्रत्येक तळा रहिवासी अभिमानाने उल्लेख करतो. त्यांची कामगिरी ही खरंच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.

    सुनील बैकर सरांसारखे गुरुजी लाभणे ही आमची भाग्यरेखा आहे.

    त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व विनम्र अभिवादन!

    – श्री. मनोज ज. वाढवळ

  38. प्रिय मित्र… आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
    श्री.सुनिलजी बैकर सर…
    आपले त्रिवार अभिनंदन!…

    नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद शाळेला सलग अनेक वर्ष मोठं यश मिळवून दाखवल्याबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन!
    आजवर नवोदय विद्यालयामध्ये तुझ्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झालेले 25 च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच तुझ्या मार्गदर्शनाने 50 ते 60 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. तुझी मेहनत, जिद्द आणि हुशारी यांमुळेच हे शक्य झालं आहे. जिल्हा परिषद शाळेचं नाव रोशन केल्याबद्दल खरंच खूप आनंद झाला आहे. तुझी ही अभिमानास्पद कामगिरी खरंच दीपस्तंभा सारखी प्रेरणादायी आहे! तू जे यश मिळवलंस, ते तुझ्या कठोर परिश्रमाचं फळ आहे. फक्त शैक्षणिक नाही तर सामाजिक चळवळीमध्ये देखील तुझं मोलाचं योगदान आहे. मायबाप फाउंडेशनच्या माध्यमातून तुझी सामाजिक चळवळ चांगली सक्रिय आहे.
    तुझ्या या गगन भरारी कामगिरी कडून प्रेरणा घेत आम्ही देखील तुझ्या वाटेवर चालण्याचा तोडका- मोडका प्रयत्न करत आहोत. थोडं फार यश मिळत आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय तुझी प्रेरणादायी वाटचाल, हेच आहे. कोहिनूर हिऱ्या प्रमाणे असणारे तुझ्यासारखे शिक्षक ही खरी जिल्हा परिषद शाळेची दौलत आहे. अशी कामगिरी प्रत्येक शिक्षकांनी बजावली तर जिल्हा परिषद शाळेला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. तुझ्याकडून प्रेरणा घेत अनेक शिक्षक वाटचाल करत आहेत. भविष्यात नक्कीच तुझ्या या प्रेरणादायी कर्तुत्वाचा ठसा उमटेल आणि तुझ्यासारखे कोहिनूर हिरे तयार होतील. जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळांच्या तुलनेत खूप पुढे जातील, असा आशावाद वाटतो.
    मला खात्री आहे की तू भविष्यातही असेच मोठे यश मिळवणार आणि तुझ्या पावलावर पाऊल टाकण्याची सुवर्णसंधी आम्हाला मिळत राहणार याच सदिच्छा!…
    तुझ्या प्रेरणादायी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस लाख लाख शुभेच्छा!…

  39. सुनील बैकर सरांवर लिहिलेला हा लेख वाचून खूप आनंद झाला. ते फक्त उत्तम शिक्षकच नाहीत तर खरी प्रेरणा आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी केलेलं योगदान अतुलनीय आहे. वैयक्तिकरित्या मला विशेष अभिमान वाटतो कारण सर माझे मामा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवी पिढी घडते आहे, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.🙏♥️

  40. रायगड मधील सहकारी मित्र यांनी केलेलं काम अतिशय वाखण्याजोग आहेत कारण मराठी शाळा ही पटसंख्या कमी होत असताना सरांनी केलेलं जे कार्य आहेत ते अजूनही आहे हे कार्य करताना त्यांनी जो मुलांच्या प्रती असणारा प्रेम आपुलकी व जिव्हाळा जोपासून विद्यार्थ्यांची सर्वोत्तम प्रगती करणे हे एकमेव ध्येय ठेवून असा हा ध्येयवेळा शिक्षक यांनी केलेले कार्य हे खरोखर कौतुकास्पद आहेत आणि तो आमचा खरा मित्र आहे याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे बेकर सर असेच आपण उत्तरोत्तर आपल्या हातून नवोदय आणि शिष्यवृत्ती मध्ये अतुलनीय असे कार्य घडो त्यासाठी खूप खूप सदिच्छा
    आपलाच मित्र
    श्री सचिन घाटे
    सांगली

  41. श्री. बैकर सर म्हणजे ऊर्जेचा अखंड स्रोत आहे.त्यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्य खूपच प्रेरणादायी आहे. त्याची विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ ही वाखणन्या जोगी असते. त्यांच्या कार्यास सलाम
    🙏🙏🙏🙏

  42. शाळा विद्यार्थी यांच्यासाठी सतत झटणारा शिक्षक म्हणजेच माझा मित्र श्री सुनील बैकर सुरुवातीपासूनच विद्यार्थी गुणवत्तेला प्राधान्य देऊन आपल्या शिक्षकी पेशाला आपल्या गावातूनच सुरुवात केली ज्या गावात आपण स्वतः शिकलो त्याच ठिकाणचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक आणि ते सातत्याने अशी परंपरा सुनीलने कायमच ठेवले त्यानंतर सोनसडे तळे मराठी या शाळांमध्ये परंपरा कायम ठेवली शिष्यवृत्ती व नवोदय या परीक्षा मधील यशाबद्दल रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षक बायकर सरां कायमच अभिनंदन करत आले आहेत परंतु तळे मराठी शाळेमध्ये शहरातील शाळा तसेच घटत चाललेली पटसंख्या या सर्वांचे आव्हान पेलत सुनील हे काम आपल्या वैयक्तिक कामापेक्षा शाळेला महत्त्व देऊन केलं त्यामुळेच हे सर्व शक्य झाले तळे मराठी शाळेला सुवर्णक्षण मिळवून दिल्याबद्दल श्री सुनील बैकर सर यांचे हार्दिक अभिनंदन

  43. खरंच श्री. बैकर सर यांचे शैक्षणिक काम कौतुकास्पद आहे गेली 23 वर्ष तळा तालुक्यामध्ये ज्ञानदानाचे काम करत आहेत 2003 ते 2009 या काळात मी सुद्धा रायगड जिल्ह्यामधील तळा तालुक्यातील महागाव केंद्रामध्ये त्यांच्या अध्यापनाचे कार्य जवळून पाहिले आहे. त्यावेळी बायकर सर त्यांच्या स्वतःच्या गावात ज्ञानदानाचं काम करत होते त्यावेळी ते स्वतः सकाळी आठ पासून शाळेत मुलांना घेऊन बसायचे. त्यावेळी त्यांच्या शाळेतील मुलांना 30 पर्यंतचे पाढे पाठांत असायचे. बैकर सर खरंतर स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्त्व आहे त्यांना एखादी गोष्ट खटकली तर ते समोर अधिकारी असले तरी आपल्या मतावर ठाम असायचे. मी जिल्हा बदलीने कोल्हापूर या ठिकाणी आल्यानंतर शिष्यवृत्ती व नवोदय यासारख्या परीक्षांचे मार्गदर्शकाची भूमिका बजावली. शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये आमचा कोल्हापूर जिल्हा व भुदरगड तालुका राज्यात सतत पहिला येत असतो. पण त्याचा त्याचा अभिमान बाळगत मी श्री बैकर सरांचा शिष्यवृत्ती चा निकाल आमच्या तालुक्यातील माझ्या सर्व मित्रांना अभिमानाने दाखवत असतो. कारण शैक्षणिक वातावरण नसतानाही त्या ठिकाणी आपल्या कामाच्या बळावर बंद पडायच्या मार्गावर असलेली शाळा सरांनी आपल्या उत्तुंग अशा शैक्षणिक कार्यातून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नावालौकिकास आणली आणि त्यामुळेच रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. तसेच रायगड जिल्हा परिषदेचा आयडॉल शिक्षक म्हणून त्यांची शिफारस करण्यात येत आहे. यापुढील काळात त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान व्हावा आमच्यासारख्या मित्रांना अभिमानाने बैकर सर माझे मित्र आहेत असे सांगण्याचा योग यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. भविष्यात त्यांच्या या उत्तुंग कार्यातून अनेक बहुजनांची मुले शिकून मोठी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  44. आपण स्वतः जातीने उपस्थित राहून शाळेचे केलेले वर्णन अतिशय रोखठोक आणि खरीखुरी परिस्थिती दर्शविते. एक ध्येयवेडा शिक्षक आपल्या प्रयत्नांतून शाळेचा कशा प्रकारे कायापालट करू शकतो याचे दर्शन आपण आपल्या शब्द प्रपंचातून करून दिले आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. मी स्वतः तळा केंद्राचा केंद्रप्रमुख या नात्याने श्री बैकर सर व त्यांच्या सहकाऱ्यांची शाळेप्रती असणारी धडपड पहात असतो आणि शक्य असेल तेवढे सहकार्य करतो.

  45. आपण एका ध्येयवेड्या शिक्षकाबद्दल लिहिलेला हा लेख वाचून खूप खूप आनंद झाला. आजच्या या युगात चांगलं काम करून सुद्धा एखाद्याचे कौतुक करणे ही गोष्ट फार दुर्मिळ झाली आहे. चांगल्या गोष्टींचे कौतुक झाले तर करणाऱ्या व्यक्तीस चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते. ती ऊर्जा आपण या लेखाच्या माध्यमातून बैकर सरांना दिली आहे . बैकर सरांकडून खूप गोष्टी शिकण्यासारखे आहेत. मराठी शाळेला त्यांनी संजीवनी प्राप्त करून दिली. आज छोट्या शहरातील बऱ्याच शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना वेळ पैसा या गोष्टीचा विचार न करता,त्यांनी हे केलेले कार्य हे एक अलौकिक कार्य म्हणता येईल .शिक्षण क्षेत्रातले त्यांचे योगदान तर खूप मोलाचे आहे.तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपल्या आईच्या नावाने संस्था काढून अनेक चांगले उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
    त्यांच्या कामाचे करू तेवढे कौतुक कमीच आहे त्यांना त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

    • अभिनंदन – सुनिल बैकर सर

      माझे वर्गमित्र सुनिल बैकर आज रायगड जिल्हा परिषद तळे शाळेचे मूख्याध्यापक झाले आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. शाळेत रुजू होण्यापूर्वी ही शाळा खूप अजीर्ण अवस्थेत होती. विद्यार्थ्यांची संख्या कमी, परिसराची दुरवस्था आणि शैक्षणिक वातावरणात निरुत्साह असा चित्र होता.

      पण सुनिल सरांनी आपल्या अथक परिश्रमाने, ध्येयवेड्या वृत्तीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने या शाळेला नवे रूप दिले. शाळेची इमारत, परिसर, स्वच्छता, शैक्षणिक उपक्रम या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी लक्षणीय बदल घडवून आणले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला, अभ्यासाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम यांनाही चालना दिली. परिणामी शाळेतील विद्यार्थी पटसंख्या लक्षणीयरीत्या वाढली आणि गावकऱ्यांचा शाळेबद्दलचा विश्वास परत आला.

      सुनिल सरांचा हा प्रवास केवळ मेहनतीचा नाही, तर शिक्षणाबद्दलच्या निष्ठेचा आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेचा पुरावा आहे. त्यांच्या कार्यामुळे शाळा खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिर बनली आहे.

      त्यांच्या यशस्वी कार्याबद्दल आम्हा सर्वांना अपार आनंद व अभिमान वाटतो. सुनिल सरांना पुढील आयुष्यातही असेच नवनवीन यश लाभो, त्यांची धडपड अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देत राहो, हीच शुभेच्छा!

      • गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः

        शिक्षण क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी ठसा उमटवला आणि आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला असे माझे आवडते बयकर सर

        इयत्ता चौथी आणि पाचवी मध्ये आम्हाला तुम्ही शिकवलात, खरं तर पहिली ते तिसरी मला काहीच येत न्हवत तुम्ही आल्याने आमची अभ्यासाकडे लागणारी ओढ निर्माण झाली. सुरुवातीला आलात तेव्हा मी चौथी मध्ये होतो आणि त्यात स्कॉलरशिप परीक्षा होती ती परीक्षेचा अभ्यास आमच्याकडून करून घेतलात, तिथूनच खरी आमची सुरूवात झाली . अभ्यासाबरोबर मैदानी खेळांकडे सुद्धा आवड निर्माण केलात.

        तुम्ही माझ्या जीवनात एक महत्वाचा भाग आहात. तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीने मला नेहमीच प्रेरणा मिळाली. तुमच्या आठवणी माझ्या मनात नेहमी ताज्या राहतील . तुम्ही शिकवताना वर्गात नेहमी एक वेगळीच ऊर्जा असायची. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्या.

        सर तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहित केलात आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न केलात. सर तुमच्या शिकवणीचा नेहमी आदर करेन आणि त्या आठवणी माझ्या मनात नेहमी राहतील.

        सर तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले , शिष्यवृत्ती, नवोदय अशा अनेक परीक्षा यश मिळवलं आहे आणि अजूनही खूप यश प्राप्त कराल . स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि अनेक उपक्रम राबवता . सामाजिक कार्यामध्ये सदैव तत्पर असता.

        सर तुमचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला आजही लाभते. मी तुमचा विद्यार्थी आहे हे माझं भाग्य आहे . तुमच्या विषयी जेवढ बोलू तेवढं कमीच आहे .

        तुमच्या पुढील वाटचाली साठी माझ्याकडून खूप खुप शुभेच्छा ♥️🙏

        आपलाच विद्यार्थी
        कू. यश चंद्रकांत करकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments