आणीबाणी : सेन्सॉरशिप
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी मध्यरात्री संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली. त्यामुळे आर एस एस, जनसंघ, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट असे सर्व विरोधी विचारांचे लोक एकत्र झाले. अटकांचे सत्र चालू झाले.
देशात आणि पुण्यात पत्रकारांची अवस्था काय होती याविषयी गेल्या आठवड्यात थोडं लिहिलं. त्यावर प्रतिक्रिया चांगल्या आल्या. नव्या पिढीच्या वाचकांनी ‘अरे, हे तर आम्हाला माहित नव्हतं, नजीकचा इतिहास कळाला ’ अशी प्रतिक्रिया दिली.
‘फार त्रोटक वाटतं’ असाही प्रतिसाद होता. त्यामुळे थोडा खुलासा देणे आवश्यक आहे. पुण्यात वृत्त संस्थेचा बातमीदार म्हणून त्या वेळी मी स्वतः पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींच केवळ लिहायच्या असं बंधन मी घालून घेतलं आहे. माझी मतं, निष्कर्ष आणि पृथकरण वाचकांवर लादायची नाहीत हे पाळत आलो आहे. त्यामुळे माझं निवेदन शुष्क वाटतं याची मला कल्पना आहे. वृत्तसंस्थेच्या बातमीदाराच्या या मर्यादा आहेत.
आता एकविसाव्या भागाची सुरुवात करतो :
माझ्यासारख्या राजकारणात क्रियाशील नसलेल्या पत्रकाराला देखील आणीबाणी मान्य नसली तर अटक करून घ्यायची आणि पुढे होणाऱ्या परिणामाची वाट पाहायची हा एक पर्याय होता.
दुसरा पर्याय म्हणजे पत्रकारिता सोडून द्यायची. शिवकुमार नावाचा माझा मुंबईचा सहकारी होता. त्याच्याशी चर्चा करून आम्ही शक्य तितकी पत्रकारिता चालू ठेवायची; वृत्तसंस्थेच्या माध्यमातून देखील आपण बातम्या देत राहायचे असा निर्णय घेतला. हा निर्णय दुसर्याच दिवशी आलेल्या एका अनुभवा वरून घेतला होता.
टेलिप्रिंटर वरून आम्ही पुण्याहून दिलेल्या बातम्या सेन्सॉरशिपमुळे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार नाहीत हे निश्चित असले तरी यु एन आय च्या समविचारी सहकाऱ्यांनी वस्तुस्थिती सांगणारा तपशील बातमीच्या स्वरूपात टेलिप्रिंटर वरून दिल्ली ऑफिसला नेहेमीच्या पद्धतीनेच पाठविणे चालू ठेवले होते. माझी एक बातमी पुण्यातील वर्तमानपत्रांनी “आज निषेध कशाप्रकारे केला” या संबंधीची होती. सकाळ आणि तरुण भारत अशा वर्तमानपत्रांनी आपला अग्रलेखाचा कॉलम रिकामा सोडला होता.
हाच तपशील माझ्या बातमीचा विषय होता. रात्री उशिरा बीबीसी च्या बातम्या ऐकताना या बातमीचा तपशील यु एन आय चा किंवा माझा उल्लेख न करता बीबीसीने प्रसारित केला होता. त्यात सकाळ अणि तरुण भारत यांचा उल्लेख होता. बी बी सी चा बातमीदार पुण्यात नसतांना देखील ही बातमी त्यांच्या बुलेटीन मध्ये कशी आली ? याचा शोध मी नंतर घेतला. तेव्हा जे कळले त्यावरून आमच्या कामाची रूपरेषा ठरली.
झाले ते असे: दिल्लीच्या आमच्या नऊ, रफी मार्ग या कार्यालयामध्ये त्या परिसरातील अतिशय लोकप्रिय कॅन्टीन स्वस्त आणि चवदार पदार्थामुळे प्रसिद्ध होते. आकाशवाणी, प्रेस क्लब आणि महत्त्वाच्या अनेक केंद्रीय विभागांची कार्यालये जवळपास असल्यामुळे दिल्लीतील महत्त्वाचे पत्रकार नियमित चहा-कॉफी, स्नॅक्स साठी यायचे. त्यात असोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचा इंडिया करस्पाँडंट हा देखील असायचा. आमच्या यु एन आय च्या वृत्तसंपादकांना भेटायला म्हणून संध्याकाळी डोकावणे हे त्याचे नित्याचे होते.
देशातील महत्त्वाच्या शहरातील बातम्या आमच्या यु एन आय ब्युरो कडून टेलिप्रिंटरवरून आलेल्या असायच्या. त्या त्याला सहज मिळायच्या. आपल्या पोर्टेबल टाईपरायटर वरून तो देशातल्या सर्व प्रमुख बातम्यांचा गोषवारा आपल्या लंडन ऑफिसला पाठवायचा. ए पी च्या माध्यमातून त्या बीबीसी आणि अन्य देशांच्या वृत्तसंस्था संस्थांना मिळायच्या.
बी बी सी वरून आलेली बातमी आम्हाला ऐकायला मिळायची. त्यात अनेकदा आमच्या पुणे मुंबई च्या बातम्या देखील असायच्या.
हा मार्ग समजल्यानंतर मी आणि माझे सहकारी अधिक सविस्तर आणि इंटरेस्टिंग बातम्या देऊ लागलो.
सेन्सॉरशिपला चुकवण्याचा हा अगदी सहज सोपा मार्ग आम्हाला सापडला होता.
सेन्सॉरशिप आणि बिचारे पोलीस
सेन्सॉर करण्याची जी व्यवस्था इंदिरा गांधी सरकारने केली होती ती अशीच गमतीशीर होती. आपापल्या वर्तमानपत्राच्या बातमीदारांनी दिवसभरातील बातम्या लिहून वृत्तसंपादकाकडे द्यायच्या. तेथे उपसंपादक मजकुराचे संपादन करीत. मजकूर आणि फोटो पानावर लावून पानाचे प्रूफ तयार व्हायचे. तसे लावलेले पान इन्स्पेक्टर दर्जाचा एक अधिकारी वाचायचा. त्याला न पटलेला मजकूर असला तर प्रुफावर फुली मारायचा. आतापर्यंत चोर, दरोडेखार, खुनी, किंवा बलात्कारी अशा लोकांचीच त्याचा संबंध आलेला असायचा. पत्रकाराने लिहिलेल्या बातमीमुळे इंदिरा गांधी यांच्या सत्तेला धोका आहे का ? हे मिनिटभरात वाचून त्या मजकुराला फुली मारायची की नाही हे त्याला ठरवायचे असे.
असा त्याने चार आठ पानावरचा मजकूर त्याच्या ड्युटीच्या वेळात बारकाईने वाचायचा. शासनाच्या दृष्टीने आक्षेपार्ह नसलेला भाग शोधण्यासाठी बिचाऱ्याला प्रत्येक शब्द, मथळा, व्यंग्य चित्र आणि छायाचित्र वाचावं, पाहायला लागायचं. काही आढळलं की त्यावर फुली मारायची. उरलेल्या भागावर “प्रसिद्धीसाठी मंजूर” अशा अर्थाची सही केले की त्याचे काम संपायचे.
आयुष्यभर गुन्हेगारांना ताळ्यावर आणण्याचे काम करणाऱ्या या बिचाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सेन्सॉरशिपचे काम खूपच जिकिरीचं वाटायचे. धास्ती वाटायची. काही चुकले तर काय होईल याची धाकधूक वाटायची. त्याच्या सर्व सहकाऱ्यांना अजिबात काही कळायचे नाही. त्यामुळे फुल्या मारलेल्या बातम्या आणि मजकूर वगळून पानाची छपाई व्हायची.
वाचकांना आधी काही बोध व्हायचा नाही. पण या अंकात काटछाट झाली हे लक्षात यायचे. वेगळ्या प्रकारची त्यांची करमणूक व्हायची.
शासनाने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, हिंदुस्तान समाचार, आणि समाचार भारती या चारही वृत्तसंस्थाना जबरदस्ती करून ‘समाचार’ या नावाच्या पूर्णपणे सरकारी मालकीच्या एकाच वृत्तसंस्थेत विलीन केले होते. त्यामुळे परदेशातून आणि देशातुन भारतातील वृत्तपत्रात वितरीत होणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवणे आणि सत्ताधारी पक्षाला अडचणीच्या असलेल्या बातम्या दडपून टाकणे हे सोपे झाले. दिल्ली आणि इतर मोठ्या शहरात असणाऱ्या जगातील मोठ्या वृत्तपत्रांचे आणि रेडिओ /टीव्ही, किंवा वृत्तसंस्थांचे बातमीदार यांच्या लेखनावर नियंत्रण ठेवणे.
मात्र इंदिरा गांधी यांच्या यंत्रणेला शक्य झाले नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा टेम्भा मिरविणाऱ्या भारतात इंदिरा गांधी यांची हुकूमशाही आहे, हे जगभर रोज ध्वनित होत गेले. त्यांची व्यक्तिगत प्रतिमा डागाळली जाऊ लागली.
मार्गदर्शक सूचना
माध्यमांनी काय छापावे याच्या मार्गदर्शक सूचना देखील काही महिन्यातच सरकार कडून रोज येऊ लागल्या. शासनाचा वीस कलमी कार्यक्रम सुरु झाला. सरकार आणि मंत्र्याचे भलावण करणाऱ्या बातम्या आणि फोटोच प्रसिद्ध करावे अशा प्रकारे सूचना असायच्या.
इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी युवक काँग्रेस चे अध्यक्ष होते. देशातील सर्व श्रेष्ठ नेता अशी त्यांची प्रतिमा करण्याचा प्रयत्न होता. थोड्याच दिवसात त्यांचा बातम्यांमध्ये उल्लेख ‘युवक काँग्रेस अध्यक्ष‘ असा नको ; तर फक्त ‘युवा’ नेता म्हणून करा, असा फतवा आला.
संजय गांधी यांचा स्वतःची पाच कलमे असलेला स्वतंत्र कार्यक्रम होता. त्यात एक कलम “लोकसंख्या नियंत्रणा साठी नसबंदी“ या संबधीचे होते. या कार्यक्रमात लोकांवर अत्याचार झाले, भ्रष्टाचाराची अनेक रूपे पाहायला मिळत होती. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात संजय गांधी यांची चप्पल उचलत लाचारी दाखवली, अशा बातम्या किंवा तशा अफवा पसरल्या. शासनाने खंडन केल्या तरी सेन्सॉरशिप मुळे त्याही बातम्या प्रसिद्ध होत नव्हत्या. खरं खोटं जगाला कळलं नाही.
इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यात प्रचंड बेबनाव झाला. इतका की एका सार्वजनिक कार्यक्रमातच उपस्थित थोरामोठ्यांच्या समोर आपल्या मातोश्रींच्या श्रीमुखात त्यांनी सहा वेळा भडकावुन दिली अशी एक वदंता त्यावेळी विरोधक सतत सांगत असत. याची शहानिशा करायची तरी कशी ?
वास्तविक आचार्य विनोबा भावे यांचे इंदिरा गांधी यांना समर्थन होते. आणीबाणीला त्यांनी ‘अनुशासन पर्व ‘ असे नाव देऊन कौतुक केले होते. म्हणून विरोधक विनोबाजींना सरकारी संत म्हणत हेटाळणी करीत. ते एकदा किरकोळ आजारी पडले. किरकोळ आजार असला तरी महात्मा गांधी यांच्यानंतरचे ते देशाचे नेते होते. जगभर सर्वत्र बातमी आलीच पाहिजे अशी ती घटना होती. ती देण्याची जबाबदारी पुण्याहून माझी होती. मी टेलिप्रिंटर वरून दिल्ली ला पाठविली. पण तेथे ‘सेन्सॉर’ झाली. त्यांचे लॉजिक काय होते ? कारण काय होते ? ते मला कळले नाही. पण मला न कळल्या ने शासनाचे काही बिघडणार नव्हते !
देशाच्या राजकारणाला आणि इतिहासाला कलाटणी देणाऱ्या या घडामोडीत नंतर पंतप्रधान झालेले तरुण तुर्क चंद्रशेखर, पुण्याचे मोहन धारिया, प्रकाश जावडेकर, आणि भाई वैद्य असे दिग्गज होते.
त्याच प्रमाणे इंदिरा गांधी शी आणीबाणीत आणि नंतर देखील निष्ठा कायम ठेवणारे विठ्ठलराव गाडगीळ आणि उल्हास पवार हे देखील होते. पत्रकार म्हणून या सगळ्यांशी संबंध कायम राहिले. भले बुरे अनुभव येत राहिले.
आणीबाणीच्या या काळ्याकुट्ट इतिहासाचे लेखन आणि त्या नंतर आज पर्यंत घडत असल्या घटना याबाबत च्या ताज्या कथा चालूच राहणार. त्यामुळे इथेच थांबणे इष्ट.
मात्र हा एकविसावा भाग संपविण्यापूर्वी अशा भयावह वातावरणात काही हलके-फुलके प्रसंगही घडले याची सुद्धा नोंद घ्यावी असे वाटते. त्यातील एक :
पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयात कार्यरत असणारे एक प्राध्यापक, आणीबाणीच्या या फेऱ्यात अकारण चांगलेच अडकले. त्यांचा शिकवण्याचा विषय स्पोर्ट्स होता. त्यातही ते मल्लखांब, कुस्ती अशा भारतीय क्रीडा प्रकारात निष्णात होते. आपण भले आणि आपले काम भले अशा वृत्तीचे सरळमार्गी गृहस्थ होते. अचानक त्यांना पुण्याच्या आकाशवाणी केंद्राकडून रेडिओवर भाषणाचे आमंत्रण पोस्टाने आले. विषय होता शासनाच्या वीस कलमी योजनाशी संबंधित.
त्यांनी आयुष्यात कधी दोन ओळींचे देखील भाषण शाळेसाठी सुद्धा लिहिलेले नव्हते. कॉलेजच्या मैदानावर देखील त्यांनी देशाला उद्देशून वीस कलमी कार्यक्रमाची उपयुक्तता यासारख्या विषयावर भाषण केलेले नव्हते. ते प्राचार्यांना भेटले.
या संकटातून कशी सुटका करायची याचा सल्ला मागितला. आणीबाणीच्या काळात शासनाच्या अशा आमंत्रणाचा अर्थ ‘आदेश’ असा असतो. दुर्लक्ष केले तर तुम्हाला अटक होऊ शकेल असे प्राचार्यांनी सांगितले. संस्थेच्या अध्यक्षांकडे मग ते मार्गदर्शनासाठी गेले. त्यांनी आणखी भीती घातली.
“या प्रकरणी तुम्ही नकार दिला तर तुम्हाला अटक होऊ शकते. तुम्हाला मुलं बाळ आहेत. उगीच सगळ्या कुटुंबाला अडचणीत टाकू नका. मुकाट्याने आकाशवाणीवर जाऊन भाषणाचे रेकॉर्डिंग करून या. त्यांनी मानधन दिले तर घ्या आणि मुकाट्याने घरी परत या.” असा सल्ला दिला.
मग मराठीच्या प्राध्यापक सहकारीबाईंच्या हातापाया पडून ‘मदत करा’ म्हणून त्यांनी गळ घातली. दोघांनी खपून दहा मिनिटांचे भाषण लिहिले. प्रॅक्टीस केली. काही विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना म्हणून दाखविलं. रेकॉर्डिंगसाठी ते नेमून दिलेल्या वेळेत आकाशवाणीच्या स्टुडिओत पोहोचले.
अंगावर दरदरून घाम आला होता. स्टुडिओमध्ये प्रोडूसरशी बोलताना देखील त्यांचा घसा सुकला होता. जीभ कोरडी पडली होती. प्रोड्युसरने काय हो काय झालं ? म्हणून विचारलं. तेव्हा सरांचा कंठ फुटला. त्यांनी आपल्या वर आलेल्या संकटाची कहाणी सांगितली. मग मुळात त्यांना रेकॉर्डिंगच्या आमंत्रणाचे पत्र गेलेच कसे ? याचा शोध सुरू झाला. पत्रावर नाव बरोबर होते पण पत्ताच लिहिलेला होता. त्याच नावाचे एक ज्येष्ठ पत्रकार केसरीत काम करत होते. पोस्टमन ला या नावाच्या प्राध्यापकाचा पत्ता माहीत असावा. त्याने ते महाविद्यालयाला पोहोचविण्याचे काम चोख केले होते. त्यातून या सरांवर ही आपत्ती ओढवली होती. प्रोड्युसरने त्यांची सुटका केली तेव्हा क्षणभर देखील न थांबता ते घराकडे धावत निघाले !.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
ठाकूर सर, आपला लेख वाचला आणि आवडला सुद्धा. एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करायला हवा म्हणून हा लेखन प्रपंच. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर झाली आणि २६ जून रोजी प्रकाशित झालेल्या सकाळ आणि तरुण भारतचे अग्रलेख कोरे ठेवण्यात आले होते असे म्हटले आहे, पण केसरी, प्रभात सह सर्व वृत्तपत्रांचे अग्रलेख कोरे होते. तरुण भारतचा अग्रलेख कोरा नव्हता, पण तो वाचता न येण्याजोगा म्हणजेच अधली मधली वाक्येच्या वाक्ये राऊट म्हणजे खरवडून काढलेली होती. हे काम शिशाची प्लेट मशीनवर चढण्यापूर्वी केले गेले होते. सांगायचा मुद्दा हा की त्यावेळी अग्रलेख कोरे ठेवण्याची ही कल्पना कोणत्याही संपादकाने दुसऱ्याशी चर्चा न करता अमलात आणलेली. दुसरी आठवण Motherland चे संपादक के. आर. मलकानी यांना अटक करण्यात आल्याची बातमी २६ जूनच्या पहाटे २.३० च्या सुमारास आली, तेव्हा काहीतरी गडबड आहे असे वाटून ती बातमी छपाई मशीन थांबवून मी प्रसिद्ध केल्याचे आठवते. तो सगळा काळ हा संघर्षाचा होता, पण कोणाही पत्रकाराने राजीनामा देऊन या संघर्षात उडी घेतल्याचे आठवत नाही. एखादा अपवाद असू शकतो.
अरविंद व्यं. गोखले
आणीबाणीतील घडामोडींचे वर्णन वाचून चित्र उभे राहिले !!
लेखक प्रा.किरण ठाकूर यांना धन्यवाद.