सकाळी जाग आल्यावर सर्वसामान्यपणे जे सर्व प्रवासी करतात ते ते सर्व आम्ही केले. ताजेतवाने झाल्यावर पुन्हा एकदा गप्पांचा फड रंगला…
कविता, शेरोशायरी यांचे ऐकवणे / ऐकणे झाले. हे करता करता चहा नाश्ताही झाला आणि त्याच बरोबर बसल्या बसल्या एक छानशी डुलकी ही झाली.
तोवर राजकोट स्टेशन आले. आम्ही अग्निरथातून पायउतार झालो. ट्रॅव्हल कंपनीच्या बसेस बाहेर उभ्याच होत्या. ग्रुप लीडरने पाच जणांची सीट पकडली आणि आम्ही स्थानापन्न झालो.
नंतर कळाले ग्रुप ८३ भक्तजनांचा आहे. धन्य धन्य ते आयोजक ! प्रवासात एकमेकांशी संवाद, चहा, नाष्टा, ईत्यादी व आदी अनेक बुद्धीस चालना देणाऱ्या वस्तूंची देवाण-घेवाण झाली.
माझी बॅग एका तरुण मुलाने वर कॅरीअरवर ठेवली. पांढऱ्या केसांचा आधार घेऊन मी त्याला दम दिला, “काढूनही तूच द्यायचीस…” आणि त्या सुसंस्कृत मुलाने काढूनही दिली ! धन्य त्याचे माता पिता…
पुन्हा एकदा गप्पाटप्पा करतकरत जुनागढला पोहोचलो. महत्वाची गोष्ट आयोजकांच्या कौशल्याची, की त्यांनी ८३ लोकांचे व्यवस्थित गट केलेले होते. गटप्रमुख होते. गटामध्ये असलेल्या सर्व यात्रेकरूंची त्यांनी काळजी घेणे, हवे-नको ते बघणे ही गटप्रमुखाची जबाबदारी होती आणि ती प्रत्येक गट प्रमुखाने चोख पार पाडली ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. अभिनंदनीय नियोजन !
दुपारी जेवण, आराम, सर्वांशी ओळखी वगैरे झाल्या. मला आश्चर्य वाटले की बहुतेक येणारा माणूस
“काय काका” प्रवास उत्तम झाला ना ? काही त्रास नाही ना झाला ? असे विचारत होता, मी भांबावलो.
प्रत्येक जण मला कसा ओळखतो ? ह्या सगळ्यांनी मला टीव्ही वर पाहिलं तर नसेल ना ? हा मला प्रश्न पडला. मी नरेशला विचारले तर तो म्हणाला अर्थातच त्याच्या नेहमीच्या मिश्किल स्टाईल मध्ये, “अहो तुमचा फोटो मी ग्रुप वर टाकला, खाली लिहिले हे “गंधेकाका” आपल्याबरोबर आहेत !” मी पण सुखावलो…
संध्याकाळी तलेटी मध्ये फेरफटका मारला. भोजन केले आणि रात्री झोपताना उद्या परिक्रमा करू यात असे सर्वानुमते ठरले. मी म्हणालो ठिक आहे ! अर्थात तेव्हा परिक्रमा ही जंगलातून, दगडधोंड्यांतून, डोंगरातून, ओढ्यांतून असेल याची साधी कल्पना सुद्धा कोणी मला दिली नाही !
सरळ सरळ पायवाट असेल तर पायवाटेने चालताना काही त्रास होणार नाही, असे वाटले म्हणून मी पण हो म्हणालो.
अर्थात मी नाही म्हणालो असतो तर त्या सगळ्यांनी उचलूनच नेले असते, हा भाग निराळा !!!
तेव्हा उद्या लवकर उठून, सर्व आवरून, लवकरात लवकर म्हणजे पहाटे साडेतीन वाजता निघायचे ठरले.
चार वाजता परिक्रमेचे मुख्य द्वार उघडणार आहेत आणि ३००/ ४०० माणसेच आत सोडणार होते, असे कळले.
आपला नंबर लागलाच पाहिजे असे ठरवून, स्वामींची प्रार्थना करून, निद्रिस्त झालो…😴
इति भाग दुसरा !
भाग तिसरा अ आणि ब लवकरच !

– लेखन : गंधेकाका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800