मागे फिरुनी
असं म्हणतात, आयुष्यात घर एकदाच बनतं. पण मित्रहो ! आजच्या राहणीमान नूसार व पुढील पिढीत होत जाणारे विचार बदल, यांमुळे आजकाल माणूस एक घर सोडून, दुसऱ्या घराचा विचार करताना दिसत आहे. शिवाय बँकांकडून मिळणारे घरकर्ज माणसाला लोभात पाडू लागले आहे.
मोबाईल चाळताना, एकदा माझ्या वाचनात आलेला लेख, तुम्हाला सांगते…
लेखक असे म्हणतो की, माणसाला घराची गरज असते. माणसाला थकूनभागून विश्रांतीसाठी स्वतः चे घरकुल असावे, असे आपसूकच वाटते. सारे कुटुंब एकत्र राहावे, सर्वांना त्यात सुख व समाधान लाभावे. अशी घराची एक व्याख्या असते. आनंदमय वास्तू म्हणजे घर !
जर, माणुसकीच्या भावनेने घर बांधलेले असेल तर, वेगळ्या घराची गरज का भासावी ! आणि तेही डोक्यावर आयुष्य भराचे घरकर्ज घेऊन ! अश्या घरात आनंद शोधावा लागेल ! ह्यात सुख व समाधानाची छटा सापडेल का ?
लेखकाच्या विचारात तथ्य तर आहे ! पण, काळाप्रमाणे माणसाला स्वतः ला बदलणे, भाग पाडले आहे.
असो ! नवीमुंबईत आम्ही सन २०१४, एप्रिल मधे स्थायिक झालो होतो. त्या आधीच कार्यालयात, पुढे बदलणारा माझा स्थायिक पत्ता अर्जित केला होता. कारण लवकरच माझ्या बदलीचा आदेश येणार होता.
जुईनगर ते वरळी, असा प्रवास माझा सुरू झाला होता. खूप वर्षानी रेल्वेचा लांबचा व वेडावाकडा प्रवास मी अनुभवू लागले होते.
नेहमीच्या वेळेवर ठरलेली ट्रेन पकडणे, तेथून कुर्ला स्टेशनला उतरून, गर्दीच्या चेंगराचेंगरीतून वाट काढत, तो पूल चढून मध्य रेल्वेच्या प्लँटफॉर्मवर येऊन, पुन्हा ट्रेन पकडणे. नंतर परेल स्टेशनला उतरून, पुन्हा तो अफाट गर्दीचा पूल चढून स्टेशन बाहेर येऊन, “एकदाची सुटले बाबा” असा मनाशी विचार करत, हुश्श ! उसासा सोडणे ! पुढे टँक्सीसाठी तर कधी बससाठी रांगेत उभे राहून प्रतिक्षा करणे. मग कधी ट्राफिकच्या गचक्यांनी पुढे-मागे तोल सावरत, ऑफिसला पोहचणे ! फार मोठे दिव्य वाटत असे ! हळूहळू ह्याही प्रवासाची सवय अंगवळणी पडू लागली होती.
अश्या त्या धावपळीच्या जीवनात आमच्या चिमुरड्या जीवावर, एक प्रसंग बेतला होता. माझी नात दुर्वा जेमतेम दोन-अडिज वर्षाची असेल. गूद्दद्वरातील चुकीचा मार्ग, तिला त्या काळात तीव्रतेने त्रास करू लागला होता. शौचास होताना, तिचे ते विव्हळणे आजही कानात गुंजते.

वाडिया इस्पितळात बाल वॉर्डमध्ये तिला दाखल केले होते. ८ जूनला तिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तो दिवस आजही तसाच आठवतो. माझ्या पतीनी तिला रक्त दिले होते. म्हणूनच की काय ! आजोबा आणि नात यांचे नाते काही वेगळेच भासते.
त्या वॉर्ड मधे अगदी, नाशिक, सातारा, अहमदाबाद, पुणे अमरावती असे कितीतरी लांबून आलेले, बालरुग्ण उपचार घेत होते. बऱ्याच मुलांना असेच शौचाचे आजार होते. बाजूच्याच बेडवर एक पाच सहा वर्षाचे बाळ होते. त्याचे तर पूर्ण आतडे बाहेर काढून पोटावर ठेवले होते. आतड्याच्या तोंडाशी डायपर लावले जात असे. दर एक-दोन तासांनी ते डायपर, बाळाची आई बदलत असे. ते बाळ ना उठू शकत होते ! ना बसू शकत होते ! अगदी मऊ व पातळ असे जेवण त्याला झोपूनच भरवले जात असे. ते केविलवाणे दृश्य पाहून काळीज हेलावून जात असे. तेव्हा मनाशी, सहज एक विचार खूप काही समजावून गेला होता. “आम्हाला मिळालेले दुःख, इतर बाळांच्या दुःखापेक्षा, कितीतरी पटीने कमी होते.”
परिस्थिती फार तडजोडीची होती. मला व तिच्या आईला ऑफिसला सतत रजा घेणे शक्यच नव्हते. दुर्वाला घरी आणल्यानंतर माझ्या पतीनी, आम्ही घरात नसताना तिची खूप काळजी घेतली होती. तसेच या गरजेच्या वेळी, माझी नणंद कल्पना, कल्याणहून सकाळी साडेअकरा वाजता आमच्या घरी येत असे व संध्याकाळी मी मानखुर्दला पोहचताच, तिला फोन करून, जायला सांगत असे. अशावेळी तिने आपलेपणाने केलेले सहकार्य, फार मोठे होते.
दीड वर्षातच वरळीहून बीकेसीसाठी माझी ट्रान्सफर ऑर्डर आली होती. त्या दिवशी एका डोळ्यात आनंद होता ! तर, दुसर्या डोळ्यात दुःख होते !
जवळ जवळ पंधरा वर्षे, एकाच जागी, एका कुटुंबात राहून, आम्ही सर्व मैत्रिणींनी, आमचे कलीग व अधिकारी, सर्वांनी एकोप्याने नोकरी केली होती. आता हे कुटुंब सोडावे लागणार ! याचे दुःख वाटत होते. तर, आता माझा प्रवास कमी होणार ! हया गोष्टीचा आनंद वाटत होता.
०९ सप्टेंबर २०१५ ला आम्ही बऱ्याच मैत्रिणी तिथून बाहेर पडलो होतो. निघताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. माहीत नाही ! ते आनंदाश्रु होते की, दुःखाचे अश्रू होते ! जणू, साऱ्या मुली माहेर सोडून, सासरी निघाल्या आहेत ! असे दृष्य त्या दिवशी ऑफिसात उमटले होते.
आता माझा प्रवास जुईनगर ते कुर्ला, अगदी सोपा व सरळ सुरू झाला होता. कुर्ला स्टेशनला बाहेर पडून जाताना रिक्षा पकडणे किंवा कधीतरी बस पकडून बीकेसीच्या हायवेवर, उभी असलेली आमची एमटीएनएल च्या भव्यदिव्य इमारतीत पोहोचणे. खूप शानदार वाटायचे ! आजुबाजूचा अवाढव्य रस्ता, समोर भव्य पटांगण, तसेच आमच्या ऑफिस इमारतीच्या पुढेच लागून, अनेक मोठमोठी इतर ऑफिसेस ! एक वेगळीच शान वाटायची. इमारतीच्या उंच बेडरूम मधून रस्त्यावर दिसणारी, अगदी छोटी छोटी वाहने, फार विलोभनीय दिसत असत.
पुन्हा मी प्रभादेवीच्या ऑफिस प्रमाणे, बीकेसीच्या महासागरात आले होते. कॉल सेंटरचे खूप मोठे दालन होते. अगदी पन्नास-साठ जणी, एकाच वेळी बोर्डवर बसून काम करत असू. सगळीकडे पुन्हा चिवचिवाट कानी पडू लागला होता. पुन्हा नाईट शिफ्ट, बदलणाऱ्या ड्युटीच्या वेळा, भारी वाटू लागले होते. नोकरीवर लागताना भेटलेल्या मैत्रिणी, मधल्या पंधरा-वीस वर्षात दुरावल्या होत्या. त्या पुन्हा ह्या बीकेसीच्या महासागरात गवसल्या होत्या. भेटून सर्व जणी खूप आनंदून गेल्या होत्या. थोड्या वयाने मोठ्या झाल्या होत्या. तसेच थोड्या फार शरीरयष्टीने वाढल्या होत्या. तर कुणी होत्या तश्याच वाटत होत्या. काहींच्या केसात पांढरी छटा डोकावू लागली होती. साध्या राहणीमानाला प्राधान्य देणाऱ्या, आता काहीश्या मॉड दिसू लागल्या होत्या. खूप बोलक्या वाटू लागल्या होत्या. थोडक्यात काय ! माणूस अनुभवातून खूप काही शिकतो व बनतो. सारी माझ्या एमटीएनएल ची कृपा !
प्रत्येक जणी एकमेकींना बिलगत, प्रेमाने विचारपूस करू लागल्या होत्या.
‘तू आता कुठे राहते ?
‘तुला मुलं किती ?
‘तुझे पती काय करतात ?
‘मुलं काय करतात ?
‘तू कशी आहेस ?
‘आता तू पहिल्यापेक्षा खूप छान दिसतेस !
‘तू अगदी होती तशीच आहेस ! एक ना दोन ! गप्पा तर खूपच ओसंडून वाहत होत्या.
बीकेसी ला येऊन, मी नाईट डबल शिफ्ट ड्यूटी करण्यास प्राधान्य दिले होते. कारण, रोजच्या प्रवासातून एक दिवसाची सुटका व एक दिवस घरी राहण्याचा आनंद ! कामाचे स्वरूप आता बदलले होते. पण नवीन कामाचा सराव, पुन्हा शिकण्यास आनंद मिळवून देत होता. हया काळात एमटीएनएल च्या मोबाईलचे जाळे खूप पसरलेले होते. पण दृष्ट लागावी ! त्याप्रमाणे आमच्या कंपनीच्या नेटवर्क समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या होत्या. त्यामुळे आमच्या कंपनीचा ग्राहक हातून निसटू लागल्याचे ठसे, उमटू लागले होते.
माणसांच्या गर्दीत, व्यथित केलेली पंचवीस वर्षे, वारंवार जुन्या आठवणींनी मन विचलित करत होते. घराच्या समोरच मोठे पटांगण व समोर रस्ता, तिथे खेळणारी मुले व क्रिकेटचे सामने, हे सारे पाहण्यात माझे पती गढून जात असत.आता मात्र, त्यांचा क्रिकेट छंद, त्यांना पुन्हा खुणावू लागला होता.
खेळाडू वृत्तीने, जुईनगर 40+ क्रिकेट संघात प्रवेश केला होता. सकाळ-संध्याकाळ क्रिकेटचा सराव जोमाने सुरू झाला होता. संघाचे कप्तान श्री. चिंतामणी, स्पष्टवक्ती व काटेकोर नियम पालन करणारी व्यक्ती ! शेवटी हा संघ जुईनगर गाववाल्यांचा होता. काही दिवसात माझ्या पतीनी त्यांची कोळी बोली भाषा तोंडी बसवली होती. तसेच उत्तम क्रिकेट शैलीची खेळी व आदरणीय स्वभाव, यामुळे ह्यांची प्रतिमा, संघात लवकरच उभी राहीली होती.
पुन्हा मिळालेली संधी, अपूर्ण इच्छेचा विरंगुळा ! अशी सांगड घालत, स्वतःच्या खेळाची शैली मैदानात दाखविण्यास योग जुळून आला होता.
आम्ही मनाने, नवीन जागी बरेचसे स्थिरावलो होतो. आयुष्याची बरीच धावपळ संथ झाली होती. कौटुंबिक आयुष्य थोडेफार हलत होतेच. पण दुर्वाच्या सहवासाने तेवढाच मनाला विसावा लाभत असे.
१८ डिसेंबर २०१६, माझ्या पतीचा अर्धशतकी प्रकट दिन येणार होता. त्यांच्या अर्धशतकी आयुष्याचे पुन्हा आम्हास दर्शन व्हावे, असे ठरवून मी व माझ्या मुलींनी, त्यांचा वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचे ठरविले होते. त्यांचे जिवलग मित्र प्रदीप मणचेकर व बबन सारंग, ह्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती.
झाले ! ह्यांना काहीच कळू न देण्याचे ठरवून, सारे तयारीला लागलो होतो. एक छोटासा हॉल बुक झाला होता. तसेच आमचे फोटोग्राफर श्री. दिनकर, यांना सांगून प्रोजेक्टर तयार केला होता. मुलींनी ह्यांच्या लहानपणापासूनचे प्रसंगी फोटो जमा करून, त्याची एक फिल्म तयार केली होती. त्यांचा मित्र बबन सारंग, यांना नको म्हणत असतानाही, पार्टीचे डिनर स्वतः त्यांनी देण्याचे ठरवून टाकले होते. मित्रांने मित्राला दिलेली खास भेट होती ! असेच म्हणावे लागेल.
आयोजित समारंभाला, आमच्या दोघांचा मित्रपरिवार व जवळचे नातलग, वडाळा परिवार असे आमंत्रित केले होते. जेव्हा ह्यांना हॉलवर आणले तेव्हा, तिथे केलेले सारे सादरीकरण व प्रशांत कोळंबकर, यांनी घेतलेली आमची मुलाखत, आम्हाला अगदी आमच्या आयुष्यातील पन्नास वर्षांपूर्वीच्या जीवनात घेवून गेली होती. जीवनातल्या आठवणींना पुन्हा पालवी फुटल्याने, मनाला हिरवीगार छटा स्पर्शून गेली होती नि नकळत मागे राहिलेला भूतकाळ काव्यात तरंगला !
चल जाऊ मागे फिरुनी,
आठवू आपली प्रेम कहाणी ॥
चाहुलीत होती धडधड हृदयी,
भेटत राहावे वाटे ठायी ॥
लपा छपी खेळ प्रेमाचा,
तासन तास विरह भेटीचा ॥
भटकंती छंद केला सहवासाचा,
निरव शांतता श्वास मनाचा ॥
विश्व होते फक्त दोघांचे,
गप्पात विसरूनि भान जगाचे ॥
स्वप्ने पाहिली डोळ्यात डुंबूनी,
झेप होती नभास भेदूनी ॥
पट हा मागे सारूनी,
चल जाऊ मागे फिरुनी ॥
सात फेऱ्यात साथ जन्माची,
गाठ बांधली जीवन प्रवासाची ॥
जुगारुनी सारे नवजीवन थाटले,
ठोकर झेलूनी आयुष्य जिंकले ॥
बुडालो तळाशी पाय रोवूनी,
उभे राहीलो नम्र होवूनी ॥
सोनेरी प्रकाश पसरे दारी,
सुखे बरसली वर्षा सरी ॥
क्षणभर थांबू वेड्या मनी,
चल जाऊ मागे फिरुनी ॥
– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.
फारच छान वर्षा.जे ऊपभोगले ते यथासांग वर्णन केले आहे.
भाबल मॅडम ने आपल्या जीवन प्रवासातील रम्य आठवणी फार सुंदर रित्या सांगितल्या त्या बद्दल त्यांना खुप धन्यवाद 🙏 असेच लिहीत चला. सर्व भाग लिहून झाल्यावर सर्व भाग एकत्र करून पुस्तक रुपी प्रकाशित करा. ऑल दि बेस्ट 🌹