नमस्कार मंडळी.
आपण मागच्या लेखात काही गुन्ह्याच्या पध्दती पाहिल्या. ते होते सर्व साधारण गुन्हे. आणखी गंभीर गुन्हे म्हणजे खून, दरोडा, बलात्कार, खंडणी, अपहरण आदि गुन्हे. यामध्ये बलात्कार सारखे गुन्हे साधारण पणे अवतीभवतीच्या, जवळच्या इसमाकडून होण्याच्या जास्त केसेस होतात. त्याचप्रमाणे निर्मनुष्य ठिकाणी देखिल असे गुन्हे घडतात. ही एक विकृती आहे. कारण आपण पाहतो कि 90 वर्षाची वृध्दा ते 3, 4 वर्ष वयाची बालिका यांचे वर देखील बलात्कार होतात. असे गुन्हे तातडीने सुनावणीस घेण्याचा न्यायालयांचा प्रयत्न असतो. पण अशा गुह्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत. त्या दृष्टीने पोलिस खात्या मार्फत ‘Good touch Bad touch’ आदि मोहिम सुरू असतात त्या वाढविल्या पाहिजेत.
त्याचप्रमाणे समाजाचा बळीत महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. असे प्रकार झाले तर बळीत महिलेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. असे गुन्हे नोंद केले पाहिजेत व अशा आरोपींविरुध्द दोषसिध्दी होवुन लवकरात लवकर सजा दिली गेली पाहिजे.
पालकांनी देखील मुलांवर नजर ठेवून जसे वेळी अवेळी पार्ट्यांना पाठविता कामा नये, त्याचप्रमाणे स्त्रि ही उपभोग्य वस्तू नाही, त्यांना सन्माननीय वागणूक देण्याबद्दलचे संस्कार मुलांवर केले पाहिजेत. महिलांनी सुध्दा अशी शंका येताच तातडीने सुरक्षित ठिकाणी धाव घेवुन मोठ्याने ओरडून व सर्व शक्ती एकवटून धैर्यानं परिस्थिती चा सामना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अत्याचारी व्यक्तीच्या गुप्तांगावर जोरदार लाथ मारण्याचा प्रयत्नही केला पाहिजे.
ज्या घरात जेष्ठ नागरिक रहातात व त्यांची मुले दूर रहातात त्या मुलांनी जेथे जेष्ठ नागरिक रहातात तेथे घरात सी सी टी व्ही लावावेत. नोकर ठेवले असल्यास त्यांचे वर अचानक चेक करून, त्याच प्रमाणे त्याचे हाताचे ठसे, फोटो व मागील लेखात सांगितल्या प्रमाणे दक्षता घ्यावी.
गस्ती वरील कर्मचारी यांनी देखिल बीट मधील जेष्ठ नागरिकांची माहिती ठेवून नियमित पण वेळ काढून त्यांचा हालहवाल विचारावा. आपले व पोलीस स्टेशनचे फोन नंबर देवुन ठेवावेत. आपण देखील त्यांचे फोन नंबर घेवुन अधून मधून विचारपूस करावी.
जेंव्हा गंभीर गुन्हे वा इतर वेळी देखिल सुजाण नागरिकांनी पंच व साक्षिदार बनण्यासाठी पुढे आले पाहिजे व पोलिसांनी देखिल त्यांना प्रोत्साहीत केले पाहिजे. असो.
मी बांद्रा पोलिस स्टेशनला असताना आमचे दुसरे एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक वरकड सर हे अत्यंत कडक शिस्तीचे व व लेखी (मेमो आदि स्वरूपात) काम करण्यात माहिर. गुन्हे घडल्यास ते अधिकाऱ्यांना धारेवर धरत. त्यांची देखील कामाची पद्धत वेगळी व कठोर असली तरी त्यांची कामाप्रतीची निष्ठा वादातीत होती. त्यांच्यामुळे लेखणी द्वारा काटेकोर रहाण्याची मला सवय झाली.
एकदा पोलिस ठाणे चे फरारी आरोपी संख्या वाढली असता वरकड सरांनी मला केबीन मध्ये बोलावले व सांगितले तुला मदतनीस, 4 अमलदार देतो. फरारी आरोपी पकडून आणायचे. आपणास आश्चर्य वाटेल पण एक महिन्यांत स्टाफ चे मदतीने मी जवळ जवळ 30 फरारी गुन्हेंगार पकडले.
असाच एक दुसरा अनुभव थोडा काळजाचा ठोका चुकविणारा. त्याचे असे झाले. खबर मिळाली होती कि मुंब्रा येथे एका घरात खतरनाक आरोपी लपले आहेत. पोलीस निरीक्षक भालेकर, सहकारी अधिकारी रवि रातजणकर, इतर अधिकारी व कर्मचारी असे शस्त्रासह आम्ही मध्यरात्री मुंब्रा येथे इच्छित स्थळी पोहचलो. भालेकर सरांनी पूर्ण घराला वेढा दिला. मला व रातणजकर साहेब यांना घराची मागील बाजू होती. पुढील बाजूने स्टाफने दरवाज्यावर थाप दिली असता आतील आरोपीं, ते घर कौलारू असल्याने छपरावर चढले. मी तात्काळ पोजीशन घेतली. बांबूचा सहारा घेवुन छपरावर चढले. एक आरोपी छपरावर आला होता. त्याने शस्त्र काढण्याआधिच मी माझे रिवाॅल्वर त्याच्यावर रोखले व हॅन्डस्अप असे ओरडून अगदी फिल्मी स्टाईलने त्याच्या कानपटीला लावले.
सावधपणे त्याला खाली घेवुन छपरावरून उतरले. इतरांनी आणखी आरोपी पकडले. पण आमचे दुर्दैव कि आम्हाला हवे असलेले ते आरोपी नव्हते. तर स्थानिक पोलिस ठाणे चे खुनातील आरोपी होते. त्यांना चौकशी अंती स्थानिक पोलिसांचे हवाली करून आम्ही परत आलो.
धन्यवाद.
क्रमशः

– लेखन : सुनीता नाशिककर.
निवृत पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
