Tuesday, September 16, 2025
Homeलेखकॅन्सर : फुलस्टॉप नव्हे तर "कॉमा" !

कॅन्सर : फुलस्टॉप नव्हे तर “कॉमा” !

४ फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिन आहे. या दिनानिमित्त कॅन्सरवर यशस्वी मात करणाऱ्या,
एमटीएनएलमधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या सहसंपादक अलका भुजबळ यांनी लिहिलेल्या “कॉमा” या पुस्तकाचा परिचय करून घेणे अतिशय उपयुक्त ठरेल……

कॅन्सर या आजाराची तीव्रता किती भयंकर आहे, हे आजही जाणवते. त्यामुळे कॅन्सरची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. ती भीती मनातून कितीही घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही. कोणताही आजार चांगला नसतोच. त्यात कॅन्सर म्हटला की अनेकांच्या जीवाचा थरकाप उडतो. एक भयंकर आजार असं डोळ्यासमोर चित्र उभे राहते.

कॅन्सर झाला की काही खरे नाही, असेही वाटत असते. हा शब्द ऐकताच रुग्ण व त्याचे नातेवाईक घाबरून जातात. अशावेळी त्यांना मार्गदर्शन, समुपदेशन मिळणे गरजेचे असते. या दृष्टीने अलका भुजबळ यांनी लिहिलेले व डिंपल पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले “कॉमा” पुस्तक वाचणं खूपच धीर, दिलासा देणारे आहे.

अलका भुजबळ यांना ४ वर्षांपूर्वी गर्भाशयाचा कॅन्सर जडला होता. त्याचे डॉक्टरांकडून वेळीच योग्य निदान झाल्यामुळे आणि वेळीच उपचार घेतल्यामुळे अलका भुजबळ त्यावर मात करू शकल्या. या आजाराची भिती न बाळगता वेळीच उपचार केल्यास तो आटोक्यात येऊ शकतो, असा अलका भुजबळ यांचा अनुभव आहे.

हा आजार झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी आणि या आजारात त्यांना आलेले अनुभव त्यांनी पुस्तक रुपाने लिहून काढले आहेत. ‘काॅमा‘ नावाचे हे पुस्तक लोकांपर्यंत जावे या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा लेखन प्रपंच केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महामहिन राज्यपाल, भगतसिंग कोश्यारी यांना कॉमा पुस्तक भेट देताना.

आजारपणात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास, औषधांचा खुप चांगला परिणाम होण्यास कशी मदत होते, हा त्यांचा अनुभव सर्वांपर्यंत पोहोचविणे हा हेतू पुस्तक लिहण्यामागे आहे, असेही मत अलका भुजबळ यांनी व्यक्त केले.

जीवनात अनेक चढ- उतार येत असतात. अनेक प्रसंगाना तोंड देत आपण पुढे जात असतो. म्हणजे प्रत्येक वेळी फुलस्टॉप न घेता त्या प्रसंगाला कॉमा करत पुढील वाटचाल चालु असते. म्हणून या पुस्तकाला आपण हे नाव दिल्याचे अलका भुजबळ सांगतात.

डॉ रेखा डावर, कॅन्सरचे उपचार चालू असताना महिला दिनी अनपेक्षित भेटायला आल्या, तो अविस्मरणीय क्षण.

कॅन्सरसारख्या गंभीर आजारात आपणास पतीची, मुलीची, भाऊ, भावजय, पुतणी, तसेच मित्र- मैत्रिणींची कशी मदत झाली आणि त्यांनी प्रत्येक वेळी कसे मनोधैर्य वाढवले याचे अनुभव अलका भुजबळ यांनी या पुस्तकांत मांडले आहेत.

रुग्णालयातील हिरवे पडदे, मशीनचा टिकटिक आवाज, हाताला लावलेले सलाईन, इंजेक्शन, आॅपरेशन थिएटर, आयसीयु, केमोथेरपी हे सगळं नुसते ऐकून होते, वाचले होते, मात्र या आजारात प्रत्यक्ष हे अनुभवलं. डाॅक्टर, नर्सेस आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्या भूमिका किती महत्वपूर्ण असतात, याचीही जाणीव झाल्याचे या पुस्तकात म्हटले आहे.

हे पुस्तक छोटे जरी असले तरी अलका भुजबळ यांनी जे बारकावे टिपले आणि त्याचे वर्णन आपल्या शैलीत केले त्यावरुन पुस्तक पुढे पुढे वाचावेसे वाटते. कॅन्सर असो किंवा नसो एकदा हे पुस्तक वाचलेच पाहिजे, म्हणजे संभाव्य काळजी प्रत्येकाला घेता येईल.

कॅन्सर बरा होण्यासाठी अमेरिकेत वा अन्य देशांत जायची आवश्यकता नाही. भारतातही त्यातल्या त्यात मुंबईसारख्या जगप्रसिद्ध शहरात उपचार होऊ शकतात, हेही त्यांनी दाखवून दिले आहे. ज्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे ते परदेशात जाऊन उपचार घेऊ शकतात. परंतु जे सर्व साधारण नोकरी, व्यवसाय करतात त्यांनी आरोग्य विमा काढलाच पाहिजे. अशा विम्याचा कवच म्हणून मोठ्या आजाराच्यावेळी कसा उपयोग होतो, हेही त्यांनी सांगितले आहे.

कॅन्सरला घाबरण्याचे कारण नाही. मात्र नियमित व्यायाम आणि चांगला आहार असेल तर तुम्ही लवकरच ठणठणीत होऊ शकता हेही अलका भुजबळ यांनी त्यांच्या अनुभवावरून पुस्तकात सांगितले आहे.

“काॅमा” या पुस्तकाला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.

अतिशय वाचनीय असे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असलंच पाहिजे असे आहे.

रश्मी हेडे.

– लेखन : रश्मी हेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. अलकाताई ,सामाजिक बांधीलकीतून, तुम्ही तुमच्या कर्करोगाशी केलेल्या झुंजीचे अनुभव पुस्तकरुपाने लोकांसमोर, मनोबल वाढवण्यासाठी मांडले हे खूपच स्तुत्य आहे…
    या पुस्तकाचे नक्कीच स्वागत होणार.
    तुम्हाला भरभरुन शुभेच्छा!!

  2. अलका, तुझ्या धाडसास सलाम ! रश्मी ह्यांनी दिलेला तुझ्या “कॉमा” पुस्तकाचा परिचय, साऱ्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवून नक्की वाचावे.
    मला वाटते, कॉमा म्हणजे स्वल्पविराम असला तरी तो कँसर सारख्या आजाराशी, धैर्याने सामोरे जाण्याची एक ताकद आहे.

    सौ. वर्षा महेंद्र भाबल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments