नमस्कार, वाचक हो,
केरळ राज्याचे मानचिन्ह असलेला प्राणी म्हणजे हत्ती. केरळचे प्रतीक, केरळचे वैभव.
आज याविषयी आपण थोडीफार माहिती घेणार आहोत…
आपल्या हिंदू संस्कृतीत हत्तींना मानाचे स्थान आहे. पुराणात बऱ्याच कथांमधून गजराजाचा उल्लेख आढळतो.
केरळमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात, उत्सवात हत्तींना मानाचे स्थान आहे. इथल्या विविध महोत्सवांमध्ये हत्तींचे विशेष आकर्षण असते. हे सगळे हत्ती त्या त्या मंदिरांचे वैयक्तिक हत्ती असतात. त्यांनी पाळलेले असतात.
त्यांची संपूर्णपणे व्यवस्थित काळजी घेतली जाते.
प्रत्येक हत्तीसाठी वेगवेगळे माहूत असतात. हत्तीचे खाणे पिणे, त्यांना आंघोळ घालणे, मालिश करणे अशी कामे हे माहूत करतात. या शिवाय हत्तींवर आयुर्वेदिक उपचारही केले जातात.
विविध मंदिरातून पाळलेल्या हत्तींची संख्या साधारण ७०० पर्यंत आहे. परंपरेनुसार हत्तींना नटवून, सजवून महोत्सवात मिरवणूकीसाठी नेले जाते. त्यातही मानाचे हत्ती पुढे असतात. मिरवणूकीत पारंपरिक वाद्य, संगीत चालू असते. गजराजांचा थाट पाहून भाविक, प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात.
केरळला जंगलाचे वरदान आहे त्यामुळे आपण फिरायला गेल्यावर जंगलातील काही हत्ती आपणास आडवे जातात. नशिबात असेल तर हत्तींना समोरून जाताना पाहणे म्हणजे एक प्रकारचा नजाराच असतो.
मुन्नार, टेकडी, परंबिकूलम अशा विविध ठिकाणी घनदाट वनराईत हत्तींचे कळप किंवा एक दोन हत्ती बऱ्याचदा दिसतात, सामोरे जातात.
याचबरोबर elephant ride, elephant shower, bath अशा रोमांचक गोष्टी पर्यटकांसाठी काही ठिकाणी योजलेल्या असतात. या गोष्टी अनुभवताना वेगळाच आनंद मिळतो. तो क्षण अविस्मरणीय क्षण होऊन जातो.
केरळला फिरायला आल्यावर गजवैभवचा अनुभव घेतला नाही तर तुम्ही येऊन काय केले ?.. असे मात्र तुम्ही केरळला आल्यावर करू नका बर का.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील.
पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800