नमस्कार, वाचक हो…
देशातील प्रमुख मंदिरापैकी एक प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत मंदिर म्हणजे केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभ स्वामी मंदिर होय.
एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला पश्चिम घाट आणि यामध्ये वसलेले अद्वितीय असलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर.
केरळ मधील महत्वाचे पर्यटन क्षेत्र म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे येण्यास जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे तिरुवनंतपुरम आणि ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असलेले जवळचे विमानतळही तिरुवनंतपुरम हेच आहे.
स्कंद पुराण, पद्म पुराणामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. त्रावणकोर राज्याचे महाराज मार्तंड वर्मा यांनी १७५० मध्ये आपले राज्य श्री विष्णु चरणी अर्पण केले. स्वतःसह पुढील सर्व वंशज पद्मनाभाचे सेवक म्हणून जाहीर केले. तेव्हा पासून त्रावणकोरच्या कोणत्याही राजांचे नाव घेताना त्यांच्या नावापुढे पद्मनाभ दास ही उपाधी लावली जाते.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्रावणकोर संस्थान भारतामध्ये विलीन झाले पण मंदिराचे व्यवस्थापन राज परिवाराकडेच राहिले.
केरळ आणि द्रविडी वास्तुकलेचा अप्रतिम नमुना इथे आपल्याला पाहण्यास मिळतो. भव्य दिव्य अशा या मंदिराचे शिल्पसौंदर्यही अतुलनीय आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात भुजंगावरती पहुडलेली विष्णूची मनोहर मूर्ती आपणास मंत्रमुग्ध करते.
फक्त हिंदूनाच या मंदिरात प्रवेश मिळतो. दर्शनासाठी जाताना पोशाखाबाबतही काही नियम पाळावे लागतात. मुले आणि पुरुषांसाठी मुंडू तर स्त्रियांसाठी साडी परिधान करणे आवश्यक असते. मुलींना फ्रॉक किंवा परकर पोलके चालते.
पहाटे ३.३० पासून मंदिर पूजेसाठी आणि दर्शनासाठी उघडले जाते ते दुपारी १२ पर्यंत आणि संध्याकाळी ४ नंतर ते रात्री ८ पर्यंत. दुपारी मंदिर बंद ठेवतात. पण काही विशेष सण, उत्सव असतील त्यावेळी वेळेत थोडाफार बदलही केला जातो.
मार्च/एप्रिल आणि ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये विशेष महोत्सव साजरा केला जातो. पैंकुनी उत्सव, अल्प्पशी उत्सव उल्हासात साजरे केले जातात, शोभा यात्रा काढल्या जातात. लक्ष दीपम हा खास उत्सव साजरा केला जातो.
श्रद्धापूर्वक भक्तीभावाने आलेल्या भक्तांवर श्री पद्मनाभ स्वामी आपल्या शुभ दृष्टीने कृतकृत्य करतात, भक्ताला पावन करतात अशी इथे येणाऱ्या भक्तांची श्रद्धा आहे.

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800