नमस्कार, वाचक हो.
उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेले केरळ मधील अजून एक प्रसिद्ध आणि आकर्षक मंदिर म्हणजे चोट्टानीकारा भगवती मंदिर. चोट्टानीकारा म्हणजे ज्योतिकरा – प्रकाशमान करणारी देवी असा अर्थ होतो.
एर्नाकूलम रेल्वे स्टेशन आणि कोचीन विमानतळ या मंदिराच्या ठिकाणी जायला जवळ पडते.
दुर्गा, अम्मन भगवती, महालक्ष्मी, राज राजेश्वरी अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेली देवी श्रीविष्णुसह इथे वास्तव्यास आहे. अम्मे नारायण, देवी नारायण, लक्ष्मी नारायण, भद्रे नारायण हा मंत्र जप दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या मुखी सतत चालू असतो.
पहाटे ३.३० वाजलेपासून ते दुपारी १२ पर्यंत आणि संध्याकाळी ४ वाजलेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत मंदिर पूजा, दर्शनासाठी उघडे असते. काही विशेष महोत्सव असतील त्यावेळी मात्र काही वेळा वेळेत बदल केला जातो. दर्शनासाठी जाताना पुरुषांना मुंडू घालावे लागते तर स्त्रियांना साडी आणि चुडीदार चालतो.
येथे देवीची तीन वेळची पूजा तीन रूपात केली जाते. सकाळची पूजा महासरस्वती, दुपारची पूजा महालक्ष्मी आणि संध्याकाळची पूजा काली रूपात केली जाते. सकाळी शुभ्र, दुपारी लाल तर संध्याकाळी निळी वस्त्र देवीला परिधान केली जातात.
मंदिरात मुख्य महोत्सव मकोम थोजल हा फेब्रुवारी / मार्च मध्ये साजरा केला जातो. तर मल्याळम नववर्ष विशू, ओनम असे विशेष सण असतील तेव्हा खास उत्सव असतात. हत्तीच्या मिरवणूका, शोभा यात्रा आणि अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
नवरात्रीत विजयादशमीच्या वेळी इथे विशेष महत्व असते. सर्व शक्तिमान असलेली ही देवी भक्तांना काही मानसिक रोग असतील तर ते बरी करते. दुष्ट आत्मा किंवा कुणाला कसली बाधा झाली असेल तर ती दूर करते. भक्तांना विविध प्रकारच्या त्रासातून देवी मुक्त करते, समाधान देते. भक्तांच्या पाठीशी उभी राहते.
केरळला फिरायला आल्यावर चोट्टानिकारा भगवतीचे देवीचे दर्शन आवर्जून घ्या बर का !

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील.
पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800