Monday, February 16, 2026
Homeसाहित्यआठवणींचे कपाट

आठवणींचे कपाट

उघडू नये कधीच गोदरेजचे कपाट
ठासून भरलेल्या आठवणी असतात आत
कधीच घडी न मोडलेल्या साडया
अंगावर घेतात धडाधड उड्या
कोसळतो आठवणींचा धबधबा ॥

आठवणी अगणित
प्रत्येक घटनेशी निगडित
नकळत मन आठवू लागते हिशोब
“ही साखरपुडयाची, अष्टपुतळी मामाकडची
वरमाला घातली ती लग्नाची, स्वागत समारंभाची, गृहप्रवेशाची
ही ऽsमालिका आठवणींची
संपता संपेना
डोहाळे जेवणाची, बारशाची, सासरची, माहेरची
“अहोंनी” गुपचूप आणलेली
प्रेमाची काश्मीरची ॥

प्रत्येक साडीची अविस्मरणीय आठवण
जपून ठेवली आजन्म साठवण ॥

मना !
आवर रे मोह, उघडायचा लॉकर
कोसळेल अंगावर
वेदनांचा ओहोळ
एकाहून एक दागिने अमूल्य
चेतवतील वेदनांचे शल्य,
नकळत तू होशील आठवणीत दंग II

अंगठी साखरपुडयाची, जोडीला माळ सोन्याची
बोरमाळ, पोहे हार, लक्ष्मी हार, चपला हार
दागिने सोन्याचे, मोत्यांचे, जडावाचे
चार पदरी तन्मणी, सोन्यात गाठवलेला
दिमाखात वक्षावर रुळलेला
पाटल्या भरीव, पाटल्या नक्षीच्या
भक्कम तोडे शिंदेशाही,
बांगडया मात्र नाजुक किणकिणणाऱ्या
मनाची तार छेडणाऱ्या
हिरव्या रंगाला शोभणाऱ्या
गेलास ना हरवून मना !
सगळ्या दागिन्यांवरुन प्रेमाने फिरवला हात मात्र,
हाती आले मंगळसूत्र
दागिन्यांचा मुकुट राज
त्याचा वेगळाच बाज. ॥

काळाने सारे दूर हिरावले
दागिने लॉकरमध्ये
कायमचे विराजमान झाले
साडया पडल्यामागे
त्यांचे उडून गेले रंग
आयुष्यात उरला एकच
पांढरा रंग
नाही गळ्यात मंगळसूत्र
सारे वैभव नाममात्र 
अश्रूंचा येईल महापूर
धूसर सारे दूर दूर ॥

नका उघडू गोदरेजचे कपाट
लॉकर तर बंदच ठेवा
बंदिस्त ठेवा अनमोल ठेवा
नकोच त्या आठवणी ॥

सुलभा गुप्ते

– रचना : सुलभा गुप्ते. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खुपचं भावनीक कविता .जोडीदार गेल्यावर स्त्रिच्या जीवनाला अर्थाचं उरत नाही .खुप मन मारून जगाव लागत .अशा आशयाच्या माझ्या बऱ्याचं कविता आहेत
    वाईट वाटले .जगूया आता त्याचं बोल्न येईतोवर .
    धन्यवाद 🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11