Homeलेखसंगती रंग : १०

संगती रंग : १०

न दिसणारी बाजू

“ह्या वर्षी एकतीस डिसेंबरची पार्टी करूया, अगदी स्पेशल !“ विद्याताईंनी सुचवले. आमच्या लंचग्रुपच्या कॅप्टन आहेत विद्याताई. त्या फेब्रुवारीमध्ये रिटायर होणार होत्या. त्यांचं मन मोडवेना. लंचग्रुप मध्ये आम्ही वेगवेगळ्या वयाच्या मैत्रिणी आहोत. म्हणजे नमितासारखी पस्तीशीची मुलगी ते सर्वात ज्येष्ठ विद्याताई. एवढी मोठी वयाची रेंज ! तरीही आमचा ग्रुप अगदी घट्ट आहे. अजूनही आहे. ही पार्टी ठरली खरी, दुसऱ्याच दिवशी नमिताने सांगितले,
”मला एकतीस डिसेंबर जमणार नाही. आमची घरगुती पार्टी असते ना . “
“पार्टी ? “ वैदेहीने नवलाने विचारले.
“नेहमीची गं….”
“हे काय नमिता,
अगं नणंद येतेच तुझी  दरवर्षी !!” विद्याताई नाराज झाल्या.
“नणंद येतच असते की, उठ सूट ! गावातच तर रहाते. घरगुती पार्टी म्हणे. ह्या वर्षी विद्याताईं म्हणतायत तर …” राधिका जराशी वैतागली.
“आपण काय ड्रिंक घेणार आहोत का ? फक्त एकत्र डिनर करणार. लगेच तर निघायचं घरी. अनुपला सांग. तो येईल घ्यायला.” मी सुचवलं .
नमिता म्हणाली. ” सासूबाईंनी ‘ नाही ‘असे ठरवले आहे. त्यांनी एकदा ठरवले की ठरवले. तुम्ही करा पार्टी.” थोडा वेळ सगळ्या जणी गप्प बसल्या.

गेल्याच  आठवड्यात नमिताच्या सासूबाईंचं कौतुक करायला आम्ही सगळ्याजणी गेलो होतो. दिव्यांग मुलांच्या शाळेत त्या शिकवतात. आदर्श शिक्षिका म्हणून शाळेने त्यांचा गौरव केला. आम्ही नमिताच्या घरी जाऊन त्यांचे खास कौतुक केले. दिव्यांग मुलांना शिकवणे किती कठीण आहे. असे शिक्षक दयाळू  आणि समजून घेणारे असलेच पाहिजेत, नाही का ? त्यांना कळू नये ?
विद्याताई फेब्रुवारीमध्ये  रिटायर होणार, म्हणून त्यांचं मन जरा राखत होतो आम्ही. आमच्या ग्रुपमध्ये जेवायला त्या नसतील पुढच्या वर्षीपासून…

थोड्या वेळाने विद्याताई म्हणाल्या, ”ठीक आहे. आपण एक जानेवारीला करू पार्टी. त्यात काय ! नमिताशिवाय पार्टी नाही ! पुढच्या वर्षी बघू.”

“पुढच्या वर्षीदेखील मी खात्री देऊ शकत नाही हं.” नमिता म्हणाली.
स्नेहलने विचारलं,
”नमिता, एवढंसुद्धा तुला स्वातंत्र्य नाहीये का गं ?
कधी बोलली नाहीस ते ! “

नमिता म्हणाली, ”काही बाबतीत नाहीये स्वातंत्र्य, खरंच….त्यात काय बोलायचं गं ! तसे काही हाल असे नाहीयेत माझे. वाईट नाहीत त्या. हेकट आहेत एव्हढंच. पण तुम्ही सर्वांनी एक जानेवारीची तारीख माझ्यासाठी ठरवलीत त्यामुळे मला खूप आनंद झालाय.”

“आम्ही आहोतच, तुझ्या मैत्रिणी … गुणा s s च्या..” स्नेहलने जोरात हेल काढला आणि म्हणाली, 
“बाहेर अशी प्राइजेस झळकवायची. घरात कुठे जाते दया, माया, समजूत ?” 
“खरं सांगू ? सासूबाईंचा समजूतदारपणा माझ्या वाट्याला फारसा कधी नाहीच आला. त्या स्वतःचं म्हणणं लादणाऱ्याच  वाटतात. स्पास्टिक चाईल्ड त्या उत्तमरित्या हॅण्डल करू शकतात हे खरं. त्याचे प्रशिक्षण घेतले आहे त्यांनी. नोकरीची संधी त्यामुळेच मिळाली. इमाने इतबारे त्या स्वतःचे कौशल्य वापरतात.
ते काम चोख बजावणे ह्या गुणवत्तेसाठी त्यांना पुरस्कार मिळाला.“
“अय्या ! आम्ही समजत होतो, त्या दयाळू असतील विशेष समजूत असेल त्यांच्याकडे ..”
“एक तर तो त्यांचा पेशा आहे. स्वभाव नव्हे. त्यांच्या ह्या पेशामुळे तुम्ही गैरसमज केलात. तुम्ही त्यांना एका कोनातून बघत आहात. अनेक सामाजिक संस्था त्यांच्या शाळेच्या कार्याची दखल घेतात. ह्या सर्वात सीनियर ! सत्कार घ्यायला, बुके घ्यायला त्यांनाच पुढे करतात,सहसा. आधीच जरा स्वभाव असा. आता तर त्यांना एक प्रकारचा कैफ चढलेला आहे. दुसऱ्यांचं मत मान्य करूच शकत नाहीत त्या … ”
”आडमुठेपणा म्हण !”
“ कठीण गं बाई… “
“ऐकावं ते नवलंच एकेक….”
“चकाकतं ते सोनं नसतं !”

एकेकजण तडातड बोलू लागली.
“आणखी एक बाजू अशी, त्यांचे काम अवघड आणि संयमाची परीक्षा घेणारे आहे. संयम सगळा वापरुन संपुष्टात येतो, त्यामुळे त्यांची घरात वागण्यासाठी समजून घेण्याची क्षमता उरतच नसावी त्यांना.“ नमितानं सांगितलं. “कशी तू हॅण्डल करतेस गं.. “
“अगं सांगते ना, नेहमीच जाच करत नाहीत. पण आता ‘नाही’ म्हटलं ना, ती काळ्या दगडावरची रेघ. अगदी पुढच्या वर्षी लक्षात ठेवतीलच बघ हे.. अगदी नक्की. माझी नणंद काही रागावणार नाही. यांचाच इगो प्रॉब्लेम.” 
“अनुप काय म्हणतो, गं ह्यावर ?”
“अगं बायांनो, शेवटी घरातलं माणूस आहे..थोडं जपून वागावं लागतं एव्हढंच. त्यांची संयमशक्ती शाळेत वापरल्याने संपून जाते, हे आम्ही दोघांनीही जाणून घेतले आहे. तिघेजण परस्परांशी चर्चा करून निर्णय घेणे अशक्यच असते. आम्ही दोघे आधी काही चर्चा करून ठरवतो आणि सँक्शन करणार हायर अथॉरिटी ! “
“घर आहे की ऑफिस ?”
“अवघड आहेच जरा. पियू आहे, म्हणून घर हे घर आहे. घरात पियू हा सर्वाना सांधणारा दुवा आहे. पियूला आजी म्हणजे तर जीव की प्राण. असं गुंतलेलं असतं गं सगळं !”

“तुला पण एक प्राइज द्यायला हवं, त्यांना सांभाळल्याबद्दल.”

“काय गं, मग आता हायर अथॉरिटीनी रिजेक्ट केलं तर अनुप काही बोलला नाही ?”

“अनुपचं सांगू का ? आपली पार्टी -बिर्टी तो महत्वाचे मानत नाही. त्यासाठी तो नक्कीच वाद घालणार नाही. पण तसंच महत्वाचं असेल, तर तो स्पष्ट विरोध करतो. माहीत आहे ना, माझी तीन वर्षे ट्रान्सफर झाली होती, किती दूर ! पियू खूप लहान होती तेव्हा. इतक्या लांब ट्रान्सफर म्हटल्यावर त्या अगदी नाराज होत्या. मला तर प्रमोशन गमवायचं नव्हतंच. त्यावेळी विरोध करणाऱ्या आईला त्याने स्पष्टपणे ठणकावले होते ! तिला कोऑपरेशन देणार नसशील तर मी जॉब सोडून घरी थांबेन. असं म्हणालेला.”

“किती वाखाणण्यासारखी साथ आहे गं ही. अजून काय हवं ? अनुप शहाणा आहे. अशा मुद्द्यांसाठी राखून ठेवावी लागतात, हुकूमाची पानं. पार्टी तेवढी महत्वाची नक्कीच नाही.” विद्याताई मायेने उद्गारल्या.
सासूबाईंची दुसरी बाजू, नमिताने आणि अनुपने दुखरी मानली नाही. छान समजून घेतली आहे. दोघेही परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहेत. कोणताही ‘स्पेशल कोर्स’ न करता !
आठवतात का अशा घटना, ज्यांची दुसरी बाजू वेगळी आहे !

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा  घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments