Homeलेखमाझी जीवन नौका : 3

माझी जीवन नौका : 3

माझं माहेर सांगलीचं. सांगलीच्या सिटी हायस्कूल या खूप जुन्या नावाजलेल्या शाळेत शिकवणाऱ्या डी. एस्. कुलकर्णी या इंग्रजीच्या सुप्रसिद्ध शिक्षकांची मी मुलगी. माझे बाबा इंग्रजीचे फार अधिकारी, विद्वान शिक्षक होते. ते एस एस सी बोर्डाच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाचे संपादकही होते. त्यांनी उत्तम इंग्रजी भाषांतरं केलेली आहेत. असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्रजी शिकवलंच आणि अक्षरशः घडवलं. माझ्या आईचं नाव मुक्ता. ती ही फार उत्कृष्ट शिक्षिका होती.
 
आई-बाबा,थोरला भाऊ प्रसन्नदादा, मी मधली बहीण आणि धाकटा भाऊ राघवेंद्र उर्फ अतुल असं आमचं पाच जणांचं कुटुंब. आता मोठा भाऊ प्रसन्नदादा सी. ए. आहे.धाकटा भाऊ राघवेंद्र उर्फ अतुल एम्.डी. डॉक्टर आहे. मुलांनातवंडांनी भरलेले दोघांचेही संसार छान सुरू आहेत.

माझे आई, बाबा आणि भाऊ, प्रसन्न , राघवेंद्र (अतुल)

आमच्या घरी पाहुणेरावळे, नातेवाईक यांचा सतत राबता असायचा. आई-बाबांच्या सात्विक, प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी खूप माणसं जोडली.
पुढच्याच गल्लीत माझं आजोळ होतं. दोन्ही घरातून अपारंपार प्रेम तर मिळालंच आणि शिस्तही !

अशा सांगली सारख्या छोटेखानी शहरात, बाळबोध वातावरणात, आई-वडिलांच्या मायेच्या, कौतुकाच्या सुरक्षित कोशात संथ आयुष्य जगणारी मी एका मध्यमवर्गीय घरातली सर्वसामान्य मुलगी… अगदी महाराष्ट्रीयन वळणाची आणि मराठी संस्कारातली !

सांगलीच्या डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर या शाळेत प्राथमिक आणि सिटी हायस्कूल या शाळेत माध्यमिक शिक्षण झालं.
विलिंग्डन महाविद्यालयात कॉलेजचे शिक्षण झालं. इंग्रजी हा विषय घेऊन बी. ए. केलं. पुढे एम ए चं प्रथम वर्ष सुरू झालं.

माझ्या सासरची कुलकर्णी मंडळी पण सांगलीचीच. माझे सासरे अनंत नारायण कुलकर्णी. त्यांना त्यांचे मित्र बंडोपंत म्हणत. घरी सगळे दादा म्हणायचे. सासुबाईंचं नाव सुमती. घरचे त्यांना वहिनी म्हणायचे.

सासर्‍यांचं वास्तव्य नोकरीनिमित्त मुंबईत पार्ल्याला होतं. घरी सासू-सासरे, मुकुंद, त्यांचा धाकटा भाऊ श्रीकांत (आता डॉक्टर, प्रसिद्ध सर्जन) आणि धाकटी बहीण वृंदा (बँकेत नोकरी आणि मिरजेच्या विजयराव कुलकर्णी सी.ए. यांची पत्नी.आज दुर्दैवाने कॅन्सरने देवा घरी गेली आहे) असं कुटुंब.
इथेही सतत पाहुणे मंडळी, शिक्षण नोकरी या साठी राहिलेले दीर, पुतणे असा राबता होता. सासूबाई सर्वांचं खूप प्रेमानं अगत्यानं करायच्या.

माझे सासरे आणि सासूबाई

मुकुंदांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात झाले. पुढे इंजिनिअरिंगला सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये ते आले. मुकुंद आणि त्यांचे मित्र सायकलवरून इंजीनियरिंग कॉलेजला जात.

सांगलीत मुकुंद  त्यांचे काका – प्रभाकरकाका यांच्याकडे राहायचे. घरी मुकुंदांचे आजी आजोबा म्हणजे आई-नाना, प्रभाकाका, पुष्पाकाकू त्यांची मुले राहत.
या जुन्या घराच्या अगदी जवळ माझ्या सासर्‍यांच्या काकांचा आशीर्वाद हा मोठा बंगला होता. तिथे काकाआजोबा – काकूआजी रहायचे. खालच्या मजल्यावर बाळूकाका (प्रा.डॉ.बी.एन्. कुलकर्णी) व कुमुद काकू(स्वतःची लॅबोरेटरी चालवणाऱ्या ॲगमार्क केमिस्ट) आणि त्यांची मुलं असे राहायचे.
घरची शेती प्रभाकर काकाच बघायचे. घरी गाईंचा गोठा, दुधाचा व्यवसाय होता‌. घरी खूप मोठा राबता होता. सतत येणारे जाणारे, मुक्कामाला असणारे पाहुणे. लग्नकार्यं, सणवार, कुलाचार सर्व काही होतं.त्यात शिक्षणासाठी येऊन राहिलेली ही पुतणे मंडळी पण असायची. या साऱ्यांची देखभाल, स्वयंपाकपाणी पुष्पाकाकू प्रेमाने, आनंदाने करायच्या.

मुकुंद म्हणतात सहसा लहान गावातून मुंबईला मुलं उच्च शिक्षणासाठी जातात. पण आम्ही मात्र मुंबईहून सांगलीला उच्च शिक्षणासाठी आलो. कधी घरची गडी माणसं आली नाहीत तर प्रभाकाकांच्या बरोबर धान्याची पोती उचलून ठेवणं, भिजवलेलं भात सायकल वरून गिरणीत नेऊन पोहे कांडून आणणं, गाईंच्या धारा काढून डेअरीला दूध नेऊन घालणं ही कामं कधी कधी मुकुंदांच्याकडे असायची.
त्या दिवसांच्या खूप मजेच्या, धमाल आठवणी मुकुंद सांगतात.

दोन्ही घरातले आजी-आजोबा, काका-काकू यांच्या मायेच्या छत्राखाली मुकुंदांचं कॉलेजचं शिक्षण झालं. बी ई, मेकॅनिकलची डिग्री घेतली आणि ते मुंबईला परत गेले. त्यानंतर मोगल लाईन या व्यापारी शिपिंग कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरीत दाखल झाले. मर्चंट नेव्ही हेच त्यांचं कार्यक्षेत्र बनलं.

आमची दोन्ही घराणी दोन-तीन पिढ्यांपासून एकमेकाला ओळखणारी. त्यामुळे माझ्या आजेसासूबाई आई-बाबांना त्यांच्या लहानपणापासून ओळखत होत्या. माझे वडील आणि सासरे तर कॉलेज पासूनचे मित्र.
गंमत म्हणजे मी आणि मुकुंदानी मात्र एकमेकाला कधीच पाहिलं नव्हतं. आमची कधीही भेट झाली नव्हती. त्यामुळे प्रेमविवाह वगैरेचा प्रश्नच नव्हता.

मी बी. ए. ला शिवाजी युनिव्हर्सिटीला इंग्रजी विषयात पहिली आले म्हणून पेपर मध्ये माझा फोटो, नाव वगैरे आलं होतं. घरी आलेल्या पेपरातली ती बातमी पाहताच, “अरे ही तर आपल्या डी.एस्. आणि मुक्ताचीच मुलगी” असं माझ्या आजेसासूबाईंच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या या नातवासाठी मला मागणी घातली.

मे १९७९ मधे आमचं लग्न झालं. मी एम्. ए. करायचं थांबवून टाकलं आणि एम्. ए. कुलकर्ण्यांची (मुकुंद अनंत कुलकर्णीं) पत्नी झाले.
लग्नापूर्वी कु. वेदवती धीरेंद्र कुलकर्णी होते, तिची आता सौ. वेदवती मुकुंद कुलकर्णी झाले. त्या बदललेल्या मधल्या मुकुंद या नावाने सगळं आयुष्यच बदलून टाकलं.

लग्नानंतर मुकुंद आणि मी

मुकुंद मरीन इंजिनियर आहेत, जहाजावर नोकरी करतात, त्यासाठी जहाजावर राहून अनेक देशांना ते जात असतात, एवढेच मला माहीत होतं. यापलीकडे मरीनरचं आयुष्य, जहाजावरचं जीवन, समुद्र प्रवास याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती.
क्रमशः

वेदवती कुलकर्णी

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments