शिकण्याची कला
“कला म्हणजे काय ? हे सगळ्यांनाच माहित आहे” असं वाक्य लिहिलं म्हणजे कलेची ‘व्याख्या’ करण्याच्या जबाबदारीतून आपण सुटतो. आणि त्यामुळे वाचकांनाही बरं वाटतं, त्याच्या ज्ञानाचं कौतुक केल्यामुळे, असो….
खरं म्हणजे शिकवायला काही कला लागते का ?
ते तसं नसतं तर काही शिक्षक कसे आपल्या लक्षात राहिले असते अजूनही ? तसे कान पिळणारे शिक्षक आठवतात आपल्याला पण ते वेगळ्या कारणासाठी.
घोकंपट्टी ऐवजी मुद्देसूद विचार करुन तत्वं लक्षात ठेवायची सवय लावणारे शिक्षक सहज आपल्या बोलण्यात येतात की. काहीतरी वैशिष्ट्य आणि कौशल्य असल्याशिवाय का त्यांच शिकवणं आपल्यात कुठतरी उमटतं ? कलाच ना ती त्यांची ?
आज काल क्षमता आधारित शिक्षणाचा ‘बोलबाला’ आहे. क्षमता घडवायला वापरायच्या पध्दती, क्षमता कुठल्या पातळीपर्यंत अवगत झाली आहे ते वारंवार तपासून, परत काय नवे उपाय वापरायचे हा काथ्याकूट ! कोण म्हणतं हे सगळं करणं सोपं आहे म्हणून ?
बाल शिक्षण आणि प्रौढ शिक्षणाची तत्वही वेगवेगळी असं काही तरी शोधून काढलं आहे तंत्रज्ञांनी, ती तत्वही बसवता आहेत गुरुजन आपल्या शिक्षण पध्दतीत.
आता “स्मार्ट बोर्ड” डोकवायला लागला आहे वर्गावर्गातून.
काय काय होतय हे, हे सगळं ? कोण म्हणतं शिकवणं सोपं असतं ते !
नुकताच ‘शिक्षक दिन’ झाला. आम्हाला घडवणारे आणि स्वत: झिजणारे, ‘पु लं’च्या चितळे मास्तरां सारखे आमचेही गुरुजन आठवले, डोळे पाणावले त्यांच्या आठवणींनी, जुने दिवस आठवले… साष्टांग दंडवत सगळ्या गुरुजनांना.
एक गमतीचं सांगतो. खरं म्हणजे ‘शिकविण्या’ पेक्षा
‘शिकणं’ ही मोठी कला आहे. कुठून आणि काय, कसं शिकायचं ह्यासाठी वेगळंच कौशल्य लागतं. त्याविषयी सविस्तर कधीतरी…
जाता जाता एक मात्र सांगतो. बायकोच्या “कला कलानं वागणं” ही एक मोठी कला आहे ! बरंच व्यावहारिक शिक्षण संपादन करण्याची आणि आनंदी संसार करण्याची !
अप्रत्यक्षरित्या शिक्षणाचा वरदहस्त ठेवणाऱ्या बायकोस मन:पूर्वक नमन !

– लेखन : डॉ विनायक भावसार. मंडी, हिमाचल प्रदेश
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

खरोखर शिकणे ही पण कला आहे. अप्रतिम लेख