तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणून ज्यांचा एकेकाळी उपहास करण्यात आला आणि “भारतीय असंतोषाचे जनक” असा ज्यांचा गौरव इंग्रजांनीच केला, ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, त्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाच्या रूपानं अजरामर झाले आहेत.
प्रारंभीच्या वर्षी, म्हणजे १८९३ साली पुण्यात तीन ठिकाणी आणि मुंबईत दोन ठिकाणी असे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले होते. पण कोणत्याही नव्या कल्पनेला विरोध करण्याच्या भारतीय थोर परंपरेनुसार या उत्सवाच्या आयोजनासाठीही लोकमान्य टिळकांना आपल्याच देशबांधवांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं होतं. विशेष म्हणजे आज जसा सरकारच्या काश्मीर विषयक निर्णयाला प्रचंड पाठिंबा आहे, त्याचप्रमाणे टिळकांनाही उस्फूर्त समर्थन लाभलं आणि लवकरच देशात सर्वत्र, एवढेच नव्हे तर परदेशातही गणेशाचा उत्सव जोरात सुरु झाला.
लोकभावनेची नस ओळखणारे, ब्रिटिशांशी सामना केवळ अर्ज विनंत्या करून भागणार नाही हे जाणून सामान्य जनांना परकीय सत्तेचा जुलूम आणि अत्याचार या विरुद्ध जागृत करणारे लोकमान्य या जनतेला एकत्र कसं आणायचं याचाच सतत विचार करत असत. तेव्हा हा विचार त्यांना सुचला. जाती उपजातींच्या जंजाळात गुरफटलेल्या स्थितीतील ही जनता धार्मिक आवाहन केल्यास हेवेदावे विसरून एकत्र येऊ शकेल हे ताडून सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना त्यांना सुचली. तोपर्यंत घरीच चालणारा गणेशोत्सव टिळकांनी हमरस्त्यावर आणला, हा खासगी उत्सव लगेचच्या काळात सार्वजनिक झाला. लोकमान्य टिळकांनी १८९३ या वर्षी केसरी वाड्यात त्याची सुरूवात केली.
लोकमान्यांच्या निधनाला १०० वर्षे झाली असली तरी त्यांच्या त्यागाची, राष्ट्रसेवेची, लेखनाची, बुद्धीवैभवाची आणि संघटन क्षमतेची जनमानसावरील मोहिनी आजही कायम आहे. सच्चे राष्ट्रपुरुष सदैव स्मरणीय असतात. टिळक या प्रभावळीतले सर्वश्रेष्ठ भारतीय महानुभाव आहेत. क्षात्रतेज आणि देशप्रेम यांची अपूर्व सांगड त्यांनी घातली. त्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याचं विलक्षण आकर्षण होतं. त्यांच्या स्वराज्य प्राप्तीच्या ध्येयापोटी.
एक योगायोग म्हणजे स्वराज्यासाठी दोघांनीही केलेल्या गर्जना आजही मराठी मनात अमर आहेत. शिवाजी महाराजांनी “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” असे उद्गार काढले तर लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळविणारच” अशी घोषणा दिली. टिळकांच्या या ऐतिहासिक घोषणेची नुकतीच शताब्दी झाली असून त्यांनी प्रारंभ केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवास सव्वाशे वर्षे पूर्ण झाली आहेत.
एखादी चळवळ इतका काळ चालावी आणि ती आणखी जोमदार होत जावी याचं गणेशोत्सव हे जगातलं एकमेव उदाहरण असावं. जेव्हा इतर प्रस्थापित इंग्रजांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानत होते, तेव्हा कोणत्याही दिव्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवून लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला. मात्र धर्मकार्य हा केवळ बहाणा होता. समाजात स्वराज्यनिर्मितीची आस पेटावी हे त्यांचं ध्येय होतं. हेच जाणून टिळकांनी आधी गणेशोत्सव आणि मागोमागे शिवजयंती हे उत्सव सुरू केले. इंग्रज सत्तेकडून होणा-या जुलुमाविरुद्ध लढण्याची, शक्य झाल्यास ती सत्ता घालवून टाकण्याची आणि स्वराज्य स्थापण्याची प्रेरणा या दोन उत्सवांच्या रूपानं समाजाला मिळाली. हे ऋण कधीच विसरता येणार नाही.
त्या काळी लोकमान्यांना समाजात देवासारखं स्थान होतं. लोकमान्यांच्या आवाहनाला पहिला प्रतिसाद मुंबईत मिळाला. गिरगावातील केशवजी नाईक चाळीत त्याच वर्षी म्हणजे १८९३ साली पहिला गणेशोत्सव साजरा झाला. विशेष म्हणजे टिळकांच्या जीवनातील अनेक प्रमुख घटना मुंबईतच घडल्या. त्यांचं निधन मुंबईतच झालं.
मुंबईचा पहिला सार्वजनिक गणपती केशवजी नाईक चाळीतला तर दुसरा होता जवळच्याच जितेकरवाडीतला. त्याचं स्थापना वर्ष होतं १८९४. तिसरा गणपती कामत चाळीत १८९६ साली स्थापन झाला. नंतर सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या फोफावत गेली. केशवजी नाईक (काहींच्या मते त्यांचं मूळ आडनाव नायक होतं) यांनी १८६०च्या दशकाच्या आरंभी गिरगावात सात चाळी बांधल्या. त्या केशवजी नाईकांच्या चाळी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. या चाळींमध्ये मराठी कुटुंबं स्थायिक होऊ लागली.
सुमारे १५० कुटुंबं असलेल्या या चाळ समुहात अनेक सुप्रसिद्ध नेत्यांनी वास्तव्य केलं आहे. कवि केशवसुत, कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, समाजवादी नेते एस.एम जोशी, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर, प्रबोधनकार केशवराव ठाकरे, वीर वामनराव जोशी असे अनेक प्रसिद्ध लोक या चाळीत राहात. सुरुवातीला गणेशोत्सव रस्त्यावर साजरा होत असे. परंतु १९२५ पासून चाळींच्या दोन इमारतींच्या मधल्या मोकळ्या जागेत गणपती बसविण्यात येऊ लागला. त्या वर्षापासून आजवर ही परंपरा कायम आहे.
लोकमान्य टिळक १९०१ साली गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये एका सार्वजनिक सभेसाठी आले होते. त्यावेळपर्यन्त गणेशोत्सव सर्वत्र साजरा होऊ लागला होता आणि त्यांची कीर्ती चहूदूऱ पसरली होती. स्वाभाविकच मुंबईतील कित्येक प्रमुख गणेश मंडळांनी त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं. त्या भेटींची सुरुवात त्यांनी केशवजी नाईक चाळीपासून केली. ‘मुंबईचा गणपत्युत्सव’ या मथळ्याखाली या भेटीचा तपशील ‘केसरी’मध्ये छापून आला. तो असा : “गणेशोत्सव व्याख्यानमालेत झालेले पहिले व्याख्यान येथील केशवजी नाईकाच्या चाळींतील होय. व्य़ाख्यानकार वे. नरहरशास्त्री गोडसे असून अध्यक्षस्थानी ना. टिळक विराजमान झाले होते. ना. टिळक ह्या गणेशोत्सवात कोठे तरी व्याख्यान देतील किंवा अध्यक्ष होतील हे येथील लोक आधीच जाणून असल्यामुळे केशवजी नाईकाच्या चाळीत हजारों लोक जमले होते. व्याख्याते रा. गोडसे यांचा ‘गृहस्थाश्रम’ हा विषय असून त्यावर त्यांनी पाऊण तासावर सुरस भाषण केले. आपली सर्व मदार शास्त्रीबोवांनी ब्रह्मचर्यावर ठेवली होती. शास्रीबोवांचे भाषण झाल्यावर ना. टिळकांनी गृहस्थाश्रमाची महती सांगून राष्ट्रीय दृष्टीने त्याचा विचार केला व सभेचे काम आटोपले.”
टिळकांच्या या भेटीला १०० वर्षे पूर्ण झाल्याची स्मृती पुन्हा ताजी करण्यासाठी २००१ साली अगदी तशीच सभा आणि भेट आयोजित करण्यात आली होती. लोकमान्य टिळकांचा भास होईल अशी वेशभूषा केलेल्या व्यक्तीची मुख्य रस्त्यापासून मंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ‘बळवंतरावांचा विजय असो’ अशा घोषणाही देण्यात आल्या. विशेष म्हणजे नरहरशास्त्रींचे नातू दामोदरशास्त्री गोडसे यांचं या व्याख्यान या कार्यक्रमात आयोजित करण्यात आलं होतं.
या गोडसे कुटुंबाचा आणि केशवजी नाईक चाळीचा संबंध दीर्घकालीन आहे. मराठीतील आद्य प्रवासवर्णन म्हणजेच ‘माझा प्रवास’ या १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा याची देही याची डोळा घेतलेला अनुभव लिहिणारे विष्णुभट गोडसे वरसईकर यांचे चिरंजीव म्हणजे नरहरशास्त्री. ते शिक्षणानंतर मुंबईत स्थायिक झाले आणि केशवजी नाईक चाळीत राहू लागले. त्यांनी पिकेट रोडवर आणि माधवबाग इथं वेदपाठशाळा सुरु केल्या. माधवबाग येथील पाठशाळा त्याचे भाचे वैजनाथशास्त्री चालवत. वैजनाथशास्त्रीचे सुपुत्र पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्वाध्याय परिवाराची स्थापना केली. नरहरशास्त्री वेदशास्त्रसंपन्न असून विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत. त्यांचे पुत्र पुरुषोत्तमशास्त्री आणि नातू दामोदरशास्त्री यांनीही या चाळीत वास्तव्य केलं. दामोदरशास्त्री चाळीतील लोकांसाठी नियमित शास्त्रविवेचनाचे वर्ग चालवत. त्यांचं अलीकडेच निधन झालं.
केशवजी नाईक चाळीत गणेश मूर्ती पहिल्यापासून त्याच आकाराची, म्हणजे दोन फुटांची आहे. गणपतीचं आगमन आणि विसर्जन यासाठी आजही पालखीच वापरली जाते आणि चाळकरी मिरवणुकीत अनवाणी चालतात. या मंडळातर्फे उत्सव काळात होणारी व्याख्यानमालेत फार प्रसिद्ध असे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, पांडुरंगशास्त्री आठवले, राम शेवाळकर यांची भाषणं इथं गाजली आहेत. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, भाजपाध्यक्ष अमित शहा, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर अशा अनेक मोठमोठ्या व्यक्तींनी उत्सवाच्या काळात गणेश दर्शन घेतलं आहे.
केशवजी नाईक चाळीतून प्रेरणा घेऊन मुंबईत अनेक ठिकाणी गणेश उत्सव साजरा होऊ लागला. पारंपरिक सोज्वळ पद्धतीनं साजरा होणारा सोहळा आणि बड्या कलाकारांनी एके काली गाजवलेले शास्त्रीय संगीताचे आणि व्याख्यानांचे कार्यक्रम यांच्यामुळे शास्त्री हॉलमधील गणेशोत्सवाचं नाव सर्वतोमुखी झालं. त्याची शताब्दी काही वर्षांपूर्वी साजरी झाली. लोकमान्य टिळकांनी आखून दिलेल्या उद्दिष्टांचं तंतोंतंत पालन करतच हा उत्सव साजरा होतो.
दक्षिण मुंबईत ग्रँट रोड पश्चिमेस शास्त्री हॉल ही वैशिष्ट्यपूर्ण वसाहत आहे. ती आता सुमारे १५० वर्षांची आहे. केशवजी नाईक चाळ गणेशोत्सवानंतर मुंबईतील हजारो सार्वजनिक उत्सवांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर याचं स्थान आहे. तुफान गर्दीत होणारी नामवंतांची व्याख्यानं, अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी आणि गाजलेल्या मराठी नाटकांचे प्रयोग यांच्या इथल्या आठवणी शास्त्री हॉलचे रहिवासी मोठ्या चवीनं सांगतात.
शास्त्री हॉलच्या गणेशोत्सवाची सांगताही आगळी वेगळी असते. विसर्जन मिरवणुकीत १९१६ साली घडविलेल्या शिसवी पालखीमध्ये गणेश मूर्ती असते. आघाडीवर हलगीच्या तालावर नाचणारे लेझीम पथक असते तर नंतर येतात टाळमृदंगाच्या साथीत पालखीला रिंगण घालणारे शास्त्री हॉल निवासी.
गणेशोत्सवात व्याख्यानं ठेवणारी मंडळं अपवादात्मक. त्यापैकी एक असे शास्त्री हॉल. तिथं भाषणं देणार्यात जगद्गुरू शंकराचार्य, सावरकर, डांगे, आचार्य अत्रे, जमनादास मेहता, नाट्याचार्य खाडिलकर, ल. ब. भोपटकर, विद्याधर गोखले, बाळशास्त्री हरदास, शिवाजीराव भोसले अशा दिग्गजांचा समावेश आहे. शास्त्री हॉल गणेशोत्सवात अभिजात शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित करण्याची सुरूवात झाली पंडित भास्करबुवा बखले यांच्यामुळे. ते काही काळ इथं रहिवासी होते. गंगूबाई हनगल, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, मल्लिकार्जुन मन्सूर, मास्तर कृष्णराव, राम मराठे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर आदी धुरंधर इथं गाऊन गेले आहेत. उत्तरा केळकर, सुमतीबाई टिकेकर आणि त्यांची सून आरती अंकलीकर-टिकेकर या इथल्या रहिवासी गायिकांनीही हा रंगमंच गाजविला. इथल्या दोन मैफलींचा विशेष उल्लेख आजही होत असतो. शास्त्री हॉल गणेश उत्सव हीरकमहोत्सवी वर्षात तेव्हा विकलांग असलेले बाल गंधर्व यांना उचलून रंगमंचावर आणल्यानंतर मांडी घालूनच त्याही अवस्थेत त्यांनी गंधर्व गायकी पुन्हा जिवंत केली. ही मैफल त्यांनी अशी रंगवली की जुन्या पिढीतील रसिक भारावून गेले. उत्सवाच्या अमृतमहोत्सवी वर्षात हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेल गायनाबरोबरच त्यांचं कुटुंब शेजारच्या शंकरशेट बंगल्यात राहात असतानाच्या आठवणी जागविल्या. भीमसेन जोशींची मैफलही अनेक कलाकार उपस्थित असल्यानं स्मरणात आहे.
आज अनेक मंडळांनी शंभरी ओलांडली आहे. तथापि केशवजी नाईक चाळीच्या गणेशोत्सव मंडळाचं महत्व पहिला उत्सव म्हणून अबाधित आहे.

– लेखन : दिलीप चावरे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

🙏खूप छान माहिती 👌, आभार 👍
मुंबईतील पहिला गणेशोत्सव हा लेख उत्तमच आहे.खूप माहिती मिळाली त्या काळाबद्दल.केशावजी नाईक चाळ अजून अस्तित्वात आहे का हो?
टिळकांनी गणेशोत्सव सुरू केले ते स्वराज्याच्या बांधणीसाठी किती योग्य पाऊल होते.
शास्त्री बुवांनी ‘गृहस्थाश्रम ‘ या विषयावर बोलताना बाम्हचर्य या विषयावर भर दिला? हे वाचून आश्चर्य वाटले.पण त्या काळात त्यांना त्याची गरज वाटली असेल.
जुन्या गणेशोत्सवाचे फोटो पाहिले.मोबाईल WhatsApp नसलेल्या काळात,इंग्रजांची करडी नजर असताना लोकांना गोळा करणे किती जिकिरीचे काम होते .पण सर्वांची गणेशावर श्रद्धा असल्याने काम सोपे झाले.
हा संशोधनात्मक लेख लिहिणारे दिलीप चावरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!