बाप्पा तुमच्या येण्याने
आले होते घरपण घराला
अवघ्या दहा दिवसात
किती लावलात बाप्पा तुम्ही लळा
सारी दुःखे चिंता संकटे
गेलो होतो बाप्पा विसरून
देहभान हरपून गेले
आरत्या भजनात रममाण होऊन
तुमच्या निमित्ताने बाप्पा
सगळे कुटुंबिय एकत्र आले
प्रेम आपुलकीचे अमृत पिऊन
मन कसे तृप्त झाले
दिवस नि रात्र कशी संपायची
कळायचं नाही काही
बाप्पा तुमचं आगमन म्हणजे
हर्ष उल्हास अन् चैतन्याची नवलाई
बघता बघता आज
निरोपाचा दिवस आला
भावपूर्ण निरोप देता
ओघळतायत अश्रू घळघळा
जाहले भजन आम्ही नमितो
म्हणतांनाच कंठ दाटून आला
शब्द बाहेर पडे ना झाला
अविस्मरणीय झाला बाप्पा सोहळा
मखरातून मूर्ती बाहेर काढतांना
अवसान गेलं गळून
उत्साह गेला मावळून
सूनं झालं घर बाप्पा तुमच्या वाचून
घरातली लहान बाळं सुद्धा
झालीत रडवेली
निरोप देतांना बाप्पा तुम्हाला
अंगातली ताकदच संपून गेली
अश्रूभरल्या नयनांनी
करतो बाप्पा प्रार्थना
पुढच्या वर्षी येतांना
पत्ता आमचा विसरणार नाही ना
पहिल्या दिवसाची तुमची प्रसन्नता
कुठे बाप्पा हरवली
सोडून जाता भक्तांना
कळी तुमचीही कोमेजून गेली

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई .
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
