Monday, September 15, 2025
Homeसाहित्यपुस्तक परीक्षण : सामाजिक समतेचे क्रांतिकारक

पुस्तक परीक्षण : सामाजिक समतेचे क्रांतिकारक

जगाचा इतिहास हा सामाजिक विषमतेचा इतिहास आहे. अश्या विषमतेमुळे जे दीन- दलित आहेत, गरीब आहेत त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत आला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळविण्यासाठी प्रत्येक काळात समाज सुधारक होऊन गेलेत.त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावे, त्यांना सुख मिळावे ह्यासाठी चार्वाक, गौतम बुद्ध, ग्रीक राजा मिलिंद, श्री चक्रधर स्वामी, अब्राहम लिंकन यांच्यापासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यापर्यंत कितीतरी समाज सुधारकांनी प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नाचे फळ म्हणजे आज समाजात सामाजिक सुधारणा होताना दिसून येत आहे.

आज भारतीय घटनेमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्त्वाचा समावेश आहे. सर्व समाज सुधारक व्यक्तींना हिच तिन्ही तत्वे प्रामुख्याने अभिप्रेत होती.

घटनेत ह्या तत्वांचा उल्लेख आहे म्हणजे ती
प्रत्यक्षात अमलात आली आहेत, असे नाही. तर त्यांची योग्य अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आपल्याला मिळण्यासाठी ज्या महान व्यक्तीनी आपल्या जीवनात खूप मेहनत घेतली, त्या सर्व व्यक्तींच्या कार्याचा व जीवनाचा एक मोठा ग्रंथ असावा व प्रत्येक वेळी निरनिराळी पुस्तके वाचायची गरज पडू नये ह्या उद्देशाने शत्रुघ्न लोणारे ह्यांनी मागील चार पाच वर्ष मेहनत घेतली आणि त्याच मेहनतीचे फळ म्हणजे ‘सामाजिक समतेचे क्रांतिकारक’ हे दोन खंडातील पुस्तक होय.

‌ह्या ग्रंथात इ. स. पूर्व सातवे शतक ते इ. स. नंतर विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जन्मास आलेल्या समतेच्या समाज सुधारकांच्या जीवनकार्याचा एकत्रित आढावा घेतला आहे. ह्या सर्व सुधारकांनी प्रचलित समाज व्यवस्थेत असलेले दोष दूर करण्याचे प्रयत्न केले. पण अजूनही समाज व्यवस्थेत दोष आहेतच आणि ते दूर करणे आवश्यक आहे. जुन्या काळात जे समाजसुधारक झाले त्यांच्या जीवनाचा व त्यांनी केलेल्या कार्याचा जर आपण अभ्यास केला तर त्यांनी सांगितलेले विचार जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणले तर आपले जीवन सुखकर होईल. सर्वांना न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्राप्तीचा अनुभव मिळेल. ‌

अश्या सर्व 75 पेक्षा अधिक व्यक्तीचे जीवनदर्शन तसेच त्यांचे समाजकार्य पुढे आणण्याचे कार्य लेखकाने केले आहे. ह्या दोन खंडात असलेल्या ग्रंथाचा उपयोग अनेक वाचक, अभ्यासक, विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना होणार आहे.

या ग्रंथाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात ह्यांची प्रस्तावना तसेच निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, निवृत्त माहिती संचालक शरद चौधरी, ह्यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत.

श्री लोणारे यांनी अतिशय मेहनत घेऊन लिहिलेले “सामाजिक समतेचे क्रांतिकारक” हे पुस्तक प्रत्येक चोखंदळ वाचकाने वाचायला हवे , असा हा एक सुंदर संदर्भ ग्रंथ आहे. त्यामुळे भविष्यात प्रत्येक अभ्यासकाला तो नेहमी उपयोगी पडेल,यात काही शंकाच नाही.

पुस्तकाचे लेखक श्री शत्रुघ्न लोणारे

लेखक परिचय
श्री शत्रुघ्न लोणारे हे निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी आहेत.त्यांनी विविध वृत्तपत्रात निरनिराळ्या विषयांवर विपुल लिखाण केले आहे. त्यांची आजपर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. निवृत्तीनंतर स्वस्थ न बसता त्यांनी आपले जीवन वाचन, संशोधन,लेखन यास वाहून घेतले आहे.

किशोर पेटकर

– परीक्षण : किशोर पेटकर. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments