कळते तेंव्हा कुठवर जगणे निर्मळ असते
खुल्या मनाची खरेच जिथवर सळसळ असते
बंद करावे दार मनाचे शांतपणाने
जिथे जिथे वितंडवादी वादळ असते
ज्या दारावर हसत खेळत स्वागत होते
घरात त्या माणसांची वर्दळ असते
उगाच नाही जीव लावतो सैनिक मित्रा
देशासाठी लढावयाची तळमळ असते
तोंड फिरवले, नाक मुरडले लगेच कळते
समोरच्याच्या प्रगतीची ती मळमळ असते
रक्त ओकतो तरी, धावतो सांज सकाळी
बापाला बघ संसाराची कळकळ असते
ओलावा जर जरा झिरपला आपुलकीचा
जगण्याची मग तिथे चांगली हिरवळ असते

– रचना : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. बदलापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800