मानवी जीवन म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली अनमोल देणगी असून हा मनुष्य देह म्हणजे खजिना आहे. जर आपल्याला जीवनाचे खऱ्या अर्थाने सार्थक करायचे असेल व जीवनाच्या प्रत्येक टप्यावर आनंद घ्यायचा असेल तर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. निरोगी व दीर्घायुष्य लाभणे हेच सुखी व समाधानी जीवनाचे खरे रहस्य आहे, असा अतिशय मोलाचा सल्ला यशस्वी, तत्वनिष्ठ, प्रसिद्ध राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक श्री महेश मधुकर खुटाळे देतात.
आज त्यांच्या विद्यार्थ्यांनी केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर ही आपले नाव रोशन केले आहे. तर जाणून घेऊ या त्यांच्या यशाचे गुपित…….
श्री महेशजी यांचा जन्म ४ ऑगस्ट १९६८ रोजी श्री मधूकर धोंडिबा खुटाळे (कासार) व आई जमुनाबाई यांच्या पोटी फलटण येथे झाला. महेशजींचे वडील अण्णा कासार यांच्या विषयी अनेक मोठया राजकीय व्यक्ती, शासकीय अधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांमध्ये आदरयुक्त दरारा होता. त्यांच्या वडिलांनी सातारा जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच महाराष्ट्र तलाठी संघाचे ते उपाध्यक्षही होते.
महेशजी यांचे शिक्षण फलटण येथील मुधोजी हायस्कूल व कॉलेज मध्ये झाले. पुढे क्रांती स्मूर्थी सातारा येथे त्यांनी बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन हा एक वर्ष कालावधीचा कोर्स पूर्ण केला.
महेशजी वयाच्या बाराव्या वर्षांपासून उत्तम हॉकी खेळत. शिवाजी विद्यापीठातून व्हाईस कॅप्टन म्हणून त्यांची निवड झाली होती. पण त्यावेळी समाजाचा खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टीकोण फारसा चांगला नव्हता. खेळ खेळणारा मुलगा म्हणजे रिकामटेकडा किंवा वाया गेलेला मुलगा असा अनेकांचा गैरसमज असे. आपली मुलं डॉक्टर, इंजिनियर अथवा अधिकारी झाली तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे सर्वांचे ठाम मत असे. खेळात पुढे काहीही भवितव्य होऊ शकत नाही, ते केवळ वेळ घालवण्याचे काम आहे, अशीच समाजाची धारणा होती. पण तरीही अशा या नकारात्मक परिस्थितीत लोक काय म्हणतील ? अथवा म्हणतात ? या पलीकडे जाऊन स्वतःवर, स्वतःच्या खेळावर लक्ष देऊन सातत्य ठेवून रोज नियमित पणे सराव करून सर्वस्व पणाला लावून महेशजी खेळ खेळत राहिले. त्यांच्यासाठी खेळ जणू त्यांचा श्वास होता. विशेष म्हणजे पालकांची पण त्यांना भक्कम साथ लाभली.
पुढे महेशजींनी बेंगलोर येथील प्रसिद्ध नेताजी सुभाषचंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक वर्षाचा हॉकी डिप्लोमा पूर्ण केला. या कोर्ससाठी संपूर्ण भारतातून केवळ १६ जणांची निवड झाली होती व त्यामध्ये एक महेशजी होते. ही अतिशय अभिमानास्पद व कौतुकास्पद गोष्ट होती. त्यांच्या अनेक वर्षांच्या कष्टाला, त्यांच्यातील सर्वोत्तम खेळाडूला न्याय मिळाला होता.
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांना “हॉकी कोच” म्हणून अधिकृत मान्यता मिळाली. खेळाडूंनी कोणता व कसा आहार घेतला पाहिजे, व्यायाम कसा केला पाहिजे, हॉकी स्टिक कशी पकडायची, गोल कसा करावा अशा लहान गोष्टींपासून ते महत्त्वपूर्ण मुद्दे व प्रशिक्षण ते नवोदित हॉकी खेळाडूंना देतात. मुलांची क्षमता पाहून त्यांच्याकडून तसा सराव करून घेतात.
आज फलटण येथे श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, गडसोली मैदान तसेच सातारा येथे शानबाग शाळेत प्रशिक्षक म्हणून ते देशाचे भावी खेळाडू घडवण्याचे काम अतिशय प्रभावीपणे करत आहे. पालकांचा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की ते सांगतात की, एकदा आमच्या मुलांना त्यांच्या ताब्यात दिले की आमचे काम झाले. डोळे झाकून लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा, शिस्तबद्धता, कोणताही दुजाभाव न करता योग्य खेळाडूना ते संधी देतात. मुलांची संपूर्ण तयारी करून घेतात. आज त्यांनी घडवलेले जवळजवळ १०० ते १५० खेळाडू जिल्हा, राज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत. याचे सर्व श्रेय महेशजींना जाते, असे अनेक पालक आवर्जून सांगतात.
अनेक पालकांना वाटत होते की आमच्या मुलांचे पुढे काहीही होऊ शकत नाही. त्यांच्या मुलांविषयी अनेक तक्रारी असत. तेच पालक आज सरांना धन्यवाद देतात. आपल्या मुलांच्या प्रगतीचा त्यांना अभिमान वाटतो. “अशक्य ते शक्य” करण्याचे काम सरांनी केले आहे असे पालक आवर्जून सांगतात.
असे हे महेशजी अतिशय प्रेमळ मात्र शिस्तप्रिय प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. मुलांचे ते लाडके सर आहेत. प्रसिद्धी पासून लांब राहून महेशजी आपल्या कामात व्यस्त असतात. आजची मुलं हीच देशाची खरी संपत्ती आहे व त्यांना शिकवण्याचे काम करणे जणू त्या परमेश्वराने बहाल केलेली एक संधी आहे, असे उच्च विचार करणारे गुरू लाभणे केवळ दुर्मिळच.
आपल्या खेळाला दैवत मानणारे महेशजी सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत या मुलांमध्ये रमलेले असतात. ते स्वखर्चाने दरवर्षी ७० ते ८० मुलांना हॉकी स्टिक, पॅड, बॉल, ट्रॅक सुट्स, शॉर्ट्स घेऊन देतात. तर आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या मुलांना मोफत प्रशिक्षण देखील देतात.
महेशजींची नुकतीच बढती होऊन ते “हॉकी परिक्षक – क्लास २ अधिकारी” झाले आहेत. हे यश म्हणजे अनेक वर्षाची मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य अशा सर्व गोष्टींचा एक सकारात्मक परिणाम आहे.
महेशजी सांगतात की, गुरुच योग्य दिशा दाखवून शिष्य घडवतात. आपल्या शिष्यांमधील सामर्थ्य हे केवळ गुरुच ओळखु शकतात. जणू ती अदृश्य दृष्टी परमेश्वराने गुरूंना बहाल केली असते. त्यामुळे मी माझे गुरू श्री जगन्नाथ धुमाळ सर यांचा आजन्म ऋणी आहे, असे ते आवर्जून सांगतात.
स्पष्टवक्तेपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, शिस्त व अतिशय कडक धोरण असल्यामुळे मी जीवनात यशस्वी होऊ शकलो व हीच गुरूंची शिकवण पुढे नेण्याचे काम मी करत आहे, असे ते नम्रपणे सांगतात.
सर्व नियम पाळून व कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही याची महेशजी नेहमीच दक्षता घेतात व कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भीडपणे आपले मत देतात, हे त्यांचे वेगळेपण आहे.
खिलाडूवृत्ती असणारी व्यक्ती जीवनात कोणत्याही बिकट परिस्थितीचा सामना करू शकते. आज हारलो तरी थांबायचे नसते तर पुन्हा नव्या उमेदीने आपले शंभर टक्के देऊन प्रयत्न करायचे असते. क्षेत्र कोणतेही असो खिलाडू वृत्ती असणारा मनुष्य नेहमीच यशस्वी होतो कारण अपयश पचवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते असे महेशजींना वाटते.
आज महेशजींचे अनेक विद्यार्थी उत्कृष्ट हॉकी खेळाडू तर आहेतच. त्या शिवाय अनेक विद्यार्थी तहसीलदार, पीएसआय, पोलिस तसेच अन्य ठिकाणी उच्च पदांवर कार्यरत आहेत.
आज खेळाडूंना सरकारी व अन्य सरकारी आस्थापनांमध्ये नोकरीत आरक्षण असल्यामुळे चांगल्या नोकरीची देखील संधी मिळते. ज्याचा लाभ आज अनेकजण घेत आहेत. त्यामुळे खेळामुळे दुहेरी फायदा होतो. तो म्हणजे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राहते. त्याच बरोबर खेळाचे प्रमाणपत्र असल्याने नोकरीत संधी मिळते.
पण अजूनही बऱ्याच पालकांचा खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही याची खंत महेशजी व्यक्त करतात. समाजात अजूनही खेळविषयी अनेक गैरसमज आहेत. केवळ डॉक्टर, अधिकारी, इंजिनियर याच क्षेत्रात मुलांनी करियर केले पाहिजे असे अनेक पालकांना वाटते. मुलांची क्षमता व त्यांची आवड लक्षात घेऊन पालकांनी मुलांना साथ दिली पाहिजे.
खेळात देखील खेळाडू म्हणून अथवा प्रशिक्षक म्हणून अनेक संधी आहेत. या क्षेत्रात कोणतेही मार्गदर्शन अथवा काही माहिती पाहिजे असेल तर मी पूर्ण सहकार्य करायला तयार आहेत असे ते आवर्जून सांगतात. फक्त टक्केवारीवर मुलांचे भविष्य ठरत नाही. आज अनेक क्षेत्र आहे ज्यामध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळू शकतो. त्यामुळे स्वतःच्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता, मुलांचा कल ओळखुन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे व त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे तरच उद्याचे खेळाडू घडतील, असे त्यांना वाटते. क्रीडा क्षेत्र खूप मोठे आहे. याला मर्यादा नाही. डॉक्टर, वकील अथवा कोणताही अधिकारी जरी असेल तर तो त्या गावात, शहरात काम करतो. मात्र खेळाडू आपल्या गावाचे नाव संपूर्ण देशात व देशाबाहेर ही उंचावतो. त्यामुळे कोणत्याही खेळाला कमी न लेखता त्याचा मान ठेवला पाहिजे, असे त्यांना वाटते.
जर सचिन तेंडुलकर, कपिल देव, धोनी अशा अनमोल रत्नांना, पालकांची साथ नसती तर आज आपला देश त्या रत्नांना मुकले असते. नाही का ?
त्यामुळे विचार बदला तरच देश बदलेल व कोणत्याही नवीन गोष्टीची सुरवात नेहमी स्वतःपासून करायची असते असे त्यांचे मत आहे.
महेशजी हॉकी प्रशिक्षक म्हणून विदर्भ, कोकण, भंडारा, अकोला, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात. महेशजींनी हॉकी प्रशिक्षक म्हणून समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे. आरोग्याविषयी ते अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात. खेळविषयी असलेले अनेक गैरसमज दूर करून जनजागृती देखील करतात.
आज ते जे काही यश संपादन करू शकले त्याचे श्रेय ते आई वडील व पत्नी सौ रुपाली यांना देतात कारण घरची व मुलांची संपूर्ण जबाबदारी ती सक्षमपणे निभावत असते त्यामुळे त्यांना निश्चितपणे बाहेरगावी जाता येते.
महेशजींचा मोठा मुलगा डॉ मुकुल हा फिजियो थेरपिस्ट असून पुण्यात प्रॅक्टिस करत आहे तर लहान मुलगा मोहित हा हॉटेल मॅनेजमेंट करत आहे.

समाजप्रिय असल्याने सामाजिक कार्यात महेशजींचे सक्रिय सहभाग असतो. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक गोल्ड, दोन सिल्वर व तीन ब्रॉंज मेडल मिळवण्याचा बहुमान पटकवला याचा त्यांना मनस्वी आनंद व अभिमान आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम निरीक्षक म्हणून त्यांनी बहुमूल्य काम केले आहे. त्याचबरोबर आजपर्यंत असंख्य राष्ट्रीय स्पर्धांचे उत्तम आयोजन केले आहे. महाराष्ट्र संघ निवड समितीचे सदस्य तसेच राष्ट्रीय पंच म्हणून देखील ते कार्यरत आहेत.
आज अनेकांचा आर्थिक दर्जा सुधारला आहे. अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तांत्रिक, भौतिक दृष्टीने देखील अनेक जणांची खूप प्रगती झाली आहे. पण आपल्या जीवनातील सर्वात महत्वपूर्ण असलेले आरोग्य धोक्यात येत आहे व या गोष्टींकडे अनेक लोक दुर्लक्षित करत असतात याचे महेशजींना दुःख होते. त्यामुळे सर्वांनी जिवनाचा पुरेपुर आनंद घेण्यासाठी आपले शरीर सुदृढ ठेवले पाहिजे अन्यथा अनेक वर्षांच्या कष्टाचा काय फायदा ? असा प्रश्न ते विचारतात.
व्ययामाचा कंटाळा, वेळ नाही, खूप कामे असतात अशी कारणे म्हणजे केवळ पळवाटा असून कोरोनाने हे सिद्ध केले की आपल्या संपत्ती पेक्षाही आपले आरोग्यच खूप महत्वाचे आहे, याकडे ते लक्ष वेधतात. म्हणून प्रत्येकाने स्वतःसाठी किमान एक तास दिला पाहिजे. चालले पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे तरच मनुष्य सदैव उत्साही जीवन जगू शकेल व हीच आपल्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे असा मोलाचा संदेश ते सर्वांना देतात.
असे अतिशय उत्साही, आनंदी व तळमळीने काम करणारे हॉकी प्रशिक्षक, युवकांसाठी क्रीडाक्षेत्रातील प्रेरणास्थान महेशजींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
महेश खुटाळे हे माझे मावस भाऊ असून त्याने लहानपणापासून स्वतःला हॉकीसाठीच वाहून घेतली आहे आम्ही सर्वजण एकत्र जमून दंगामस्ती करायचो परंतु तो हॉकी स्टिक घेऊन ग्राउंड वर असायचा त्याने हॉकीसाठी अनेक दर्जेदार खेळाडू तयार केली तसेच आपल्या फलटण शहराचे आणि सातारा जिल्ह्याचे सर्वत्र नाव रोशन केले अशा या माझ्या हॉकीप्रेमी भावाला माझा सलाम