जगविख्यात मनोविकार तज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांना यंदाचा “आरोग्य ज्ञानेश्वरी” हा लोक आरोग्य शिक्षणाचा पुरस्कार देवून नुकतेच विरार येथे सन्मानित करण्यात आले.
गेली २७ वर्षे लोक आरोग्य शिक्षण करणाऱ्या “आरोग्य ज्ञानेश्वरी” या दिवाळी अंकाचे यावेळी डॉ. नंदू मुलमुले यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीचा प्रश्न जटील होत आहे.आजच्या घडीला जगाची लोक संख्या सुमारे ८०० कोटी आहे. भारताची लोकसंख्या १४० कोटी आहे. त्यातील दर चौथ्या व्यक्तीला म्हणजे सुमारे ३५ कोटी व्यक्तींना काही न काही मानसिक त्रास आहे. अर्थात हे सगळे अति लोकसंख्येने प्रश्न निर्माण केले आहेत.
जगभर असेच सुरु आहे.ज्या देशाची लोकसंख्या सीमित राहील त्या देशातील लोक मानसिक व्यथा कमी होतील. अशी आशा व्यक्त करून ते पुढे असेही म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणाचे एक सर्वव्यापी धोरण जागतिक पातळीवर आखायला हवे. त्यात आपल्या देशाने पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक व्यथा कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या देशातील वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्याकडे आलेल्या रुग्णांना प्रेम भावनेने गोंजारून, उत्तम जनसंपर्क साधून संपूर्ण समाजाची हिरीरीने काळजी घ्यावी असे आवाहन ही यावेळी डॉ. मुलमुले यांनी केले.
यंदाच्या आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंकात बालकांच्या आरोग्याबद्दल ३० लेख आहेत. ते भारतातील सर्वोत्तम तज्ञ डॉक्टरांनी लिहिले आहेत.
अशा प्रकारचे ज्ञान मातृभाषेत देणारी ही मराठी ही भारतातील पहिलीच भाषा असून देशातील सर्व भाषात हे ज्ञान प्रसिद्ध व्हायला हवे, असे मत डॉ मुलमुले यांनी व्यक्त केले.

मुलांचे आई बाबा, परिचारिका, माता, खेड्यांतील अंगणवाडी सेविका, बाल रोग तज्ञ तसेच यांच्या साठी हा अंक एक दिपस्तंभ ठरेल असे मत आरोग्य ज्ञानेश्वरी चे संपादक बालरोग तज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी व्यक्त केले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी विरारचे सुप्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. मधुकर भिकाजी राउत होते. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे निदान महाराष्ट्रात तरी आरोग्य साक्षरता वाढत जाईल असे विचार यावेळी त्यांनी व्यक्त केले.

– लेखन : निरंजन राउत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800