युद्धामुळे कायम स्वरुपी जायबंदी झालेल्या भारतीय शुर सैनिकांची कालची संध्याकाळ चांगलीच अविस्मरणीय ठरली. आंतरराष्ट्रीय माईंड रिडर सतीश देशमुख यांचे एकेक विस्मयकारक प्रयोग बघून या सैनिकांच्या चेहऱ्यावर चांगलेच हास्य फुलले.
निमित्त होते, थोर देशभक्त उद्योगपती रतन टाटा यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे. हा वाढदिवस फॅन्सी रिहॅबिलिटेशन ट्रस्ट या दिव्यांगांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने अतिशय अभिनव पद्धतीने साजरा केला.
या संस्थेने खडकी येथील भारतीय सेनेच्या प्याराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर मधील, युद्धात कायमचे जायबंदी झालेल्या सैनिकांच्या चेहऱ्यावर काही काळ आनंद निर्माण करण्यासाठी मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
जवळपास ८० देशात माईंड रिडिंगचे कार्यक्रम करणाऱ्या सतीश देशमुख यांच्या साठीही हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाविषयी बोलताना सतीश देशमुख म्हणतात, “माझ्या समोर युद्धामुळे कायमचे अपंगत्व आलेले ७२ सैनिक आणि इतर शेकडो स्त्री पुरुष लबसलेले होते. नेहमीच्या पद्धती प्रमाणे मी प्रेक्षकांना मनात एक नंबर धरायला सांगितला.
मी कागदावर एक दोन आकडी नंबर लिहिला आणि व्हिल चेअरवर बसलेल्या एका सैनिकाला म्हणालो “कृपया न बोलता हाताच्या बोटांनी तुमच्या मनातील आकडा दाखवा. कॕनडातील माझी मुलगी किमया तुमच्या मनातील नंबर आता सांगणार आहे. परंतु अनपेक्षितपणे तो म्हणाला,
” I can’t” (मी दाखवू शकत नाही.)
मला हे अपेक्षित नव्हते. यापूर्वीच्या शोमध्ये असे उत्तर कधीही मिळाले नव्हते. आणि अचानक माझ्या लक्षात आले, अरे रे आपण चुकलो ! सदर सैनिकाची बोटे आणि हातही काम करीत नव्हते. पायानेही तो अधू झालेला आहे.
शिल्लक होते ते फक्त धड आणि डोके ज्यात मी पाहिल्या फक्त आशा आणि अनेक आकांक्षा.
माझी चूक माझ्या लक्षात आली. अनवधानाने झालेल्या या प्रकारामुळे मी खूप खजील झालो. पण कार्यक्रम तर पुढे न्यायचा होता. म्हणून मी चातुर्याने किमयाला (माझ्या मुलीला) त्याच्या पोशाखाबद्दल प्रश्न विचारला. तिने अगदी अचूक उत्तर दिले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
कार्यक्रम संपल्यानंतर मी माफी मागण्यासाठी त्या सैनिकाजवळ आठवणीने गेलो. पण चुकून दुसऱ्याच सैनिकासमोर शेकहॕंडसाठी हात पुढे केला. तर तो मला विचित्र नजरेने परंतु आनंदाने पाहू लागला. आणि माझ्या लक्षात आले, त्याला हातच नव्हते ! आज कार्यक्रमाचा वेळ अपुरा पडला म्हणून मी स्वतः या सैनिकांसाठी एक कार्यशाळा घेईन.”
कार्यक्रमाची सुरुवात मोहन भरत यांच्या भारदस्त आवाजातील “इतनी शक्ती हमे देना दाता” ने या प्रेरक गीताने झाली. तदनंतर ट्रस्ट करीत असलेल्या कार्याची छोटीशी झलक एका व्हिडिओ मार्फत दाखवण्यात आली.
गायक मोहन भरत यांनी सैनिकांच्या मनोरंजनासाठी स्त्री व पुरुष अशा दोन्हींच्या आवाजामध्ये काही गाणी गायली. ज्युनिअर राजेश खन्ना यांनीही छान मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिध्द काका जे पी यांनी केले.
फॅन्सी रिहाबिलिटेशन ट्रस्ट चे संस्थापक, माजी कस्टम अधिकारी एस ए राजन यांनी प्रास्ताविक केल्यानंतर केंद्र प्रमुख डॉ कर्नल आर के मुखर्जी, निवृत्त कस्टम आयुक्त अरुण पटेल, दोनदा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वसंत संखे, प्रशासकीय अधिकारी कर्नल बी एस भार्गव, निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली. या सर्व प्रमुख पाहुण्यांचा श्रीमती राजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अखेरीस रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सैनिकांसोबत सर्व प्रमुख पाहुण्यांनी वाढदिवसाचे गीत गात, आनंदी वातावरणात केक कापला. सर्व सैनिकांसाठी मोहन भरत यांनी “ए मेरे वतन के लोगो” हे गाणे गायले आणि या अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली.
– लेखन : फातिमा इनामदार. पुणे
– छायाचित्रे- राज कालेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🙏
अतिशय हृद्य असा कार्यक्रम झाला. देवेंद्र साहेब भुजबळ यांच्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची संधी मला मिळाली. त्यांचे मनापासून आभार. राजनसाहेब, त्यांची सर्व टीम, जयंतिकाका, मोहन भारत, सुरेशजी ( राजेश खन्ना) , सतीश साहेब देशमुख इत्यादींना तसेच कर्नल रतनकुमार बॅनर्जी साहेब, कर्नल भार्गव साहेब आणि ते ज्यांची रात्रंदिवस काळजी घेतात, ते सैनिक या सर्वांना विनम्र अभिवादन…!!
.. प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007
🌹निःशब्द 🙏🙏🌹