अपुऱ्या शौचालय सुविधेमुळे विदयार्थ्यांची विशेषतः मुलींची होणारी गैरसोय लक्षात घेता गणेशपुरी स्थित प्रसाद चिकित्सा संस्थेने गेल्या काही वर्षांपासून शालेय शौचालय बांधणी हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेने तानसा खोरे परिसरातील अनेक दुर्गम शाळांना अद्यावत शौचालय बांधुन दिलेले आहेत. या यादीत आता केळठण ता. वाडा येथील जि. प्र. उच्च प्राथमिक शाळेची भर पडलेली आहे.
या नुतन शौचालय संकुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला जि. प. सदस्य श्री. राजेश मुकणे, गावच्या सरपंच सौ. पुष्पा चातुर्व, मुख्याध्यापिका सौ. विभा पाटील, केंद्रप्रमुख, शिक्षक वृंद आणि प्रसाद चिकित्साचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
फीत कापून उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर सरपंच व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रसाद चिकित्साच्या माध्यमातून पार पडलेल्या दर्जेदार कामाचे कौतुक केले. मनोगत व्यक्त करतेवेळी मुख्याध्यापिका म्हणाल्या की, आमच्या विदयार्थ्यांना अपुऱ्या शौचालय सुविधेमुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. सुमारे दोनशेच्या आसपास असणाऱ्या मुला-मुलींना एकच शौचकुप वापरावे लागत होते. ते सुद्धा मोडकळीस आलेले होते. मधल्या सुट्टीत मुलांना शौचालयाचा वापर करण्यासाठी अक्षरशः रांग लावावी लागत होती.
शाळेत जर एखादा पाहुणा आला किंवा निवडणुकीसारखा कार्यक्रम असल्यास आम्ही शेजारच्या घरात त्यांचे वैयक्तिक शौचालय वापरु दयावे यासाठी विनंती करायचो. पण प्रसाद चिकित्सा संस्थेने हे संकुल बांधुन मुलांची त्याचबरोबर आम्हा शिक्षकांची सुद्धा फार मोठी गैरसोय दुर केली आहे. आम्ही त्यांचे खुप आभारी आहोत. जि. प्र. सदस्यांनी तर म्हटले की संपूर्ण पालघर जिल्हयातील शाळांनी आदर्श घ्यावा असे हे उत्कृष्ट काम आहे.
कार्यक्रमसाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग सुद्धा उपस्थित होता. अतिशय कमी कालावधीत एवढे दर्जेदार बांधकाम उभे राहिलेले पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत होते. मुलांचा आनंद तर ओसांडून वाहत होता. या अदयावत संकुलात मुले व मुलींसाठी स्वतंत्र मुतारी, शौचालये, हात धुण्यासाठी बेसिन, नळाद्वारे कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था इ. सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. हा उपक्रम भविष्यात असाच राबवून परिसरातील शाळांची गैरसोय दूर करण्यासाठी संस्थेने कंबर कसली आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800