Thursday, September 18, 2025
HomeUncategorizedनवं वर्ष : काही कविता....

नवं वर्ष : काही कविता….

खरं म्हणजे, नवं वर्षाच्या निमित्ताने प्राप्त झालेल्या कविता नवं वर्ष दिनी, म्हणजे १ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणे उचित ठरले असते. पण रविवारी पोर्टल ला सुट्टी असल्याने त्या काल प्रसिध्द होऊ शकल्या नाहीत,या बद्दल क्षमस्व. या कविता आज प्रसिध्द करीत आहे.
– संपादक

१. एक जानेवारी..

एक जानेवारी
एक जानेवारी
उल्हासाचे वारे
हौस वाटे भारी
नवे वर्ष नवे वर्ष
मनी दाटे हर्ष
मनी दाटे हर्ष….

संकल्प करू नवे
वाटती हवे हवे
संकल्प सिद्धिस
नेऊ विचारा सवे
आज्ञा पाळू मोठ्यांच्या
आई पप्पा आजी आजोबांच्या…

संकल्प लवकर उठण्याचा, व्यायामाचा
करूया अभ्यासाचा
डोंगर दऱ्यातून
कधी फिरूनी येऊ
ते रंग सृष्टीचे
दृष्टीत साठवून घे

कधी जाऊ याना
अनाथाश्रमात
राहती कशी ती बालके पाहूयात ना
ना नातलग ना कोणी वाली
नशिबाने त्यांची
वाताहत का केली ?

दीनदुबळ्यांना तो देऊ थोडा हात
कष्टाने करती परिस्थितीवर मात
देताच हात
ते ताडकन् उठतील
अन् दोन घास ते
आनंदे खातील

जर असेल इच्छा
तर करण्यासारखे खूप
ना तर ओढती पोळीवरती तूप
स्वार्थांध बनूनी नका

घालवू आयु सोन्याने मढवू नव वर्षाचे पाऊ ..

प्रा. सुमती पवार

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक

२. स्वागत

नव्या दमाने नवचेतनेने
स्वागत करूया नववर्षाचे
झाले गेले विसरुनी जाऊ
रोप रुजवु या प्रेमाचे

भिंतीवरची दिनदर्शिका
पान बदलते दिवसाचे
कधी हासरे कधी बोचरे
जीवन नित्यनियमाचे

किती झेलली दुःखे तरीही
दिवस उद्याचे आनंदाचे
हेवे दावे दूर सारुनी
नाते जपूया मैत्रीचे

निसर्गावर प्रेम करूया
पालन करुया पशुपक्ष्यांचे
मातृभूमीचे रक्षण करण्या
आचरण अपुले निजधर्माचे

घडोत कितीही राजकारणे
वेध लागले क्रांतीचे
भारतभूचे नागरिक म्हणुनी
धोरण परोपकाराचे

संकल्प हाचि नववर्षाचा
सुखसमृद्धी घरोघरी
आनंदाचे तोरण सजले
नूतन वर्ष आले दारी

– रचना : अरूणा मुल्हेरकर. ठाणे

३. नवीन वर्षाचे करू या स्वागत.

नववर्षाचे करू स्वागत जल्लोषात
बोलता पहातां वर्ष संपले आशेंत ।।ध्रु।।

जन्म-मृत्यू अटळ चक्र राहे चालत
काळ पुढे जाई कुणासाठी न थांबत
सूर्यास्तानंतर सूर्योदय होई निश्चित ।।1।।

कुणाचे कार्यारंभ कुणाचा शेवट
करावे प्रयत्न सकारात्मक रहावेत
काळ ठरवील कोण श्रेष्ठ नी कनिष्ठ ।।2।।

सुख-दुःखाच्या आठवणी उजळाव्यात
दुःख विसरावे आनंदी क्षण वेचावेत
प्रेम मैत्री संबंध सर्वांशी वाढवावेत ।।3।।

सुविध शोध तंत्रज्ञान स्विकारावेत
जीवनाच्या पथावर चालावे सुरळीत
समृद्ध सुखी जीवनाचा लुटावा आनंद ।।4।।

मागे वळुन पहाता दोष टाळावेत
प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावेत
रात्र सरेल येई उद्याची शुभ पहाट ।।5।।

करावा नित्य व्यायाम आहार संयमित
संपदा टीकेल पर्यावरण जपावेत
सांभाळावी रोजनिशी संयोजनाची रीत ।।6।।

– रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड

४. ठाम निर्धार

वर्ष नव्याने पुढ्यात आले
हेच सांगते पुन्हा पुन्हा
घाम गाळूनी कष्ट करा रे
मंत्र यशाचा हाच जुना

नकोच नुसत्या
बाता आता
नको फुकाची अळीमिळी
बिनकामाच्या गप्पा करता
उतू चालली कढी शिळी

पुन्हा कशाला संकल्पांची
कोरी पाटी लिहायची
मागील वर्षी राहून गेली
तीच पालखी वाहायची

ठाम करू निर्धार मनाचा
मनोमनी फुलवू प्रीत
आनंदाने गाऊ सारे
नवीन वर्षाचे गीत…

स्मिता धारूरकर

– रचना : स्मिता धारूरकर. पुणे

५. स्वागत .. २०२३

सुखदुःखांचे अगणित क्षण
धावत आहे अपुले जीवन

शिंपल्यातील मोती दर्शन
खुलता मन सस्मित झाले वदन

भाव दाटले ओघळले नयन
जीवा शीवाचे एकच स्पंदन

भूलचुकांचे नकोच ते स्मरण
हृदयी साठवण आनंदमय क्षण

गत सालाचे आभार मनोमन
झोळी भरली सुख समाधान

निरोप देऊ जात्या २०२२ सन
जड झाले हे अंतःकरण

बिजांकुरातील रोप मनोहर
नव पहाट घेऊनी येता दिनकर

सुरम्य स्वप्ने पाहती लोचन
स्वागत करुया साल हे नूतन

– रचना : नेहा हजारे.. ठाणे

६. स्वागत नववर्षाचे

पहाट नववर्षाची
नवउन्मेषे फुलली
लाली नवसंकल्पांची
क्षितिजी फुलून आली

कष्टक-याला भाकरी
सुशिक्षिताला चाकरी
नीतीमत्ता व्यवहारी
घेऊ गगनभरारी

महागाईचा असूर
माजलासे भ्रष्टाचारी
जाळुनिया भ्रष्टाचार
सचोटीची कास धरी

उद्यान सुविचारांचे
जनमनांत फुलवू
विचार जातियतेचे
फेकून देऊ उडवू

भारतीय हीच जात
माणुसकी हाच धर्म
नववर्ष सुरुवात
नवसंकल्पांचे मर्म

रामराज्या जाणुनिया
शिवशाही आठवू या
दिशाहीन युवकांनो
नवप्रेरणा घेऊं या

स्वाती दामले

– रचना : स्वाती दामले.
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा